घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणार्‍यांवर संक्रांत! उपअधिक्षकांच्या पथकाकडून छापे; फास्टफूड व्यावसायिकांची पळापळ..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठ्या कालावधीनंतर संगमनेर शहरातील हॉटेल, हातगाड्यांवरील फास्टफूड, खाद्य पदार्थ, चहा व वाहनांनासाठी बेकायदा घरगुती गॅसचा वापर करणार्‍यांविरोधात संगमनेरच्या पोलीस उपअधिक्षकांनी एल्गार पुकारला आहे. आज सकाळपासून पोलिसांची विविध पथके शहराच्या वेगवेगळ्या भागात छापे घालीत आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांनी जवळपास डझनभर हातगाडी आणि हॉटेल व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. एरव्ही तहसीलदार अथवा पुरवठा विभागाकडून अशाप्रकारची कारवाई होणे अपेक्षित असताना चक्क पोलीस उपअधिक्षकांनीच कायद्याचा दांडा हाती घेतल्याने अशाप्रकारे स्वयंपाकाच्या गॅसचा बेकायदा वापर करणार्‍यांचे धाबे दणाणले असून अनेकांच्या व्यवसायावरच संक्रांत कोसळली आहे.


गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरातील फास्टफूड व अन्य खाद्यपदार्थ, चहाच्या टपर्‍यांसह अनेक छोट्या-मोठ्या हॉटेल्समध्ये घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिलेंडरबाबत असलेल्या शासकीय योजनेचा लाभ आणि त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी घरगुती ग्राहकाला सिलेंडर मिळवण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. मात्र असे असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर होत असतानाही संगमनेरचे तहसीलदार आणि त्यांच्याच नियंत्रणातील पुरवठा विभाग सुस्त होवून बसला होता. त्यामुळे संगमनेरात अशाप्रकारे बेकायदा गॅस भरुन देणार्‍यांच्या संख्येतही मोठी वाढ होवून त्यातही माफिया राज रुजायला सुरुवात झाली होती. मा, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी आपल्या कर्तव्याला जागताना आज पोलीस पथकांना शहराच्या वेगवेगळ्या भागात जावून सरसकट गुन्हे दाखल करण्याचे आदेश बजावले.


त्यानुसार थेट पोलीस उपअधिक्षकांच्या नियंत्रणातील चार पथके शहराच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर असलेल्या हॉटेल्स, चहाच्या टपर्‍या, वडा-पाव, भजी यासह नाश्त्याची अन्य ठिकाणं, केटरींगचा व्यवसाय करणारे आचारी, पावभाजी व अन्य फास्टफूडचे विक्रेते, वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरुन देणारी ठिकाणं अशा सगळ्यांचाच शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. सकाळी सुरु झालेल्या या विशेष मोहीमेत वृत्त लिहेपर्यंत डझनावर जणांवर कारवाईचा बडगा उगारला गेला होता. त्यांच्या व्यावसायिक ठिकाणांवर सापडलेल्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरसह अन्य सामानही पोलिसांनी जप्त केले आहे. एकीकडे त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे पोलीस पथकांकडून कारवायांचा धडाकाही सुरुच आहे. त्यामुळे रस्त्यावर हातगाडी लावून खाद्य पदार्थ विक्रिचा व्यवसाय करणार्‍यांसह हॉटेल व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहेत.


व्यवसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करण्यास मनाई असतानाही अनेकजण त्याचा सर्रास वापर करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या विरोधात कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. अशाप्रकारच्या बेकायदा वापरातून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असते, त्यातून असा व्यवसाय करणार्‍यांसह सामान्य नागरिकांच्या जीविताला धोका होवू शकतो. त्यामुळे बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडर वापरणार्‍यांची गय केली जाणार नाही. व्यवसाय करणार्‍यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच वापरले पाहिजे. पोलिसांनी सुरु केलेल्या कारवाईत सातत्य ठेवणार असून शहरातील घरगुती गॅसचा बेकायदा वापर पूर्णतः थांबवण्याचा प्रयत्न आहे.
सोमनाथ वाघचौरे
पोलीस उपअधिक्षक, संगमनेर उपविभाग

Visits: 6 Today: 2 Total: 21226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *