नराधम पित्याला बारा वर्षांचा सश्रम कारावास! साडेअकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार; आठवड्यात दुसरा कठोर निर्णय..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दारुच्या व्यसनाला कंटाळून माहेरी निघून गेलेल्या पत्नीमूळे असाहाय्य झालेल्या अवघ्या साडेअकरा वर्षाच्या चिमुरडीवर नराधम पित्याने वारंवार शारीरिक अत्याचार केले. दोन महिने चाललेल्या या अमानुषतेमूळे घाबरलेली पीडित अल्पवयीन मुलगी ऐन गणेश विसर्जनाच्या दिनी रात्रभर थंडीत कुडकुडत गच्चीवर लपून राहिली आणि पहाट होताच थेट मावशीचे घर गाठले. मनाचा थरकाप उडवणार्या या घटनेनंतरही भीतीपोटी ही गोष्ट पीडितेने आपल्या आईला सांगितली नाही. मात्र महिन्याभराने जेव्हा आईने पुन्हा नांदायला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मात्र नराधम पित्याने आपल्या पोटच्या गोळ्यावर केलेल्या अमानवीय अत्याचारावर प्रकाश पडला. 2021 मध्ये घडलेल्या या संतापजनक प्रकरणात संगमनेरचे अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी आरोपीला ‘पोक्सो’च्या गुन्ह्यात दोषी ठरवून 12 वर्षांचा सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये दंड ठोठावला आहे. आठवडाभरात त्यांनी सुनावलेली ही दुसरी कठोर शिक्षा आहे.
कानावर पडताच संताप निर्माण करणारी ही धक्कादायक घटना जुलै 2021 मध्ये शहरानजीकच्या ग्रामपंचायत हद्दित घडली होती. नजीकच्या एका दूध डेअरीमध्ये टँकर चालक म्हणून कार्यरत असलेल्या 34 वर्षीय नराधमाला दारुचे व्यसन जडले होते. त्यामुळे दररोज कामावरुन घरी येताना तो तर्राट होवून यायचा आणि काही ना काही कारणावरुन पत्नीशी भांडण करायचा. त्याच्या रोजच्या अशा वागण्याला वैतागलेल्या 32 वर्षीय विवाहितेने अखेर दारुड्या नवर्याला सोडून आपली साडेअकरा वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाच्या मुलासह पुणे जिल्ह्यातील आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र नराधम पित्याने मनात काहीतरी ठरवून आपल्या पत्नीला मुलीला सोबत नेवू दिले नाही.
16 जुलै 2021 रोजी घडलेल्या या प्रकारानंतर आरोपी वारंवार दारुच्या नशेत घरी येवून आपल्या अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार करु लागला. त्या लहानशा जिवाला आपला जन्मदाता बाप आपल्यासोबत काय करतोय याचीही कल्पना नसावी. मात्र त्यातून होणार्या यातनांनी तो कोवळा जीव पूरता हादरला होता. अधुनमधून पीडितेने बापाचा फोन घेवून आईला आपली व्यथा सांगण्याचाही प्रयत्न केला. मात्र दरवेळी नराधमाने काही बोलण्यापूर्वीच तिच्या हातातून फोन हिसकावून घेत उलट पत्नीलाच शिवीगाळ केली. या सगळ्या प्रकारांमुळे पीडित चिमुरडी अतिशय घाबरली होती.
18 सप्टेंबर 2021 रोजी गणेश विसर्जनाच्या रात्रीही नराधम पिता दारुच्या नशेत झिंगून घरी आला. आपला दारुडा बाप घरी आल्यावर त्याला गिळायला अन्न लागेल म्हणून नेहमीप्रमाणे त्या इवल्याशा जिवाने भाजी करुन चार-सहा भाकरीही थापून ठेवल्या होत्या. मात्र या सर्वांचा मनात सैतान जागलेल्या पित्यावर कोणताही परिणाम होत नव्हता. त्याप्रमाणे त्या रात्रीही त्याने आपल्या इवल्याशा मुलीवर बळजबरी करुन अत्याचार केला आणि तो झोपी गेला. रोजच्या या प्रकाराने आतून पूर्णतः भेदरलेल्या त्या छोट्याशा मुलीने घराचा दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीचा काळोख आडवा आल्याने तिने घराच्या गच्चीवर जावून आडोसा घेतला. पावसामुळे बाहेर प्रचंड गारवा असतानाही तो कोवळा जीव रात्रभर मुसमुसत गच्चीच्या कोपर्यात दडून राहीला.
पहाटेच्यावेळी रस्त्यावरुन पायी जाणार्यांसह दूध घालण्यास निघालेल्यांची वर्दळ कानावर येताच तिने मांजरीच्या पावलाने खाली येत तेथून धूम ठोकली आणि संगमनेरात राहणार्या आपल्या मावशीचे घर गाठले. पहाटे सहा वाजता बहिणीच्या मुलीला पाहून घाबरलेल्या पीडितेच्या मावशीने लागलीच माहेरी असलेल्या आपल्या बहिणीला फोनवरुन याची माहिती दिली. दुसर्या दिवशी पीडितेच्या मुलीला तिच्या आईने आपल्यासोबत मामाच्या गावी नेले. मात्र या दरम्यान पीडित चिमुरडीने ना मावशीकडे काही सांगितले, ना आईकडे. त्यामुळे दारुच्या नशेत तिचा बाप केवळ तिला मारहाण करीत असेल असाच त्यांचा समज होता. एखादा जन्मदाता बापच आपल्या पोटच्या गोळ्यावर अशाप्रकारचे पाप करील याची पूसटशीही कल्पना त्या सगळ्यांनी नव्हती.
त्यामुळे त्यानंतर महिनाभर माहेरी राहिल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पुन्हा सासरी नांदायला जाण्याबाबत माहेरी विचारणा केली. ते ऐकून साडेअकरा वर्षांच्या चिमुरडीने रडायला सुरुवात केली. आपल्याला संगमनेर नको, आपण इथेच राहु मामाच्या घरी अशी विनवणी ती करु लागली. त्यामुळे संशय आल्याने तिच्या आईने तिला विश्वासात घेवून काय झाले अशी विचारणा केली असता पीडित मुलीने आई माहेरी आल्यानंतरच्या दोन महिन्यात तिच्यावर गुदरलेला भयंकर प्रसंग कथन केला. हे सगळं ऐकून सून्न झालेल्या माहेरच्या लोकांनी या नराधमाला बेड्याच ठोकल्या पाहिजेत असा ठाम विचार करुन संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले अणि तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तत्काळ गुन्ह्याची नोंद करुन 34 वर्षीय आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला कारागृहात टाकले. पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी या प्रकरणाचा खोलात जावून तपास करीत भक्कम साक्षी-पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
अतिरीक्त सरकारी वकिल मच्छिंद्र गवते यांनी सरकारपक्षाकडून जोरदार युक्तिवाद करीत सात साक्षीदारांची तपासणी घेतली. पीडितेची वैद्यकिय तपासणी करणार्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.छाया लोहारे आणि जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.गहिनीनाथ खेडकर यांची साथ महत्त्वपूर्ण ठरली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिलीप घुमरे यांनी 34 वर्षीय आरोपी वाहनचालकाला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्यातील (पोक्सो) तरतूदींनुसार दोषी ठरवून 12 वर्षांचा सश्रम कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात स्मिता सस्कर यांनी सहाय्यक सरकारी वकिलांची भूमिका पार पाडली. सहाय्यक फौजदार प्रवीण डावरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा थोरात, पी.एस.साबळे, दीपाली रहाणे, स्वाती नाईकवाडी यांनी पैरवी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
गेल्या तीन वर्षात शहरालगतच्या परिसरात नराधम पित्यांनी आपल्या पोटच्या मुलींवरच अत्याचार केल्याच्या दोन प्रकरणांचे खटले येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दिलीप घुमरे यांच्यासमोर सुरु होते. त्यातील पहिल्या खटल्याच्या निकाल चारच दिवसांपूर्वी देण्यात आला. त्या प्रकरणातील आरोपीची पत्नीही त्याच्या व्यसनामूळे निघून गेली होती. पंधरा वर्षाची मुलगी आणि बारा वर्षाच्या मुलासह तो आपल्या आई सोबत राहत होता. त्या दरम्यान त्याने आपल्या मुलीवर अत्याचार केला. मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार आजीकडे केल्यानंतर तो प्रकार उघड झाला होता. त्या खटल्यातील आरोपी पित्याला 12 वर्षांचा सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. त्या निकालानंतर चारच दिवसांत दुसर्याही नराधम पित्याला कठोर शिक्षा झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.