दारु पिऊन ग्रामविकास अधिकार्यांना केली धक्काबुक्की अंभोरे येथील प्रकार; संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील अंभोरे येथे ग्रामविकास अधिकार्यांना गावातील एका ग्रामस्थाने दारु पिऊन शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.24) दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, अंभोरे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी अरुण जेजूरकर काम करत होते. त्यावेळी विशाल संजय गायकवाड हा दारु पिऊन आला आणि मला गाय व गोठा यांची यादी दाखवा असे म्हणाला. त्यावेळी ग्रामविकास अधिकारी जेजूरकर म्हणाले तुम्ही आता दारुच्या नशेत असल्याने उद्या या, असे म्हणाले. याचा राग आल्याने मला आत्ताच्या आत्ता यादी दाखवा असे म्हणून शिवीगाळ करु लागला. त्यावेळी समजावून सांगत असताना त्याने गचांडी धरुन धक्काबुक्की केली. त्यावेळी दशरथ बर्डे व वसुली कारकून गणेश साळवे यांनी विशाल गायकवाडला कार्यालयाबाहेर काढून दिले.
यानंतर त्याने कार्यालयास बाहेरुन कडी लावून तिघांना आत कोंडून बाहेर येण्यास मज्जाव केला. मग, जेजूरकर यांनी त्याचे चुलते एकनाथ गायकवाड यांना संपर्क करुन बोलावून घेतले. त्यांनी तत्काळ धाव घेऊन कार्यालयाची कडी उघडून विशालला सोबत घेऊन गेले. परंतु, त्यानंतरही त्याचा राग काही शांत झाला नाही. त्याने पावणे चार वाजेच्या सुमारास पुन्हा धिंगाणा घातला. थेट रॉड घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करुन जेजूरकर यांच्या कक्षाचा दरवाजा तोडून नुकसान केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी अरुण जेजूरकर यांनी संगमनेर तालुका पोलिसांत जाऊन तक्रार दिली. यावरुन आरोपी विशाल गायकवाड याच्याविरोधात गुरनं.164/2023 भादंवि कलम 353, 342, 323, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे करत आहे.