नरवीर सिदोजी निंबाळकरांच्या स्मृतीप्रित्यर्थ विश्रामगडावर शौर्यपूजन हौतात्म्य नव्या पिढीला माहित होण्यासाठी शिवराष्ट्र हायकर्सचा उपक्रम

नायक वृत्तसेवा, अकोले
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन असलेला अकोले तालुक्यातील पट्टाकिल्ला अथवा विश्रामगड परिसरात 18 ते 20 नोहेंबर 1679 मध्ये तीन दिवस आणि तीन रात्रींचा घनघोर रणसंग्राम होवून छत्रपतींना मुघल फौजेपासून वाचविले. या रक्तरंजित लढाईत स्वराज्याचे पंचहजारी सरदार नरवीर सिदोजी नाईक निंबाळकर आणि हजारो मावळ्यांनी आपल्या राजाला वाचवण्यासाठी लढता लढता बलिदान दिले. हा बहुमूल्य इतिहास नुकताच प्रकशात आलेला आहे. यानिमित्ताने ‘शिवराष्ट्र हायकर्स संगमनेर – नगर’तर्फे किल्ले विश्रामगड अथवा पट्टाकिल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नरवीर सिदोजी नाईक निंबाळकरांच्या समाधीचे शौर्यपूजन डॉ. महादेव अरगडे आणि दीपक कर्पे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवरायांच्या आयुष्यातील शेवटची मोठी मोहीम ‘जालनापूरची स्वारी’ इतिहास प्रसिद्ध आहे. या मोहिमेच्या शेवटी संगमनेर ते विश्रामगड दरम्यान हा रक्तरंजित रणसंग्राम घडून आला. पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांड्यांशी बलिदानाचे नाते सांगणारे सिदोजी निंबाळकरांचे हौतात्म्य नव्या पिढीसमोर यावं, याच मातीतील हा प्रेरणादायी इतिहास अधिकाधिक जनमाणसांपर्यंत जावा या प्रमुख उद्देशाने शौर्यपूजन मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याचे शिवराष्ट्रचे नगर जिल्हाप्रमुख संतोष शेळके यांनी सांगितले.

याप्रसंगी इतिहास अभ्यासक आणि शिवव्याख्याते दीपक कर्पे यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले. सिदोजी निंबाळकर.. अमर रहे, हरहर महादेव… जय भवानी.. जय शिवराय… या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. यावेळी गडफेरीमध्ये विश्राम गडाच्या उत्तर बाजूचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. यामध्ये सुखदेव इल्हे, बाळासाहेब पिंगळे, अरुण जाधव, किसन आहेर, लक्ष्मण कोते, राजेंद्र मुसळे, तान्हाजी आंधळे, संभाजी गुंजाळ, शारदा अरगडे, ज्योती शेळके, योगिता जाधव, निर्मला मुसळे, सुनंदा कोते, डॉ. समर्थ अरगडे आदिंनी सहभाग घेतला.
