गोतस्करांकडून दोघा गोरक्षकांना चिरडण्याचा प्रयत्न! औरंगपूर शिवारातील घटना; सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा..

नायक वृत्तसेवा, आश्‍वी
गेल्याकाही दिवसांपासून संगमनेर शहरातील गोहत्या आणि त्यामागील शहर पोलिसांची भूमिका यावर चर्चेचे फड रंगलेले असताना आता आश्‍वी पोलीस ठाण्याच्या हद्दितून अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात रात्रीच्या अंधारात गुपचूप गायींची चोरटी वाहतूक करताना आढळलेल्या दोघांना थांबण्याचा इशारा केला म्हणून दोघा गोरक्षकांना चक्क टेम्पोखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या दोघांचेही दैवबलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. या प्रकरणी आश्‍वी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नासह घातक शस्त्रांचा वापर करुन दुखापत करणे व एका समुदायाच्या प्रतिकाची विटंबना करण्याच्या कलमांसह समद गणीमहंमद शेख व त्याचा साथीदार साहील सय्यद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर औरंगपूर, गोगलगाव परिसरात तणाव निर्माण झाला होता.

याबाबत आश्‍वी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शुक्रवारी (ता.9) रात्री अकराच्या सुमारास निमगाव जाळीतून जाणार्‍या औरंगपूर-गोगलगाव रस्त्यावर घडली. या घटनेतील जखमी सागर चौधरी (वय 18, रा.गोगलगाव, ता.राहाता) हा दुचाकीवरुन आपल्या जोडीदारासह या रस्त्यावरुन आपल्या घराकडे चालला होता. यावेळी त्यांना औरंगपूर शिवारातील पाट्याच्या लगत एका चारचाकी टेम्पोतून (क्र.एम.एच.20/ई.जी.9483) चदोन गावरान गायी व चार वासरांची वाहतूक होताना दिसली. संशय बळावल्याने त्यांनी सदरील टेम्पोला ओलांडून पुढे जात चालकाला थांबण्याचा इशारा केला व काही अंतर पुढे जावून त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली.


यावेळी पाठीमागून येत असलेल्या टेम्पोला दुचाकीवर बसलेल्या ‘त्या’ दोघांनीही पुन्हा थांबण्याचा इशारा केला. मात्र रात्रीची वेळ आणि सुनसान रस्ता पाहून मानवाच्या वेशातील सैतानाची वृत्ती जागली आणि गायींची चोरटी वाहतूक करणार्‍या त्या टेम्पोच्या चालकाने थेट भरधाव वेगात त्या दोघांच्या अंगावरच टेम्पो चढवला. मात्र गोरक्षणाचे काम करणार्‍या या दोघाही तरुणांचे दैवबलवत्तर होते. टेम्पोच्या धडकेने त्यांच्या दुचाकीचा फुटबॉल झालेला असताना ते दोघेही त्यावरुन आश्‍चर्यकारकपणे बाजूला फेकले गेले. मात्र त्या भागात मोठ्या प्रमाणात दगड असल्याने त्यात सागर चौधरीला गंभीर दुखापती झाल्याने तो अत्यवस्था झाला.


यावेळी त्या दोघांनीही वाहनाकडे पाहिले असता आश्‍वीत राहणारा समद गणीमहंमद शेख (वय 20) हा गाडी चालवित असल्याचे व त्याच्या शेजारी साहील सय्यद (पूर्ण नाव माहिती नाही) हा बसलेला असल्याचे त्यांनी पाहिले. या घटनेनंतर किरकोळ जखमी झालेल्या तरुणाने फोनवरुन गावातील आपल्या मित्रांना माहिती देत जखमी झालेल्या सागर चौधरीला सुरुवातीला लोणीच्या प्राथमिक केंद्रात व त्यानंतर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदरची घटना घडल्यानंतर काही वेळातच लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात बजरंग दलाच्या गोरक्षकांची मोठी गर्दी जमा झाली. त्यामुळे रात्री औरंगपूर व गोगलगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


मध्यरात्रीच्या सुमारास जखमी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरुन आश्‍वी पोलिसांनी समद गणीमहंमद शेख (वय 20, रा.आश्‍वी) व त्याचा साथीदार साहील सय्यद (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) या दोघांविरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम 110, 118 (1), 324 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आला आहे. या घटनेनंतर रात्री आश्‍वी पोलीस ठाण्यातही जखमी तरुणाच्या समर्थनासाठी मोठ्या संख्येने तरुणांची गर्दी जमा झाली होती.


गेल्याकाही दिवसांपासून शहर व तालुक्यातील गोतस्करांसह काही कसायांचा उन्माद वाढला असून यापूर्वी कधीही न घडलेल्या घटना घडवण्याचा पायंडा घालण्याचे षडयंत्र राबवले जात आहे. या घटनेत ‘त्या’ दोघाही तरुणांचे दैव बलवत्तर होते म्हणून त्यांचा जीव वाचला, अन्यथा आश्‍वीच्या या गोतस्कराने त्या दोघांचाही जीव घेण्यात कोणतीही कसर सोडलेली नव्हती. संगमनेर तालुक्यात असाप्रकार यापूर्वी कधीही घडलेला नाही, अशा घटनेतून संपूर्ण तालुक्याचे सौहार्द धोक्यात येवू शकते. याची गांभीर्याने दखल घेवून पोलिसांनी अधिक कठोरपणे या प्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे.

Visits: 4 Today: 2 Total: 17282

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *