ठेवीदारांनो, घाबरु नका! आम्ही आहोत.. संचालक मंडळाचे आवाहन; सहकार उपनिबंधकांचे पत्र..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहराच्या सहकारी पतसंस्थांमध्ये अग्रक्रमावर असलेल्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पतसंस्थेबाबत उठलेल्या आवईनंतर ठेवीदारांनी भीतीपोटी बँकेत गर्दी करायला सुरुवात केली आहे. वास्तविक या संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून 136 कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या पतसंस्थेने 119 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेने केलेली गुंतवणूकही 35 कोटींहून अधिक असल्याने बँकेबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवण्यात आली आहे. एकाचवेळी अनेकांनी ठेवी परत घेण्यासाठी गर्दी केल्यास कोणत्याही संस्थेत असाच प्रकार घडतो, ठेवीदारांनी घाबरुन न जाता, संचालक मंडळावर विश्वास ठेवावा. आठ ते पंधरा दिवसांत सर्वांना टप्प्याटप्प्याने त्यांचे पैसे मिळतील असे आवाहन संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे. संस्थेच्या आर्थिक स्थितीबाबत पसरवण्यात आलेली अफवा चार महिन्यांनी होवू घातलेली निवडणुकीला समोर ठेवून उठवण्यात आल्याचीही सध्या चर्चा सुरु आहे.

शुक्रवारी (ता.27) दुपारी अचानक राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पतसंस्थेत ठेवीदारांची गर्दी होवू लागली. जो-तो मुदतठेव म्हणून विश्वासाने बँकेकडे सोपवलेले पैसे परत घेण्यासाठी धडपडू लागला. अचानक सुरु झालेला हा प्रकार पाहुन बँकेतील कर्मचारीही गोंधळले. त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांसह संचालक मंडळाला याबाबत सूचना दिल्यानंतर त्यांनी बँकेत येवून ठेवीदारांची समजूत घालण्याचा आणि बँकेची आणि संचालकांचीही आर्थिक स्थिती भरभक्कम असल्याचा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. मात्र यापूर्वी दूधगंगा सारख्या मोठ्या ठेवींच्या सहकारी पतसंस्थांमध्ये झालेले घोटाळे ताजे असल्याने कोणीही त्यावर विश्वास ठेवायला तयार होईनात.

त्यानंतर तासाभराने संगमनेरचे सहकार उपनिबंधक संतोष कोरे यांनी प्रसिद्धी माध्यमांसाठी अधिकृत निवेदन जारी केले. त्यात त्यांनी अहमदनगर कार्यकक्षा असलेल्या आनंदऋषी पतसंस्थेची 31 मार्च 2024 अखेरची आर्थिक स्थिती विशद केली. त्यानुसार त्या तारखेला संस्थेकडे 136 कोटी पाच लाख रुपयांच्या ठेवी असून 118 कोटी 99 लाखांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. संस्थेची एनपीए गुंतवणूक तीन कोटी असून इतर बँकांमध्ये केलेल्या गुंतवणूकीसह ती एकूण 35 कोटी चार लाख रुपये आहे. या संस्थेची आर्थिक स्थिती उत्तम असून कोणीही बोगस, बिनबुडाच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व ठेवी परत घेण्यासाठी बँकेत गर्दी करु नये असे जाहीर आवाहनही त्यांनी केले.

एकाचवेळी ठेवीदारांनी गर्दी केल्यास सर्वांना लगेच ठेवी परत करणे अशक्यप्राय आहे. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली असल्याने संस्थेत असलेल्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी कर्जातून मिळणार्या पैशातून परत केल्या जावू शकतात. त्यामुळे ठेवीदारांनी एकाचवेळी पैसे काढण्यासाठी गर्दी करु नये अशी विनंतीही सहकार उपनिबंधक कोरे यांनी लिखित पत्राद्वारे केली आहे. याच प्रसिद्धीपत्रकाला संलग्न करुन संस्थेच्या संचालक मंडळानेही संस्था आणि संचालक दोघेही आर्थिक सक्षम असल्याचा विश्वास देत कोणाच्याही कष्टाचा एक रुपयाही बुडणार नाही असा भरवसा ठेवीदारांना दिला आहे.

शहराच्या पतसंस्था चळवळीत आघाडीवर असलेल्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक आगामी चार महिन्यात होवू घातली आहे. त्या दृष्टीकोनातून संस्थेबाबत उठलेल्या अफवेकडे पाहिले जात आहे. सध्या या बँकेच्या अध्यक्षपदी नंदनमल बाफना असून त्यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळ शहरातील नावाजलेल्या घराण्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे संस्थेबाबत उठलेली आवई अफवाच असल्याचा विश्वासही संस्थेच्या अनेक ठेवीदारांना आहे.

