धांदरफळमधील वक्तव्याला तुम्हीच जबाबदार आहात : माजीमंत्री थोरात लोणीतून विखे पिता-पूत्रावर शरसंधान; ‘त्या’ प्रकारानंतर पहिल्यांदाच केले सार्वजनिक वक्तव्य..

नायक वृत्तसेवा, लोणी
धांदरफळमधील सभेत महिलांबाबत अवमानजनक वक्तव्य करणारा वसंत देशमुख काँग्रेसचा आहे असे आता ‘हे’ म्हणू लागले आहेत. मात्र, त्याच्या गळ्यात भाजपचा आणि भाजपपेक्षा विखेंचा पट्टा आहे, जिकडे विखे तिकडे हा देशमुख. तो इतक्या वाईट पद्धतीने बोलला की, त्यातून केवळ डॉ.जयश्री थोरातच नव्हेतर समस्त माता-भगिनींचा अवमान झाला आहे. इतकं सगळं झाल्यानंतर व्यासपीठावरच त्याच्या कानफडीत मारण्याची गरज असताना आता हे म्हणतात आम्ही चुकलो, आम्ही नव्हतो. पण, तुम्हीतर त्या विधानानंतर टाळ्या वाजवत होता, हसतं होता. त्याचेच अनुकरण तुमच्या समोर बसलेले तुमचे समर्थक करीत होते. त्यामुळे या घटनेला तुम्ही जबाबदार नाहीत असे म्हणून तुम्हाला त्याची जबाबदारी टाळता येणार नाही असे रोखठोक मत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी थेट लोणी खुर्दच्या प्रांगणात जावून केले.

धांदरफळ येथील डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या युवा संकल्प यात्रेच्या मंचावर अध्यक्षस्थानावरुन बोलताना वसंत देशमुख यांनी थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जावून टीका केली होती. या घटनेनंतर संगमनेर तालुक्यातील थोरात समर्थकांचा रोष उफाळला आणि त्यातून धांदरफळमधील विखे-पाटलांच्या मंचावर जावून विरोध दर्शवण्यासह अकोले रस्त्यावर दोन ठिकाणी सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या वाहनांवर हल्ला करण्याचे प्रकार घडले. या दोन्ही घटनांनंतर संगमनेरची निवडणूक राज्याच्या केंद्रस्थानी आलेली असतानाच माजीमंत्री बाळासाहेब थोरात या घटनेनंतर पहिल्यांदाच संगमनेर व शिर्डी मतदार संघात आले होते, त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते पहिल्यांदाच काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

शिर्डीतून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेल्या प्रभावती घोगरे यांची उमेदवारी दाखल करण्यापूर्वी लोणी खुर्दमध्ये झालेल्या जाहीर सभेत माजीमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी त्यांनी विखे-पाटलांच्या राजकारणावर चौफेर आसूड ओढताना धांदरफळमधील घटनेला डॉ.सुजय विखे-पाटीलच जबाबदार असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, संगमनेर तालुक्यात वैचारिक भाषणं करण्याची परंपरा आहे. विरोधकांची भाषणं ऐकण्यासाठीही लोकं गर्दी करतात. या परंपरेला छेद देण्याचा प्रकार धांदरफळमध्ये घडला. खरेतर वसंत देशमुख हा कोणाचा माणूस आहे हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. त्याने इतक्या खालच्या पातळीवर वक्तव्य केल्यानंतर जागीच त्याच्या कानफडात वाजवण्याची गरज असताना पुढच्यावेळी तुम्हाला बोलण्यासाठी जास्त वेळ देवू असे जर तुम्ही म्हणत असाल तर, तुम्ही सुद्धा त्या प्रकाराला जबाबदार आणि तितकेच दोषी आहात असेही त्यांनी ठणकावले.

‘तुम्ही नामर्द आहात, महिलांना पुढे करता’ या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी (ता.27) संगमनेर येथे केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना माजीमंत्री थोरात म्हणाले की, तो विषय महिलांचा असल्याने महिला पुढे आल्या. पण, तुम्ही जर इतके मर्द आहात तर, धांदरफळमधील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर तेथून पळून का गेलात असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या गोष्टीचे उत्तर मर्दांनी देणे आवश्यक असताना ते तर आपले ‘पाहुणे’ कार्यकर्ते वार्यावर सोडून अकोले, ठाणगाव, समृद्धी मार्गे पळून गेल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली. संगमनेर तालुक्यात येवून ‘ते’ दहशत आणि विकासावर आरोप करीत असतील तर आपण त्यांना खुले आव्हान देतो की, आजच्या दृष्टीने जनताच आपली ‘न्यायाधीश’ आहे, येणार्या निवडणुकीत तीच काय तो निर्णय देईल.

एकमेकांच्या दहशत आणि विकासाची तुलनाच करायची ठरल्यास जनतेने मतपेटीच्या रुपाने निर्णय द्यावा की, शिर्डीत दहशत आहे की, संगमनेरमध्ये. जो योग्य असेल त्याच्यामागे जनतेने उभं रहावं, जो अयोग्य असेल त्याला धडा शिकवावा असे आवाहनही त्यांनी केले. गेली साठ वर्ष यांच्याकडे सत्ता आहे, त्यातील 35 वर्ष खासदारकी होती. पण यांना औद्योगिक वसाहतीसाठी जागा मिळाली नाही. आता शेतीमहामंडळाच्या जागेवर औद्योगिक वसाहत मंजूर झाल्याचे आपण सांगत असला तरीही ‘त्या’ जागेचे प्लॉट पाडून कोणत्या कंपन्यांच्या घशात ते घातले गेलेत याचा शोध घ्यावा लागेल असा टोलाही त्यांनी लगावला.

संगमनेर तालुक्यात सरकारी औद्योगिक वसाहत नसली तरी सहकारातली शे-दीडशे उद्योग असलेली छोटी वसाहत आहे. तेथील उद्योजक त्यातून समाधानी आहेत. पण तुम्ही असे समाधान कोणाला दिले आहे का? असा खोचक सवालही माजीमंत्री थोरात यांनी उपस्थित केला. आपल्या मतदार संघात एखादा उद्योग टाकायला कोणी आला, चांगलं काही करायला कोणी आला तर आपण मोडायला पुढे असतो. कोणाचं चांगलं झालं तरं ते का झालं असा विचार करणारी तुमची वृत्ती आहे अशी जहरी टीका करताना एकदा संगमनेरच्या बाजारपेठेत येवून बघा, पाय ठेवायला जागा मिळणारी नाही अशी कोपरखळीही त्यांनी दिली. चांगल्या कामाला आम्ही नेहमीच प्रोत्साहन दिले आहे, मग तो विरोधक असला तरीही त्याची कधीही अडवणूक झालेली नाही. अशा गोष्टी शिर्डीत का घडत नाहीत असा सवाल करताना त्यांनी आपलं वक्तव्य व्यक्तिगत कोणावरही नसून प्रवृत्तीच्या विरोधात असल्याचेही स्पष्ट केले.

महिलांविषयी अनुद्गार काढणार्या वसंत देशमुखला अटक होणं गरजेचं असताना त्याला याच परिसरात कोठेतरी विश्रामगृहावर ठेवून शिर्डीतील तारांकित हॉटेलमधून त्याच्यासाठी बिर्याणी मागवण्यात आली. नंतर त्याला सुरक्षित पुण्याला पाठवले गेले आणि जेव्हा हा विषय राज्यात तापला त्यानंतर त्याला पोलिसांसमोर हजर केले गेल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केला. स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर, थोडा त्रासही होतोच असे सांगत माजीमंत्री थोरात म्हणाले की, तुम्हाला बदल करायचाय, चांगलं जीवन जगायचंय, मनमोकळं वागायचंय, लोकप्रतिनिधींना जाब विचारता आला पाहिजे असे वातावरण तयार करायचे असेल तर तुम्हाला थोडं तयार रहावं लागेल असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

धांदरफळमधील सभेत वसंत देशमुख यांनी डॉ.जयश्री थोरात यांच्यावर अवमानजनक टिपणी केल्याने कार्यकर्त्यांच्या उद्रेकानंतर घडलेल्या घटनांवर माजीमंत्री बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच सार्वजनिक मंचावरुन व्यक्त झाले. यावेळी त्यांनी आपण भाऊसाहेब थोरात यांचे पूत्र आहोत, संयमी आहोत. पण जेव्हा जेव्हा ते आपल्यात जागृत होतात, त्यावेळी कठीण असतं असा सूचक इशाराही त्यांनी दिला. डॉ.जयश्री आपली सुपूत्री आहे, तुरुंग वगैरे सोडा, चुकीचे चालले असेल तर, त्या विरोधात उभे राहताना आम्ही समाजासाठी मरायलाही तयार आहोत अशा शब्दात त्यांनी विरोधकांना ठणकावले.

