संगमनेर विधानसभेत शिवसेनेकडून अमोल खताळ! उद्या होणार शिवसेनेत प्रवेश; नामदार विखे यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच संगमनेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोर कोण या विषयाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.  त्यातच आचारसंहिता लागल्यानंतर माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी संगमनेर विधानसभेची जागा लढविण्याची इच्छा व्यक्त करीत मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सभांचा धडाकाही लावला. एकीकडे माजी मंत्री थोरात यांच्या कन्या डॉ.जयश्री यांची पेमगिरीपासून सुरु झालेली युवासंवाद यात्रा आणि माजी खासदार डॉ.विखे यांनी तळेगाव गटापासून सुरु केलेली युवासंकल्प यात्रेने संगमनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण निर्माण केले. दोन्ही बाजूंच्या आरोप-प्रत्यारोपाने सामान्यांची उत्कंठाही वाढली होती. थोरात विरुद्ध विखे असाच सामना होईल असेही कायास लावले गेले, मात्र सरतेशेवटी गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील दिग्गज राजकारणी असलेल्या थोरातांविरुद्ध लढाईची तयारी करणाऱ्या भाजपच्या अमोल खताळ यांना संगमनेरची उमेदवारी निश्चित झाली आहे. उद्या खताळ यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
संगमनेर विधानसभा मतदारसंघ ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजल जातो. 1985 पासून या मतदारसंघावर थोरात यांचे वर्चस्व राहिले आहे. सलग आठवेळा मोठ्या मताधिक्याने विधानसभेत जाण्याचा त्यांचा विक्रम असून यावेळी ते नव्यांना काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात आहेत. गणेश कारखाना आणि दक्षिणेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ.सुजय विखे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच संगमनेर तालुका मतदार संघावर लक्ष केंद्रित करून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गटनिहाय सभा घेण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांनी थेट थोरातांच्या राजकारणावर भाष्य करीत तालुक्यात परिवर्तनाची लाट असल्याचे वातावरण तयार केले. त्यातच गेल्या आठवड्यात धांदरफळ येथे झालेल्या युवा संकल्प यात्रेच्या मंचावरून थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्री यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरून वक्तव्य केले गेल्याने वातावरण प्रचंड तापले होते. दोन्ही बाजूने एकमेकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यापर्यंत मजल गेल्यानंतर यंदाच्या विधानसभेत थोरात विरुद्ध डॉ.सुजय विखे-पाटील असा सामना रंगणार असाच बहुतेकांचा कयास होता. मात्र, तो आता फोल ठरला आहे.
मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व व्हिडिओ प्रणालीद्वारे लोणीतून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात झालेल्या प्रदीर्घ बैठकीतून संगमनेरची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाकडेच कायम राहणार असून डॉ.सुजय विखे-पाटील यांच्या ऐवजी भाजपचे कार्यकर्ते अमोल खताळ यांना शिवसेनेच्यावतीने संगमनेर विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्या दुपारी एक वाजता त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असून त्यानंतर मंत्री विखे-पाटील यांच्या उपस्थितीत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या वृत्ताने संगमनेर तालुक्यात निर्माण झालेले विविध चर्चांचे वावटळ आता खाली बसण्यास सुरुवात झाली आहे.
Visits: 49 Today: 1 Total: 113586

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *