झोळ्यातील खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश! ‘त्या’ चिठ्ठीलाच फुटली वाचा; व्हाया झारखंड झोळ्यातील एकाला अटक..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या सोमवारी (ता.5) तालुक्यातील झोळे येथील 77 वर्षीय इसमाच्या खुनाची उकल करण्यात संगमनेर तालुका पोलिसांना अखेर यश आले आहे. अतिशय गुंतागुंतीच्या या तपासात घटनास्थळावर पोलिसांना सापडलेल्या एका चिठ्ठीने या प्रकरणाला वाचा फोडली आणि पोलिसांनी सुतावरुन स्वर्गाचा धागा विणताना व्हाया झारखंड प्रवास करीत झोळ्यात येवून भूषण कांताराम वाळे (वय 23) या स्थानिक तरुणाला अटक केली आहे. आरोपीने खुनाची कबुली दिली असून या घटनेत त्याला आणखी कोणी मदत केली याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. विशेष म्हणजे सोशल माध्यमातून आरोपीची झारखंड मधील एका तरुणीशी ओळख झाली व नंतर त्यांच्यात ऑनलाईन प्रेमसंबंधही निर्माण झाले, त्यातूनच हा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले असून खुनामागील हेतू आणि प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग शोधला जात आहे.


गेल्या सोमवारी (ता.5) संगमनेर शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या झोळे गावात साहेबराव भिमाजी उनवणे (वय 77) यांचा झोपेत असतानाच कोणीतरी अज्ञाताने डोक्यात काहीतरी टणक वस्तूचा प्रहार करुन खून केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी मयत वृद्धाचा मुलगा दीपक उनवणे याने तक्रार दाखल केल्यानंतर तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. त्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलीस उपअधिक्षक आणि तालुका पोलिसांचे स्वतंत्र पथक तयार करुन घटनास्थळावर सापडलेल्या ‘त्या’ चिठ्ठीच्या आधारे झारखंडमधील जंगलाच आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु झाला.

या दरम्यान तांत्रिक विश्‍लेषणावरुन आरोपी पोलिसांची दिशाभूल करण्यात माहीर असल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलिसांनी कोणतीही घाई न करता प्रत्येक गोष्ट पडताळूनच पावलं टाकली. त्यातून झोळ्यातील या भूषण कांताराम वाळे या तरुणाची झारखंडमधील एका मुलीशी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरुन ओळख झाली आणि नंतर त्याचे रुपांतर ऑनलाईन प्रेमात झाले. त्यानंतर या मुलीसोबत असलेले प्रेम टिकवण्याच्या नादातच त्याच्याकडून हा खून घडवून आणला गेल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. या शिवाय अतिशय पद्धतशीरपणे घडलेला हा प्रकार आरोपीने एकट्याने घडवला की त्याला आणखी कोणी साथीदार आहेत याचाही पोलिसांकडून शोध सुरु आहे.


या प्रकरणात खुनाचा हेतू स्पष्ट होत नसल्याने सुरुवातीला पोलिसांचा तपास मयताच्या कुटुंबियांभोवतीच फिरत होता. मात्र त्याचवेळी घटनास्थळावर एक चिठ्ठी आढळून आली. त्यात झारखंडमधील सुपारी गुंडांनी हा प्रकार घडवल्याचे दर्शवून पोलिसांची दिशा भरकटवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पोलिसांनीही हाच धागा पकडून थेट झारखंड गाठले आणि खून झाल्याच्यावेळी झारखंडमधून संगमनेर तालुक्यात झालेल्या मोबाईल संभाषणांचे तांत्रिक विश्‍लेषण करुन आरोपीचा माग शोधला आणि अखेर गुरुवारी रात्री आरोपी भूषण कांताराम वाळे (वय 23, रा.झोळे) याला भक्कम पुराव्यांच्या आधारे बेड्या ठोकण्यात आल्या. या खुनामागे त्याचा नेमका हेतू काय होता याचा अद्याप उलगडा झालेला नसून लवकरच या प्रकरणामागील संपूर्ण सत्य समोर येईल.


अतिशय गुंतागुंतीच्या आणि संपूर्ण तांत्रिक विश्‍लेषणावर अवलंबून असलेल्या या प्रकरणाच्या तपासात विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर अधिक्षक वैभव कलूबर्मे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक सालोमन सातपुते, ईस्माईल शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक तुषार धाकराव यांच्यासह राहुल सारबंदे, राहुल डोके, सागर ससाणे, अमृत आढाव, सचिन धनाड, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, शिवाजी डमाळे, अमित महाजन, सहाणे, बाबासाहे शिरसाठ, सचिन सोनवणे आदी पोलीस कर्मचार्‍यांचा तपास पथकांमध्ये समावेश होता.

Visits: 9 Today: 3 Total: 20929

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *