‘जे करायचे ते गुणवत्तापूर्णच असायला पाहिजे’ : महसूल मंत्री थोरात! तीन दशकांपूर्वीच्या नाटकी नाल्यावरील रस्त्याचा उल्लेख करीत ‘ठेकेदारांना’ भरल्या कानपिचक्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कठीण प्रसंगातही चांगले काम करीत आहे. या कालावधीत कोरोनासह अनेक नैसर्गिक संकटांनी विकासाचे मार्ग रोखले, राज्यासमोर आर्थिक स्थितीही उभी आहे. मात्र अशा स्थितीतही संगमनेर नगरपालिकेने शहरातील विकास कामांसाठी सतत पाठपुरावा केल्याने आज जवळपास दीडशे कोटी रुपयांच्या विकास कामांना सुरुवात होत आहे. पालिकेकडून शहराच्या सौंदर्यात भर घालणारी कामे सातत्याने सुरू आहेत, मात्र त्याचवेळी त्या कामांच्या गुणवत्तेवरही लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज आहे. सरकारकडून निधी आणणं ही सोपी गोष्ट नसते, त्यामुळे तो खर्च करुन निर्माण होणारे काम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदारच असायला हवे, त्याच्याशी तडजोड करता कामा नये अशी स्पष्ट सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालिकेच्या पदाधिकार्यांसह उपस्थित ठेकेदारांना दिली.

रविवारी (ता.13) संगमनेर नगरपालिकेच्यावतीने तहसील कार्यालयामागील जलकुंभाच्या जागी बांधण्यात येणार्या ‘डॉ.सुधीर भास्करराव तांबे’ व्यापारी संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ.सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना मंत्री थोरात म्हणाले की, गेल्या दीड वर्षातील परिस्थिती आपण सगळेजण पाहत आहोत. टाळेबंदीमुळे उद्योगधंदे बंद झाले, व्यापाराला फटका बसला त्याचा परिणाम राज्याच्या महसूलावर झाल्याने राज्यासमोर एकाचवेळी अनेक संकटे उभी राहिली. मात्र अशाही स्थितीत महाविाकास आघाडीने राज्यात चांगले काम केले. दुर्गाताईंच्या नेतृत्त्वाखालील पालिकेच्या पदाधिकार्यांनीही या परिस्थितीत खुप चांगले काम केले आणि शहराचे सौंदर्य वाढवण्याची मोहीम कायम ठेवली. त्याच्या सततच्या पाठपुराव्यातून अवघड स्थितीतही संगमनेरला निधी मिळाला. त्यातून शहरातील काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत, त्यांना पांढरे पट्टे मारल्याने ते अधिक चांगले दिसू लागले आहेत. मात्र त्याचवेळी या कामांच्या गुणवत्तेबाबही अतिशय गांभिर्याने लख्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

आज केलेल्या कामांची दोन वर्षांतच खराबी होणार असेल तर त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून निधी आणणे ही सहज प्रक्रीया नाही. त्यामुळे पालिकेने एकदा सगळ्याच ठेकेदारांची बैठक घ्यावी आणि त्यांना कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एका एका रस्त्याच्या निर्मितीचा खर्च मोठा असतो. अशावेळी त्यातून निर्माण होणारा रस्ता वर्षोनु वर्षे टिकणाराच असला पाहिजे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नाटकी नाल्यावर बांधलेला सिमेंट रस्ता 35 वर्षांपूर्वी आकाराला आला, मात्र आजही या रस्त्यावर एकही खड्डा नाही, उलट त्यावरुन वाहनं जावून जावून तो अधिक चकाकू लागला आहे. हा रस्ता तयार करणार्या ठेकेदाराचा आपण शोध घेत असून, त्याला तुमच्या समोर आणून त्याचा सत्कार करण्याची ईच्छा असल्याची कोपरखळीही त्यांनी यावेळी दिली.

जे करायचे ते गुणवत्तापूर्णच असायला हवे, गुणवत्तेशी कोणतेही तडजोड करु नका अशी स्पष्ट सूचना देतांना मंत्री थोरात म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत आपण अनेक वर्ष सोबत काम केले आहे. शहरातून जाणार्या ‘पुणे-नाशिक’ महामार्गाच्या कामाबाबत त्यांना एकदा विनंती केली होती, त्यांनी लागलीच त्याला प्रतिसाद दत 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा रस्ता असा तयार की शहरात नव्याने येणार्याला झालेले बदल पाहून आश्चर्याचा धक्काच बसायला हवा. घराच्या अंगणावरुनच घराची स्थिती लक्षात येत असते, त्यामुळे शहरातील विकास कामं करतांना त्यातून संपूर्ण शहराच्या सौंदर्यात भर पडली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी निळवंडे धरणाच्या कालव्यांवर भाष्य करतांना ते म्हणाले की, आपण मंत्री झालो तेव्हा अवघ्या दोन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने कालव्यांची कामे सुरु होती. गेल्या दीड वर्षांच्या काळात त्यात आमुलाग्र बदल घडवून आज 35 जेसीबी यंत्र कामे करीत आहेत. पुढच्या वर्षी तालुक्यातील पाटांमधून पाणी फिरावे अशी आपल्याला अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. चांगले आणि प्रशस्त रस्ते, येथील शांतता व सुव्यवस्था, काकडीचे विमानतळ आणि येऊ घातलेली सेमी हायस्पीड रेल्वेलाईन आणि संगमनेरातील वातावरण यासर्व गोष्टीतून सामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. आता त्यात आणखी भर पडणार असून भूयारी गटाराच्या कामांसह वेगवेगळ्या विकास कामांना झालेली सुरुवात त्याचेच द्योतक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वर्गीय अशोक भुतडा यांच्या कामाचे स्मरण करुन मंत्री थोरात यांनी कोविड काळात संगमनेरच्या अमधाममध्ये काम करणार्या कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. यावेळी त्यांनी मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांना यावर्षी निरोप द्यावा लागणार असल्याचे वक्तव्य करतांनाच त्यांनी केलेल्या कामांचा आढावा घेत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. येथील त्याचे विस्तृत कामकाज पाहून महाराष्ट्रातील अनेक नगरपालिकांमध्ये त्यांना ओढण्याची स्पर्धा सुरू असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

