थोरात दुसर्यांची तळी उचलण्यातच धन्य : मंत्री विखे पा. खालच्या पातळीवर घणाघाती टीका; मोठ्या फरकाने ‘दक्षिण’ दिग्विजयाचाही दावा..
नायक वृत्तसेवा, अहमदनगर
विश्वनेता म्हणून गौरव झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘चारसौ पार’च्या आवाहनाला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. राज्यातही महायुतीला घवघवीत यश मिळेल याबद्दल शंका नाही. सध्या एक्झिट पोल व राजकीय विश्लेषकांचे अंदाज आपण बघतोय, मात्र या सगळ्यांचे उत्तर मंगळवारी मिळणार असल्याने तोपर्यंत प्रतिक्षा करु असे म्हणतं राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी दक्षिणेच्या जागेवरुन काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर खालच्या पातळीवर जावून अत्यंत जहरी टीका केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट नाव घेत थोरातांनी एवढीतरी शरम बाळगली पाहीजे अशा शब्दात त्यांचा पानउतारा केला. उत्तरेच्या नेत्याने दक्षिणेत जावून मदत केली म्हणून तेथे विजय मिळेल ही त्यांची भ्रामक कल्पना असल्याचे सांगत नगरची जागा भाजप मोठ्या फरकाने जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. शनिवारी शेवटच्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर देशभरातील वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्थांनी विविध वृत्तवाहिन्यांवरुन 18 वी लोकसभा कोणाची यावरुन आपापले अंदाज सादर केले. त्यातील बहुतेक वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तिसर्यांदा बहुमताने सरकार स्थापन करील असा अंदाज वर्तवताना राज्यात मात्र मोदींच्या अश्वमेधाचा प्रवास खडतर असल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यात अहमदनगर दक्षिणेची जागा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके जिंकतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यावरुन रविवारी नगरमध्ये आलेल्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माध्यमांनी विचारले असता त्यांनी विविध विषयांवर भाष्य करतानाच ‘दक्षिणे’वरुन काँग्रेसचे दिग्गजनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर शरसंधान साधले.
यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, दुर्दैव हेच आहे की आपल्या पक्षाची भूमिका बजावण्यापेक्षा, पक्षासाठी काम करण्यापेक्षा काही लोकं व्यक्तीद्वेषाने पछाडलेली आहेत. यावेळी त्यांनी थेट थोरातांचा नामोल्लेख करीत त्यांनी एवढीतरी शरम बाळगली पाहिजे की जिल्ह्यामध्ये आपण स्वतःला काँग्रसचे मोठे नेते समजतो आणि काँग्रेससाठी आपल्याला जिल्ह्यात एकही जागा मिळवता आली नाही. दुसर्यांची तळी उचलण्यातच धन्य असलेल्या थोरातांची वैचारिक दिवाळखोरीच त्यातून सिद्ध होत असल्याची जहरी टीकाही त्यांनी यावेळी केली. अशा बाहेरच्या मदतीने आणि कोणी मदत केल्याने दक्षिणेची जागा निवडून येईल ही भ्रामक कल्पना असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी थोरात-कोल्हे व लंके यांचे नाव न घेता ‘या तिघांनी आता स्वतःच्या अस्तित्त्वाची काळजी करण्यास सुरुवात केली पाहिजे’ असा सज्जड इशाराही दिला.
विश्वनेता म्हणून गौरव झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारसौ पारच्या आवाहनाला देशातील जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला आहे. राज्यात महायुतीलाही घवघवीत यश मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सध्या एक्झिट पोल व राजकीय विश्लेषकांचे अंदाज आपण बघतोय, प्रत्यक्ष निकालासाठी मात्र आपल्याला मंगळवारपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले. नगर दक्षिणच्या लढतीवर अधिक भाष्य करताना त्यांनी नगर लोकसभा जिंकणार याचा आधीपासून विश्वास असल्याचे नमूद केले. प्रचारादरम्यान विरोधकांनी सोशल माध्यमांचा वापर विष पेरण्यासाठी केल्याकडे लक्ष वेधताना शेवटी जनता कामावर विश्वास ठेवत असल्याची पृष्टीही त्यांनी जोडली. डॉ.सुजय विखे कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवित होते व या पक्षाचे नेतृत्त्व नरेंद्र मोदींकडे आहे, त्यामुळे येथील विजयाबाबत आपण पूर्ण आश्वस्थ असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी नोंदवली.
रविवारी सुप्यातील नीलेश लंके यांचे अतिक्रमित संपर्क कार्यालय जमीनदोस्त केल्याच्या प्रश्नावर बोलताना मंत्री विखे यांनी सार्वजनिक जागांवर झालेली सगळीच अतिक्रमणं काढण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी योजना तयार केल्याचे सांगितले. गेल्याकाही दिवसांत अतिक्रमणांच्या आडून महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना, सोनसाखळ्या लांबवण्याचे प्रकार घडत असल्याने प्रशासनाने अतिक्रमणांविरोधात कठोर होण्याची गरज असून ‘सुप्यातील’ त्या घटनेकडे वेगळ्या नजरेने बघण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. ज्यांनी आपला धंदाच अशा भाडोत्री लोकांच्या जीवावर उभा केला आहे त्यांना या कारवाईने वाईट वाटणं स्वाभाविक असल्याची कोपरखळीही त्यांनी मारली.
यावेळी मंत्री विखे पाटील यांनी दुष्काळावर भाष्य करताना राज्य शासनाने निवडणूक आयोगाला आचार संहितेतून सवलत देण्याची वारंवार विनंती करुनही दिलासा मिळाला नसल्याकडे माध्यमांचे लक्ष वेधले. त्यातच आता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचाही अडसर असल्याचे सांगत लोकसभा मतमोजणीनंतर दुष्काळावरील उपाययोजना अडकणार नाही याचे नियोजन केल्याचे ते म्हणाले. चारा टंचाई लक्षात घेवून आवश्यक त्या प्रमाणात त्याची व्यवस्था केलेली असून पाण्याचे टँकरही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. अनेक भागातील पाण्याचे उद्भव आटल्याने दुष्काळी भागांसाठी दूरवरुन पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे, मात्र प्रशासन कोठेही कमी पडणार नाही. लोकसभेची आचारसंहिता शिथील होताच टंचाई आढावा बैठक घेणार असल्याची घोषणाही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विरोधी उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचाराची संपूर्ण यंत्रणा माजीमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात यांनी राबविल्याची चर्चा आहे. शनिवारी समोर आलेल्या निकालपूर्व अंदाजातून काही वृत्तवाहिन्यांनी जिल्ह्यातील दोन्ही तर बहुतेक वृत्तवाहिन्यांनी महायुती दक्षिणेची जागा गमावणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर एरव्ही टीकात्मक टीपन्नी करताना नावांचा उल्लेख टाळणार्या महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट बाळासाहेब थोरात यांचे नाव घेत अत्यंत खालच्या पातळीवर जहरी टीका केल्याने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच पाटलांनी ‘त्या’ तिघांनी आता स्वतःच्या अस्तित्त्वाची काळजी करण्यास सुरुवात केली पाहिजे’ असा सज्जड इशाराही दिल्याने आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय लढाई टोकाला जाणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.