कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्याकडून निवृत्तीचे संकेत! मुलीवरील ‘ट्रोलींग’मुळे झाले हताश; दोन-तीन दिवसांत निर्णय घेणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लग्नात होणारा अनावश्यक खर्च, पैशांचा देखावा, बडेजावपणा यावरुन कीर्तनाच्या मंचावरुन भाविकांचे कान उपटणार्या कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांना आपल्याच मुलीच्या साखरपुड्यात केलेल्या प्रचंड खर्चावरुन टीकेचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या ‘त्या’ कार्यक्रमातील काही छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींनी त्यांच्या मुलीने परिधान केलेल्या वस्त्रांवरुन टीकेची झोड उठवल्याने हताश झालेल्या इंदोरीकरांनी पुरंदर तालुक्यातील एका कीर्तनाच्या कार्यक्रमातून ट्रोल करणार्यांना खडेबोल सुनावत गेल्या तीन दशकांपासून सुरु असलेली कीर्तनसेवा थांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यासाठी लवकरच आपण सोशल माध्यमातून तशी घोषणा करणार असल्याचेही त्यांनी उपस्थित भाविकांसमोर बोलताना सांगितल्याने प्रबोधनकार म्हणून राज्यभर लौकीक मिळवणार्या इंदोरीकरांचा आवाज आता थांबण्याची शक्यता आहे.

अकोले तालुक्यातील इंदोरीचे रहिवाशी असलेल्या ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी कीर्तनाचा आधार घेत समाजातील अनिष्ट रुढी व परंपरांना लक्ष्य करण्यासह शेतकरी आत्महत्या आणि शेतकर्यांच्या गरीबीवर भाष्य करताना लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांमध्ये वधुपित्याकडून होणार्या अनावश्यक खर्चाचे दाखले देत त्याला फाटा देण्याचे आवाहन केले होते. मात्र प्रत्यक्षात गेल्या आठवड्यात त्यांच्या स्वतःच्या मुलीचा साखरपुड्याचा सोहळा मात्र अतिशय दिव्य स्वरुपात साजरा केला गेल्याने त्यावरुन समाज माध्यमामधून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. लोका सांगे दिव्य ज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण अशा पद्धतीच्या कमेंटसह काहींनी थेट त्यांच्या मुलीचा साखरपुड्यात परिधान केलेल्या कापडांचा फोटो व व्हिडिओ व्हायरल करुन त्यावरही टीका केल्याने इंदोरीकर महाराज चांगलेच संतापले आहेत.

काळभैरव अष्टमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र नारायणपूर (ता.पुरंदर) येथे झालेल्या त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून त्यांनी आपल्या मनातील खद्खद् बाहेर काढली असून त्यांच्या बोलण्यातून समाज माध्यमातील टीकेने ते हताश झाल्याचेही ठळकपणे समोर आले आहे. आपल्या अंगावर जितके केस नाहीत, तितक्या गावांमध्ये जावून आपण कीर्तनसेवा केल्याचे ते यावेळी म्हणाले. गेल्या 30 वर्षातील प्रवासात आपल्याला तीस वाहने बदलावी लागली, आपल्या जागी दुसरा कोणी असता तर एव्हाना राहीला नसता. शिवाय या काळात रोज आपल्यामागे रोज नवं लफडं, रोज नवा त्रास असूनही 31 वर्ष आपण हे सगळं सहन केलं. परंतु आता आपण इतके वैतागले आहोत की, बस्स थांबून घ्यावं असा विचार डोक्यात येत असल्याचे सांगत त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली.

मागील तीस वर्षांचा काळ डांबरीवर गेला. डांबरीवरच धावायचे, डांबरीवरच खायचे आणि डांबरीवरच झोपायचे. दिवसाला तीन-तीन अशी महिन्याला 80/90 कीर्तनं केली. त्यामुळे शरीराचा एक-एक अवयव ढिला झाला आहे. पण, त्याचा कोणीही विचार करीत नसल्याची खंत व्यक्त करीत इंदोरीकरांनी आपल्या धावत्या जीवनप्रवासाचा उल्लेख केला. मुलं लहान असताना आठ/आठ दिवस त्यांची भेट होत नव्हती. आता त्याच मुलांना लक्ष्य करुन काही माणसं इतक्या खालच्या पातळीवर गेलीत की त्यांनी आपल्या मुलीने साखरपुड्यात घातलेल्या कापडांवरुन बोलण्यास सुरुवात केलीये, ही गोष्ट अतिशय वेदनादायक असल्याचे उद्गार त्यांनी यावेळी काढले.

गेल्या चार दिवसांपासून आपल्या मुलीच्या कापडांवरुन बातम्या तयार करण्यात आल्या व माध्यमांनी त्या दाखवल्या. या प्रकरणात आपल्या मुलीचा काय दोष आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ज्यांना शिव्या द्यायच्या आहेत, त्यांनी आपल्याला द्याव्यात. गेली आठ दिवस कॅमेर्यावाल्यांनी आपल्याला अक्षरशः जगणं मुश्किल केलं आहे. एखाद्या पित्याला त्याच्या मुलीवरुन अशाप्रकारे बोललेले तुम्हाला तरी सहन होईल का? असा सवालही त्यांनी समोर बसलेल्या भाविकांना केला. वास्तविक मुलीचा साखरपुडा असेल तर मुलाकडच्या मंडळीकडून मुलीला कापडं घेतली जातात ही गोष्ट ‘क्लिप’ तयार करणार्यांना समजायला पाहिजे असे सांगत त्यांनी या गोष्टींना कंटाळून आता आपण दोन-तीन दिवसांत आपलीच ‘क्लिप’ टाकून थांबणार असल्याचा पुनरुच्चारही केला.

बस्स झाले आता, लोकांच्या शिव्या खाऊनही आपण नेहमीच सगळ्यांचे चांगले करण्याचा प्रयत्न केला. त्याचे फळ आपल्यापर्यंत ठिक होते. घरादारापर्यंत जायला नको होते. अशाप्रकारे ट्रोल करणार्यांना उत्तर देण्यास आपण आजही सक्षम आहोत, पण आता त्यात कुटुंब ओढल्यानंतर मजा नाही. आपल्यालाच त्याची अक्कल आली पाहिजे आणि आपली कीर्तनं बंद झाली पाहिजेत याचा विचार इंदोरीकरनेच घेतला पाहिजे असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

सोशल माध्यमातून ट्रोल करणार्यांसह या विषयावरील त्यांच्या बातम्या दाखवणार्या माध्यमांना लक्ष्य करताना इंदोरीकरांनी तीस मिनिटाच्या राजकीय सभेसाठी तीन कोटी रुपयांचा खर्च केला जातो, त्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्याची धमक आहे का? या सवालासह तुम्ही सगळे माझ्याच मूळावर का उठलात असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला. एखाद्या राजकीय नेत्याला जावून विचारा इतका खर्च का केला, मी तुम्हाला त्याचे एक कोटी रुपये देतो अशी पृष्टीही त्यांनी जोडली. गावातल्या शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार, दूधात टँकरने पाणी घालून भ्रष्टाचार, महिन्यावर निवडणूका आहेत. त्यात पाणी आणि पैसा दोन्ही सोबत वाहणार आहे. अशावेळी यांची पत्रकारिता कुठे जाते असा उद्दिग्न सवाल करताना घडला प्रकार अतिशय वेदनादायक असल्याचे सांगत त्यांनी कीर्तनसेवा थांबवण्याबाबत आपण गंभीर विचार करीत असल्याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये अवस्वस्थता निर्माण झाली असून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्नही सुरु झाले आहेत.

समाज प्रबोधनकार म्हणून राज्यभर मोठा लौकीक असलेल्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा मोठा चाहता वर्ग आहे. गेल्या तीन दशकांपासून कीर्तनातून समाज प्रबोधन करताना त्यांनी अनिष्ट प्रथा-परंपरांवर आसूडही ओढले आहेत. लग्नकार्यातील अफाट खर्च करण्याच्या पद्धतीमुळे सामान्य शेतकरी कर्जबाजारी होतो यावरुन त्यांनी राज्यभर रान उठवले होते. या दरम्यान त्यांच्या मुखातून पौराणिक संदर्भातून काही दाखलेही निघाल्याने त्यांना कायदेशीर प्रक्रियेचाही सामना करावा लागला. मात्र आता त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यातच बडेजाव मिरवला गेल्याने ते सध्या ट्रोलकर्यांच्या निशाण्यावर आले असून त्यातील काहींनी थेट त्यांच्या मुलीच्या कापडांवरुन चर्चा घडवल्याने ते संतप्त झाले असून कीर्तनातून निवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसू लागले आहे.

