लेखी आश्वासनानंतर श्रीरामपूरातील सफाई कामगारांचे आंदोलन मागे

लेखी आश्वासनानंतर श्रीरामपूरातील सफाई कामगारांचे आंदोलन मागे
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर पालिकेचे आधीचे ठेकेदार दिशा एजन्सी (पुणे) यांनी कंत्राटी सफाई कामगारांचा थकीत दीड महिन्याचा पगार तातडीने अदा करण्याची वारंवार मागणी करूनही पगार न केल्याने सफाई कामगारांनी यूनियनचे जीवन सुरूडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता.30) पालिकेत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, नगराध्यक्षा अनुराधा आदिक व मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी पगार जिल्हाधिकार्‍यांची मान्यता घेऊन तातडीने करण्याचे लेखी आश्वासन दिलेनंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.


श्रीरामपूर पालिकेने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत संपूर्ण शहराचा साफ सफाईचा ठेका हा दिशा एजन्सीस दिलेला होता. सदर ठेकेदाराकडील सफाई कर्मचार्‍यांचा माहे जून 2020 ते 15 जुलै, 2020चा एकूण दीड महिन्यांचा थकीत पगार एकूण रक्कम 34 लाख 47 हजार 976 अदा झाली नसल्याने कामगार यूनियनने पालिकेत बुधवारी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सध्या मे. सुधर्म इन्व्हायरमेंट सोल्युशन प्रा. लि. चांदवड (नाशिक) ही संस्था काम करत आहे. परंतु, नवीन एजन्सीचे काम सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनी माहे जूनपासून घनकचरा व्यवस्थापनाकरिता दिलेल्या नवीन मान्यतेच्या कालावधीतच नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दिशा एजन्सीने दीड महिने सफाईचे कामकाज केले. या कामकाजाचे बील मंजूर करणेकरिता पालिकेमार्फत जिल्हाधिकार्‍यांना प्रस्तावही सादर करण्यात आला होता. मात्र, काही तांत्रिक कारणामुळे ते फेटाळले गेले. त्यामुळे सदर सफाई कामगारांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आंदोलनात लखन दांडगे, राहुल दाभाडे, चंद्रकांत दळवी, योगेश शेलार, अमोल मरसाळे, बाबा जोशी, प्रकाश त्रिभुवन, दीपक शेलार, नीलेश जाधव, संदीप राखपसरे, दिनेश तुसंबड, राकेश झिंगारे, लक्ष्मी शिंदे, कलावती भालेराव, विमल भालेराव, सुशीला त्रिभुवन, जयश्री पेटारे, शारदा दळवी आदी सहभागी झाले होते.

Visits: 228 Today: 3 Total: 2163579

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *