भूसंपादन होईपर्यंत चौपदरीकरणाचे काम बंद करा! पिंपरी निर्मळच्या शेतकर्यांची राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
ब्रिटीशकालिन काँक्रीटचा एकेरी वाहतूक असलेल्या कोल्हार-कोपरगाव रस्त्याचे स्वांतत्र्यानंतर एकदाही भूसंपादन झालेले नाही. सध्या या रस्त्याचे राष्ट्रीय महामार्ग योजनेतून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. भूसंपादन न होताच हा रस्ता शेतकर्यांच्या शेतात घुसला आहे. अनेक शेतकर्यांच्या तक्रारीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प अधिकारी दिवाण यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाने नियमाप्रमाणे संपादन करून शेतकर्यांना जमिनीची भरपाई मिळेपर्यंत पिंपरी निर्मळ हद्दीत काम बंद ठेवावे, अशी मागणी शेतकर्यांनी निवेदनाद्वारे केली.

नगर-कोपरगाव रस्त्याचे सध्या राष्ट्रीय महामार्ग योजनेतून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. हा रस्ता ब्रिटीशकाळात सुरुवातीला बारा फूट काँक्रिटचा होता. स्वातंत्र्यानंतर राज्य महामार्ग क्रमांक 10 नावाने ओळखला जाणारा हा रस्ता मध्यंतरी जागतिक बँक प्रकल्पाकडे वर्ग झाला. या रस्त्याचे चौपदरीकरणांतर्गत मध्यापासून एका बाजूला साडेसात मीटर डांबरीकरण केले. त्यानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रूपांतरीत करण्यात आला. एनएच-160 हा क्रमांक मिळाल्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्याचे सध्या नव्याने चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

सध्या या रस्त्याच्या मध्यापासून एका बाजूला 9 मीटर डांबरी व 15 मीटरपर्यंत साईडपट्टी एवढ्या हद्दीत काम करीत आहे. स्वांतत्र्यानंतरच्या काळात दर्जा व रूंदी वाढून या रस्त्यासाठी नव्याने भूसंपादन झाले नाही. आज काम करताना शेतकर्यांच्या हद्दीत काम करीत असल्याचे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प अधिकारी दिवाण यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकर्यांचा महामार्गाच्या कामाला विरोध नाही. मात्र शासनाने जादा लागणार्या जमिनीचे भूसंपादन करून शेतकर्यांना मोबदला द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प अधिकारी दिवाण यांच्याकडे केली. तसेच भूसंपादनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत या भागातील काम बंद ठेवण्याची मागणी केली. यावेळी राहाता तालुका असंघटित काँगेसचे अध्यक्ष सुभाष निर्मळ, गणेशचे संचालक सूर्यकांत निर्मळ, योगश निर्मळ, विठ्ठल निर्मळ, सोमेश्वर घोरपडे, भीमराज निर्मळ, गणेश निर्मळ, नवनाथ निर्मळ, यादव घोरपडे, अर्जुन निर्मळ, विठ्ठल घोरपडे, यमुना निर्मळ, सुमन निर्मळ, संदीप निर्मळ आदिंसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
