अतिउत्साह नडला! नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदावरच प्रश्‍नचिन्ह फोडाफोडीला राज्याने नाकारले; ‘एक्झिट पोल’चाही देशभरात उडाला धुव्वा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आचारसंहिता लागण्यापूर्वीच ‘अबकी बार..’चा घोष करीत विरोधकांना गोंधळात टाकण्याची मोदी-शहांची राजकीय खेळी भाजपच्या अंगलट आल्याचे चित्र अठराव्या लोभसभेच्या निकालातून समोर आले आहे. अनेक गोष्टींची उकल करणार्‍या या निवडणुकीने ‘हिंदू वोटबँक’ नावाचा प्रकार सपशेल धुडकावला असून भारतातील निवडणुका जाती-पातींवरच आधारित असल्याचेही सिद्ध केले आहे. दक्षिणेतील राज्यांनी सावरल्याने बहुमताचा आकडा गाठणार्‍या ‘एनडीए’त मोठा उलटफेर होण्याचीही शक्यता असून तडजोडीच्या बदल्यात नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होवू शकतात. रामलाटेसह संदेशखली, मंगळसूत्र व मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यांवर पाहिलेले 370 जागांचे स्वप्न पूर्णतः भंगलेल्या भाजपला जादुई आकडा गाठणेही दुरापास्त झालं आहे. राज्यातही ‘महायुती’ची मोठी पिछेहाट झाल्याचे दिसत असून राज्यातील मतदारांनी फोडाफोडीचे राजकारण नाकारले आहे. वृत्त लिहेपर्यंत राज्यात महाविकास आघाडीने 28 तर महायुतीने अवघ्या 19 जागांवर आघाडी घेतली आहे. शिर्डीत उबाठा सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांना विजयी घोषीत करण्यात आले असून अहमदनगर दक्षिणमध्ये शरद पवार गटाच्या नीलेश लंके यांची आघाडी कायम आहे.

केवळ भारतच नव्हेतर संपूर्ण विश्‍वाच्या नजरा खिळलेल्या अठराव्या लोकसभेच्या निकालांनी आज भल्याभल्यांना तोंडघशी पाडले. सकाळच्या पहिल्या सत्रापासूनच काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील विविध प्रादेशिक पक्षांच्या इंडिया आघाडीने बलाढ्य भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना कडवी टक्कर देत यंदाचे निकाल अनपेक्षित असल्याचे संकेत द्यायला सुरुवात केली. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जवळजवळ देशभरातील चित्र स्पष्ट झाले. जानेवारीत अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासूनच भाजपचा आत्मविश्‍वास प्रचंड दुणावला होता. मात्र प्रत्यक्ष निवडणुका येईस्तोवर त्यात मोठी तफावत निर्माण झाली. भाजपने अति आत्मविश्‍वासातून अबकी बार, चारसौ पारचा नारा देत कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह संचारण्यासह विरोधकांना गोंधळवून टाकण्याची राजकीय खेळी केली. मात्र पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलेल्या विरोधकांनी चारसौ पार म्हणजे संविधान बदल असल्याचा मुद्दा उचलून त्याला देशभर हवा दिल्याने चार महिने आघाडीवर असलेला भाजप निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच बॅकफूटवर गेला.


त्यानंतर भाजपने आपल्या प्रचाराची आयुधेही बदलण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक सभा आणि मुलाखतींमधून वेगवेगळे मुद्दे पुढे आणून विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सभा व रोड शोला उसळणारी गर्दी त्यांच्या आत्मविश्‍वासात भर घालणारी ठरली. मात्र ती गर्दी प्रत्यक्षात मतदानात परावर्तीत झाली नसल्याचे आता दिसून येत आहे. दक्षिणेतील राज्यात यापूर्वी भाजपला फारसं यश मिळालेलं नव्हतं. यावेळी मात्र कर्नाटकसह केरळ, तामीळनाडू, आंध्रप्रदेश या तिनही राज्यात भाजपला अनपेक्षित यश मिळाले. मात्र त्याचवेळी संदेशखलीचा मुद्दा ज्वलंत ठेवून अतिउत्साहाने ‘दीदी’ला छोबीपछाड देण्याचा भाजपचा मनसुबा मात्र पूर्णतः फसला. मोठी अपेक्षा असलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला गेल्या पंचवार्षिक इतक्याही जागा राखता आल्या नाहीत. या राज्यात भाजपची खेळी भाजपच्याच अंगलट आली.


असं म्हणतात की पंतप्रधानपदाचा रस्ता व्हाया उत्तरप्रदेशातून जातो. या राज्यात भाजपचे सरकार असून योगी आदित्यनाथ यांच्यासारखा लोकपिय मुख्यमंत्री असतानाही अखिलेश-राहुल जोडीने भाजपला मोठा धक्का देत आघाडी घेतल्याने हक्काच्या राज्यात निर्माण झालेला हा खड्डा भाजप भरुन काढू शकली नाही. गुजरात, मध्यप्रदेश, बिहार सारख्या राज्यांनी साथ दिली असली तरीही महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात मात्र भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या दोन वर्षात राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी, उद्धव ठाकरेंसह शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचा प्रयोग आणि त्यातून निर्माण झालेली सहानुभूती, संघाचा विरोध डावलून अजित पवार गटाशी सलगी या राजकीय मुद्द्यांसह महाराष्ट्रातील निवडणुकीत यावेळी जातीचाही परिणाम झाल्याचे दिसून आले. राज्यातील 28 जागा लढवणारा भाजप आणि 15 जागा लढवणार्‍या शिवसेनेला मोठा फटका बसला असून अजित पवार गटाला रायगडची जागा वगळता उर्वरीत तिनही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे.


राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी घेतली असून नंदूरबारच्या विजयासह अमरावती, रामटेक, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई (उत्तर-मध्य), लातूर, सोलापूर व कोल्हापूरमध्ये आघाडी घेतली आहे. शिवसेना उबाठा गटाने दक्षिण-मध्य मुंबईत विजय मिळवला असून यवतमाळ-वाशिम, हिंगोली, परभणी, नाशिक, मुंबई (उत्तर-पूर्व), मुंबई (उत्तर-पश्‍चिम), मुंबई (दक्षिण), शिर्डी व उस्मानाबाद या नऊ मतदार संघात आघाडीवर आहे. शरद पवार गटानेही आघाडीच्या विजयाची घोडदौड कायम राखताना वर्धा, दिंडोरी, भिवंडी, बारामती, शिरुर, अहमदनगर व माढा मतदार संघात आघाडी घेतली आहे.


महायुतीत सर्वाधीक 11 जागांवर आघाडी घेणार्‍या भारतीय जनता पक्षाने धुळे, जळगांव, रावेर, अकोला, नागपूर, पालघर, मुंबई (उत्तर), पुणे, बीड, सातारा व रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात आघाडी घेतली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) मावळची जागा पटकावली असून बुलढाणा, औरंगाबाद, कल्याण, ठाणे हातकणंगले या जागांवर आघाडी तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने रायगडच्या जागेवर विजय मिळवला आहे. सांगलीतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचाही विजय झाला आहे. शिर्डीत शिवसेना ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारली असून नगर दक्षिण मतदार संघात शरद पवार गटाच्या नीलेश लंके यांनी 14 व्या फेरी अखेर 3 लाख 35 हजार 171 मतांसह 10 हजार 719 मतांची आघाडी कायम राखली आहे.


स्वबळावरील बहुमतापासून मोठ्या अंतरावर राहिलेल्या भारतीय जनता पक्षाला आपल्या मित्रपक्षांची एकजूट कायम ठेवण्यासह पंतप्रधानपदासह मंत्रीमंडळातील सदस्य संख्या आणि सरकारकडून राबवल्या जाणार्‍या धोरणांबाबत मोठी तडजोड करावी लागण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात सरकारच्या प्रत्येक निर्णयात मोदी-शहा यांचीच छाप दिसून आली. यावेळी मात्र भाजप बॅकफूटवर असल्याने पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला विरोध झाल्यास आश्‍चर्य निर्माण होणार नाही. असे झाल्यास भाजपलाही तडजोड करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. विरोधकांकडून ‘एनडीए’मधील मित्रपक्षांना मोठी आमिषं दाखवून गळ्याला लावण्याचेही प्रयोग सुरु झाले आहेत.


ईव्हिएमला विरोधकांची मान्यता मिळणार?
निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच देशभरातील विरोधी पक्षांनी ‘ईव्हिएम’ मशिनद्वारे मतदान घेण्यास जोरदार विरोध केला होता. ईव्हिएममध्ये छेडछाड करुन मोदी-शहा चारशे पार होतील अशी भीती असलेल्या विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाकडेही दाद मागितली होती. मात्र न्यायालयाकडूनही कोणताच दिलासा मिळाला नाही. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर ईव्हिएम ठेवण्यात आलेली गोदामे आणि त्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांनी घेतलेली काळजी, या दरम्यान सगळ्याच प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची विधाने या सर्वांना छेद देत ईव्हिएमने निष्पक्ष निकाल दिल्याने आतारी विरोधक या प्रक्रियेवर विश्‍वास ठेवतील का असाही प्रश्‍न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *