‘धरु की सोडू’च्या चक्रात अडकले संगमनेर शहर पोलीस ठाणे! प्रभारी वाजवतात बदलीचे तुणतुणे; मात्र शहराच्या शांतता व व्यवस्थेचे वाजले बारा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
निष्क्रिय अधिकार्‍याच्या बदलीला चार महिने लोटूनही संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाचा दुष्काळ काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तात्पूरती नियुक्ति झालेल्या ‘प्रभारी’ अधिकार्‍यांनी सुरुवातीपासूनच बदलीचे तुणतुणे वाजवण्यास सुरुवात केल्याने गेल्या चार महिन्यात त्यांना ना कर्मचार्‍यांवर वचक बसवता आला, ना गुन्हेगारांवर. त्यांची ही ‘धरु की सोडू’ वृत्ती गुन्हेगारी घटकांना फायदेशीर ठरली असून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः बारा वाजले आहेत. चोरट्यांच्या उद्रेकासह शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचाही बोजवारा उडाला असून नागरिक दररोज पोलिसांच्या नावाने बोटं मोडीत आहेत. याबाबत पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधल्यास ‘आपण बदलीसाठी अर्ज’ दिल्याचे उत्तर मिळत असल्याने संगमनेरचा कारभार सध्या ‘रामभरोसे’ असल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.

शहर पोलीस ठाण्यातून उचलबांगडी होवून मुख्यालयी ‘विश्राम’ करीत असलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची संगमनेरातील संपूर्ण कारकीर्द अतिशय वादग्रस्त, पोलिसांची प्रतिमा मलीन करणारी आणि निष्क्रिय राहिली. त्यांच्या येथील दीड वर्षाच्या कालावधीत पोलिसांच्या अंतर्गत संबंधावर विपरित परिणाम होवून कर्मचार्‍यांमध्ये हप्तेखोरी आणि कामचुकारपणा वाढीस लागला. यावरुन स्थानिक नागरीकांनी व माध्यमांनी वेळोवेळी आवाज उठवल्याने प्रत्येकवेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी त्याची दखल घेत पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यावर कारवाईचा आसूड उगारला. मात्र दरवेळी त्यांनी आपल्या राजकीय वरदहस्तासमोर जावून ‘लोटांगण’ घालण्यास सुरुवात केल्याने प्रत्येकवेळी ते पोलीस अधीक्षकांनाही वरचढ ठरले. त्याचा परिणाम त्यांची मुजोरी वाढण्यात झाल्याने पोलीस ठाण्यासह शहरातील परिस्थिती दिवसोंदिवस बिघडत गेली.

उपलब्ध माहितीनुसार तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी जवळपास अर्धाडझन वेळा पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यावर कारवाईसाठी पाऊल उचलले होते. मात्र प्रत्येकवेळी पोलीस निरीक्षक देशमुखसारख्या अधिकार्‍यांनी त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे ‘आपले कोणीच काही वाकडे करु शकत नाही’ हा अहंम त्यांच्या मनात बळावत गेल्याने संगमनेरात यापूर्वी कधीही न घडलेल्या घटना, अंमली पदार्थ व अनैतिक व्यवसायांची मुहूर्तमेढही याच निष्क्रिय पोलीस निरीक्षकांच्या कारकीर्दीत संगमनेरात रोवली गेली. शहरात एकामागून एक घडणार्‍या गुन्हेगारी घटना आणि तपासातली शून्यता यामुळे ही स्थिती इतकी खालावली की शहरात कायद्याचे राज्य आहे की नाही अशीही एकवेळी स्थिती निर्माण झाली होती. मात्र जोपर्यंत पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच वरदहस्त सत्तेत होता, तोपर्यंत त्यांना येथून दुसरीकडे हलविण्याचे धारिष्ट्य कोणीही दाखवू शकले नाही.

जुलैत राज्यात सत्तांतर झाले आणि त्यानंतर काही दिवसांतच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवृत्तीपूर्व विश्रांतीसाठी मुख्यालयाचे आवतणं प्राप्त झाले. त्याच दरम्यान गणेशोत्सव, नवरात्रासारखे उत्सवही समोर येवून ठेपले. मात्र सत्तांतरानंतर विखे मंत्रीपदी विराजमान झाल्याने आणि त्यांचा बाळासाहेब थोरात यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष सर्वश्रृत असल्याने राज्यात ‘भाजप-शिवसेना (शिंदे गट)’ सरकार स्थापन झाल्यानंतर संगमनेरात नियुक्तिसाठी कोणीही पुढे येईना. त्यामुळे अखेर पोलीस अधीक्षकांनी मुख्यालयातील राजेंद्र भोसले या पोलीस निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरुपात संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार घेण्याचा सूचना केल्या.

मात्र संगमनेरात येताच त्यांना विखे-थोरात यांच्यातील सुप्त संघर्षासह येथील जटील कायदा-सुव्यवस्थेचे चटके बसू लागल्याने गणेशोत्सव पार पडताच त्यांनी पोलीस अधीक्षकांना विनंती अर्ज पाठवून पुन्हा मुख्यालयी बोलावण्याचे मागणे घातले. मात्र संगमनेरसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यासाठी जिल्ह्यात ‘त्या’ हिमतीच्या अधिकार्‍याची वाणवा असल्याने गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या संगमनेर शहर पोलीस ठाण्याला अद्यापपर्यंत कायमस्वरुपी खमक्या अधिकारी आजही भेटलेला नाही. सध्या कार्यरत असलेले अधिकारी येथे सेवा करण्याच्या बाबतीत पूर्वीच मानसिक खचलेले असल्याने त्यांच्याकडून शहराची बिघडलेली घडी पूर्ववत होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे त्यांची गेल्या चार महिन्यांची येथील कारकीर्दही पूर्वीच्या निष्क्रिय पोलीस निरीक्षकांच्या पावलावर पाऊल ठेवणारीच ठरली आहे.

सध्या संगमनेरात सर्व प्रकारच्या अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असून राज्यात गाजलेले गोवंश जनावरांचे कत्तलखाने, अवैधपणे होणारी वाळू वाहतूक, महिलांचे दागिने ओरबाडण्याच्या घटना, बसस्थानकावरील सुरक्षा, दररोज घडणार्‍या दुचाकी चोरीच्या घटना, हाणामार्‍या आणि चोरीच्या घटनांसह शहरातील रस्त्यारस्त्यावर वाहनांच्या कोंडीमध्ये एकसारखी वाढ होत असून मलिदा लाटण्यात व्यस्त असलेल्या अधिकार्‍यांकडे याबाबत विचारणा केली असता ‘आपण बदलीसाठी अर्ज दिला आहे’ असे उत्तर मिळत असल्याने संगमनेरच्या पोलीस दलात सध्या सर्व आलबेल असल्याचे चित्र दिसत असून ‘बदली अर्जाच्या’ माध्यमातून पोलिसांना एकप्रकारे दुकानदारीचाच परवाना मिळाल्यासारखे चित्र दिसू लागले आहे.


संगमनेरचे उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश प्राप्त होवून अनेक महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र केवळ राजकीय कारणांमुळे येथील रिक्त झालेल्या जागांवर अधिकार्‍यांची नियुक्ती केली जात नसल्याची चर्चा सध्या संगमनेरात सुरु आहे. मात्र दोन नेत्यांमधील राजकीय वादाचा फटका सामान्य नागरिकांना सोसावा लागत असल्याने अशाप्रकारच्या सूडाच्या राजकारणाबाबत नागरिकांमधील नाराजीही वाढत आहे.

Visits: 212 Today: 1 Total: 1413893

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *