कोपरगावातील हॉटेल व्हीआयपी ते येवला नाका रस्त्याची चाळण
कोपरगावातील हॉटेल व्हीआयपी ते येवला नाका रस्त्याची चाळण
… तर मुख्य शहराला जोडणार्या प्रत्येक रस्त्याची अवस्था बिकट
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील व तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली असून बहुतांश रस्ते हे शेवटची घटका मोजताना दिसून येत आहे. काही रस्त्यांचे काम अर्धवट होऊन रखडलेले आहे तर काही रस्त्यांचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. तर ग्रामीण भागातून मुख्य शहराला येणार्या प्रत्येक रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झालेली दिसून येते.
कोपरगाव मुख्य शहरापासून अवघे एक ते दीड किलोमीटर अंतर असलेल्या तालुक्यातील प्रसिद्ध कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयाला जोडला जाणार पालिका हद्दीतील हॉटेल व्हीआयपी ते येवला नाका हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून त्यातच यावर्षी वरूणराजा तालुक्यावर एकदम खुश असल्याने दररोज धो-धो बरसणार्या पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील एक ते दोन फूट खोल खड्ड्यांत पाणी साचून डबक्याचे स्वरूप झाल्याचे पहावयास मिळत आहे.
या डबक्यातून वाहन चालकांना मार्ग काढताना खूपच कसरत करावी लागते. हॉटेल व्हीआयपी जवळील खड्डा बघून वाटते की, हा रस्ता आहे की पाण्याचे डबके. या डबक्यातून दररोज हजारो नागरिक आपला जीव मुठीत धरून ये-जा करत असतात. यातून पायी चालणार्याला तर एक ते दोन फूट पाण्यातून आपला मार्ग काढावा लागतो. यातून चालत जायचे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणेच. कारण या डबक्यात विषारी प्राण्यांचा देखील वावर असतो. याच रस्त्यावरील महावितरण उपक्रेंद समोरील खड्ड्यात चारचाकी वाहने पूर्णपणे खाली टेकते, यातून काही वाहनांचे मोठे नुकसान देखील झाले आहे.
हा रस्ता येवला व वैजापूर या मुख्य मार्गाला जोडला जाणारा रहदारीचा रस्ता असून याच मार्गाने एस. एस. जी. एम. महाविद्यालयाला हजारो मुले-मुली ये-जा करत असतात. आज कोरोना महामारीमुळे महाविद्यालये बंद असल्याने या रस्त्याने सध्या तरी शिकणार्या मुला-मुलींची गर्दी दिसत नाहीये. परंतु येत्या काही दिवसांत महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता असल्याने या रस्त्यावर रहदारीचे प्रमाण वाढणार आहे. पावसाळ्याचे दिवस व रस्त्यात खड्डे असल्याने दररोज या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत असून अनेकांना दुखापत झाली आहे. तर काहींच्या वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुढे काही विपरीत घटना होण्यापेक्षा कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने वेळीच जागे होत योग्य त्या उपाययोजना करत या खड्ड्यांवर कायमची उच्च प्रतीची मलमपट्टी करणे गरजेचे आहे.
हॉटेल व्हीआयपी ते येवला नाका हा भाग जरी नगरपालिकेच्या अंतर्गत येत असला तरी हा रस्ता पालिकेच्या मालकीचा नाहीये. परंतु यावरून प्रवास करणार्या नागरिकांना होणारा त्रास बघता लवकरच यावर मुरूम टाकण्यात येईल.
– बी. एस. वाघ (बांधकाम अभियंता, कोपरगाव पालिका)