अखेर म्हाळुंगीच्या पुलाला मुहूर्त गवसला! पाडकामाला सुरुवात; वर्षभरात काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारों नागरीकांच्या वर्दळीचा मार्ग असलेल्या म्हाळुंगी नदीवरील साईनगर पुलाच्या कामाला अखेर आज शनिवारी मुहूर्त गवसला. सुधारीत अंदापत्रकानुसार सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या नूतन पुलासाठी सध्या अस्तित्त्वात असलेल्या जुन्या पुलाचे पाडकाम आज सुरु करण्यात आले. पुढील वर्षभरात हा पूल उभा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्ष काम सुरु होण्यासाठी मोठा विलंब झाल्याने ठेकेदाराकडून ठरवून दिलेल्या वेळेत पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता धुसर आहे. जुन्या पुलावरुन शहराच्या जलकुंभांना जोडणार्या जलवाहिन्या असल्याने त्यांना इरतत्र हलविण्याचे काम रेंगाळले होते. त्यामुळे पुलाच्या प्रत्यक्ष कामाला विलंब झाल्याची कबुली मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली.

दोन वर्षांपूर्वी 13 ऑक्टोबर 2022 रोजी साईनगरकडे जाणारा आणि हजारों रहिवाशांना शहराशी जोडणारा म्हाळुंगी नदीवरचा पूल स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूने खचला होता. त्यामुळे हजारों नागरीकांसह विद्यार्थ्यांचीही गैरसोय सुरु होती. गेल्या दोन वर्षांपासून पालिकेवर प्रशासकाचे राज्य असल्याने या पुलाचे बांधकाम रखडले. त्यातच राज्यात सत्तांतर झाल्याने या पुलाला राजकारणाचाही फटका बसला. रोज होणार्या गैरसोयीमूळे परिसरातील नागरीकांनी संघटीत होवून कृती समितीही स्थापन केली. वेळोवळी आंदोलनांच्या माध्यमातून हा विषय ज्वलंत ठेवला गेल्याने राज्य शासनाकडून निधीसाठी आंदोलनेही झाली.

या आंदोलनांमध्येही राजकीय रस्सीखेच दिसून आली. प्रत्यक्ष समस्येपेक्षा आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेहरे उजाळण्याचेच प्रयोग
जास्त झाल्याचेही दिसून आले. त्यातच बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी दिरंगाई झाली, पत्रव्यवहारानंतरही दाद न मिळाल्याने शेवटी पालिका प्रशासनानेच खासगी संस्थेकडून ऑडिट करवून घेत स्वतःच पुलाचे काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सादर केलेल्या अंदाजपत्रकाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली, मात्र त्यासाठी कोणत्याही स्वतंत्र निधीची तरतूद न करता नगर विकास निधीतून पालिकेच्या तहसील कार्यालयासमोरील व्यापारी संकुलासाठी मंजूर झालेला सात कोटी रुपयांचा निधी वळवण्यात आला.

जून्या अंदापत्रकानुसार त्या सात कोटीतील साडेचार कोटी रुपये पुलासाठी व अन्य साडेतीन कोटी रस्त्यांच्या कामासाठी मंजूर केले गेले. या सर्व घडामोडीत गेलेल्या वेळेत पुलाच्या कामाचे मूल्य सव्वाकोटी रुपयांनी वाढले. त्यामुळे वाढीव निधीची तरतूद करण्यासाठीही मोठा कालावधी निघून गेला. रडतखडत त्यातून मार्ग गवसल्यानंतर पुलावरुन संगमनेर शहराच्या बुहतेक भागाला पाणी पुरवठा करणार्या जलवाहिन्यांचा मुद्दा समोर आला. त्यातच कृती समितीने पुन्हा आंदोलनाची हाक देत वातावरण तापवायचा प्रयत्न करताच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जानेवारीत पुलाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यामुळे साहजिकच पुलाच्या प्रत्यक्ष कामाची वर्क ऑर्डरही त्याचवेळी काढण्यात आली.

मात्र तेव्हापासून आजपर्यंत जवळपास पाच महिने जलवाहिन्या हलवण्यातच गेल्याने प्रत्यक्ष पुलाचे काम सुरु होण्यास मोठा विलंब झाला. जानेवारीत ठेकेदाराच्या नावाने देण्यात आलेल्या वर्क ऑर्डरनुसार वर्षभरात त्याला पुलाचे काम पूर्ण करुन देण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष काम सुरु होण्यासच पाच महिने विलंब झाल्याने चालू वर्षी डिसेंबरमध्ये पूर्ण होणार्या या पुलासाठी पुढील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र उशिराने का होईना साईनगरच्या पुलाचे काम सुरु झाल्याने कृती समितीच्या सदस्यांसह परिसरातील हजारों नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

खरेतर साईनगर पुलाचे बांधकाम सुरु करण्यासाठी जानेवारीतच वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र पुलावरुन गेलेल्या जलवाहिन्या हलविण्यात विलंब झाल्याने प्रत्यक्ष काम सुरु होण्यास वेळ लागला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची टंचाई आहे, त्यामुळे नदीत पाणी नसलेल्या स्थितीत जलवाहिन्या हलविण्याचे काम केले असते तर शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला असता. त्यामुळे वेळ लागला आहे, मात्र पुढील वर्षभरात हा पूल उभा राहील यासाठी आवश्यक त्या गतीने आम्ही काम करणार आहोत.
राहुल वाघ
मुख्याधिकारी – संगमनेर नगरपरिषद

