पठारभागातील शेतकर्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा ऊन-सावलीच्या खेळामुळे दुबार पेरणीची शेतकर्यांना भीती
नायक वृत्तसेवा, घारगाव
जुलै महिना सुरू झाला असूनही पावसाने दडी मारल्याने संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे तर छोटे-मोठे पाझरतलावही कोरडेठाक पडले आहेत. त्यातच खरीपाच्या पेरण्या उरकल्या असल्याने शेतकर्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून नजरा आभाळाकडे खिळल्या असल्याचे चित्र दिसत आहे.
पठारभागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे शेतकरी देखील पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या वेळेत करतात. यंदा जून महिन्यात थोड्याफार प्रमाणात ठिकठिकाणी पाऊस झाला. या भरवशावर शेतकर्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. तर अजूनही काही शेतकर्यांच्या पेरण्या सुरू आहेत. मात्र जून महिना संपला, जुलै महिना सुरू झाला. तरी देखील पावसात सातत्य नाही. सकाळी दहानंतर कडक ऊन पडत तर दुपारी पावसाचे ढग असे विरोधाभासी चित्र दिसत आहे. यामुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
पावसाचा हा ऊन-सावलीचा खेळ असाच सुरू राहिला तर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते अशी भीतीही शेतकर्यांना सतावत आहे. एकतर पाऊस पडूनही पाणी साठविण्याचे स्त्रोत पठारभागात कमी आहे. त्यात विहिरींनीही तळ गाठला आहे. तर छोटे-मोठे सिमेंट बंधारे, पाझरतलावही कोरडेठाक पडले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पठारभागावरील काही गावांसह वाड्या-वस्त्यांना अजूनही पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. यावरुन पठारभागातील दुष्काळाचे भयाण वास्तव दिसून येते.
पठारभागातील अनेक गावे सेंद्री लालकांद्याचे आगार म्हणून ओळखली जातात. मात्र यंदा शेतकर्यांनी लाल कांद्यापेक्षा सोयाबीनला मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढला आहे. परंतु, पाऊस नसल्याने पठारभागातील शेतकरी चिंतेत सापडले आहे.