संगमनेरच्या ‘त्या’ हनीचे कारनामे बाहेर यायला सुरुवात! संगमनेरच्या दोघा व्यापार्‍यांवर बलात्काराचा आरोप; तर करुल्याच्या पीडित व्यक्तीची पोलिसांत धाव..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाज माध्यमातील माहितीच्या आधारे सुखवस्तू कुटुंबातील व्यक्तिंना हेरुन त्यांना प्रेमजालात ओढणार्‍या आणि त्यानंतर सातत्याने बदनामीची भीती दाखवून त्यांना लुबाडणार्‍या संगमनेरच्या ‘हनी’ आणि तिच्या कंपनीचे विविध कारनामे आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे. याच ‘हनी’ने चार वर्षांपूर्वी संगमनेरच्या दोघा सख्ख्या व्यापारी बांधवांवर दुकानातच अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तर गेल्या मार्चमध्ये करुल्यातील एका व्यक्तिची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याप्रकरणी ‘त्या’ हनीविरोधात तक्रारही दाखल झाली होती. मात्र तालुका पोलिसांना या प्रकरणातील गांभीर्यच लक्षात न आल्याने त्या नंतरच्या काळात अनेकजणांना या हनीने आपले ‘शिकार’ बनविले आणि अखेर त्यातच ती अकोले पोलिसांच्या जाळ्यात अडकली. अकोले पाठोपाठ आता संगमनेरातही त्या हनीविरोधात जबरी चोरीसह मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून येत्या मंगळवारी (ता.20) संगमनेर पोलिसांना तिचा ताबा मिळण्याची शक्यता आहे.

अकोले येथील एका सद्गृहस्थाची समाज माध्यमातून माहिती मिळवून त्याच्याशी सलगी करीत नंतर त्याला आपल्या प्रेमजालात ओढण्याचा प्रयत्न संगमनेरच्या या हनीने केला होता. त्यात तो इसम फसल्यानंतर 11 जून ते 13 जुलै या कालावधीत त्याला वारंवार संगमनेरात बोलावून त्या हनीने आपल्या सहकारी महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले व या प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. त्यानंतर तिने त्याच्याकडून दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. इतके पैसे देण्यास त्या व्यक्तीने नकार दिल्यानंतर त्या हनीने आणि तिच्या साथीदार महिलांनी त्याला मारहाण करीत चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली व बळजोरीने त्याला आपल्या एटीएममधून 30 हजार रुपये काढायला लावले व उर्वरीत 1 लाख 70 हजार रुपयांसाठी तगादा सुरु केला. या सर्व गोष्टीला वैतागून संबंधित इसमाने अकोले पोलीस ठाण्यात धाव घेत सहाय्यक निरीक्षक मिथून घुगे यांना आपबीती सांगितली आणि हनीच्या ‘गुलाबी जालाचे’ बिंग फुटले. या प्रकरणी अकोले पोलिसांनी सापळा लावून तिच्यासह अन्य एक महिला व पुरुषाला (हनीचा कथित पती) बुधवारी (ता.14) अटक करुन त्यांच्यावर कट रचल्याप्रकरणी 120 (ब) सह भा.दं.वि. कलम 394, 384, 385, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारपर्यंत (ता.19) ते तिघेही पोलीस कोठडीत आहेत.

या दरम्यान गुरुवारी (ता.15) अकोल्यातीलच एका शेतकर्‍याने पुढे येत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यातून ती ‘हनी’ आणि संगमनेरात तिने फसवलेल्यांच्या प्रकरणांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. चार वर्षांपूर्वी 22 ऑक्टोबर 2017 रोजी याच हनीने शहरातील मेनरोडवरील एका दुकानात दुकानाच्या दोघा मालकांनी आळीपाळीने आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार थेट भिंगार पोलीस ठाण्यात जावून नोंदविली होती. त्यावेळी संगमनेरात मोठा आगडोंब निर्माण होवून व्यापार्‍यांनी सदरचा गुन्हा खोटा असल्याचे सांगत तो रद्द करण्याचीही मागणी केली होती. विशेष म्हणजे त्यानंतर दोन महिन्यांनी 5 जानेवारी 2018 रोजी याच हनीने पुन्हा त्याच व्यापार्‍याच्या दुकानात जावून दारुच्या नशेत मोठा ‘धिंगाणा’ केला व तुम्ही मला पैसे दिले नाहीत, आता तुमचे दुकानच पेटवून देईल आणि तुम्हांला दुसर्‍या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात टाकील असे सांगत मी विषारी औषध घेवून जीव देते आणि तुमचे नाव घेते अशी धमकी दिल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हाही दाखल झालेला आहे.

याच हनीने तळेगाव दिघे परिसरातील करुले येथील एका शेतकर्‍यालाही गंडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाही आपल्या मायाजाळात ओढून त्याच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. हे प्रकरण लक्षात आल्यानंतर करुल्याच्या त्या इसमाने तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार याच हनीसह तिच्या एका साथीदार महिलेवर खंडणी मागितल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 384 नुसार गुन्ह्याची नोंदही झालेली आहे. तालुका पोलिसांनी या प्रकरणाचा त्याचवेळी सखोल तपास केला असता तर कदाचित त्यानंतर घडलेले हे प्रकार थांबवता आले असते. मात्र त्यावेळी संगमनेर तालुका पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्यच लक्षात आले नाही, त्यामुळे मनोधैर्य वाढलेल्या या हनीने आपल्या टोळीसह आपले गुलाबी कारनामे सुरुच ठेवले आणि त्यात चांगल्या कुटुंबातील अनेकांना नाहक मनःस्तापाचा सामना करण्याची वेळ आली. सध्या ही हनी, तिची साथीदार आणि कथित नवरा अकोले पोलिसांच्या कोठडीत आहेत. सोमवारी (ता.19) त्यांच्या काठडीची मुदत संपताच संगमनेर पोलिसांकडून तिला येथील गुन्ह्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यानंतर तिच्या चौकशीतून आणखी किती फसवलेले पुरुष समोर येतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे.


अकोले पोलिसांनी उघड केलेल्या ‘हनी’चे कारनामे 2017 पासून संगमनेरात सुरु आहेत. त्यामुळे तिने ‘फसवलेले अनेक पुरुष’ संगमनेरात असण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक पाहता गेल्या मार्चमध्येच या हनीवर तालुका पोलीस ठाण्यात चक्क खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचवेळी या प्रकरणाचा योग्य तपास झाला असता तर अकोल्यातील ‘त्या’ दोघांसह अद्याप ‘अज्ञात’ असलेल्या अनेक पुरुषांना मोठा दिलासा मिळाला असता. आता संगमनेर शहर पोलीस ठाण्यातही तिच्यासह तिच्या साथीदार महिलांविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाल्याने या टोळीने संगमनेरातील आणखी किती पुरुषांना फसविले असेल हे आता समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Visits: 16 Today: 2 Total: 118835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *