अयोध्येत जावून गोळीबार करण्याची संगमनेरातून धमकी! पहाटे डायल 112 वर धमकीचा कॉल; पोलिसांनी तत्काळ मुसक्या आवळून घेतले ताब्यात..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारिख जशी जवळ येत आहे, तशा देशाच्या विविध कानाकोपर्यातून वेगवेगळ्या आचंबित करणार्या घटनाही कानी येवू लागल्या आहेत. या घटनांमध्ये आता संगमनेरातून चक्क अयोध्येत जावून गोळीबार करणार असल्याची धमकीच देण्यात आली आहे. आज पहाटे डायल 112 या सुविधेवर एका इसमानेे फोन करुन ‘आपण अयोध्येला जात असून कोणी अडवले तर फायरींग करील..’ असा दमच भरला. त्यामुळे गडबडलेल्या पोलिसांनी तत्काळ त्याचा ठावठिकाणा हुडकून त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना आज (ता.17) पहाटे सव्वादोनच्या सुमारास घडली. नेहमीप्रमाणे शहर पोलिसांचे अर्थात डायल 112 क्रमांकाचे वाहन रात्रपाळीच्या गस्तीवर असतानाच अहमदनगरच्या नियंत्रण कक्षाकडून सदरचा धक्कादायक संदेश प्राप्त झाला. संगमनेरातील जनतानगरच्या गल्ली क्रमांक एकमध्ये असलेल्या सरस्वती वसाहतीतून नियंत्रण कक्षाला ‘तो’ कॉल करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित इसमाने आपल्याकडे दोन बंदुका असल्याचे व आपण परवा अयोध्येला रवाना होत असल्याचे चक्क पोलिसांनाच फोन करुन सांगितले.
यावेळी फोन करणार्या इसमाने आपणास काही झाल्यास अथवा आपला रस्ता अडवल्यास अयोध्येत जावून फायरींग करण्याचीही धमकी भरली. देशभरात सध्या रामभक्तीचे वारे वाहत असतांना असला प्रकार घडला तर त्याचे परिणाम किती गंभीर असतील याची कल्पना असल्याने पोलिसांनी तत्काळ फोन करणार्या इसमाचे ‘लोकेशन’ मिळवून जनतानगरच्या गल्ली क्रमांक तीनमध्ये छापा घातला.
यावेळी डायर 112 क्रमांकावर फोन करणारा योगेश नारायणसिंग परदेशी याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. आज दिवसभर त्याच्याकडे कसून चौकशी केली असता तो मद्यपी असल्याचे आणि त्याने नशेत पोलिसांना फोन करुन नाहक खोटी माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा पाहुणचार केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 182, 188, 177 सह दारुबंदी कायद्याचे कलम 85 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माळी यांच्याकडे देण्यात आला आहे.
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा दृष्टीत आला आहे. अशावेळी कोणतीही अप्रिय घटना संपूर्ण देशातील वातावरण खराब करणारी ठरु शकते. याचे भान असल्याने पोलिसांनी पहाटे 2 वाजून 18 मिनिटांनी धमकीचा फोन प्राप्त होताच 2 वाजून 35 मिनिटांनी म्हणजे अवघ्या 17 मिनिटांतच आरोपीला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आले. मात्र त्यातून काहीही निष्पन्न न झाल्याने जवळपास तासभर चाललेली पोलिसांची धावपळ थांबली.