… तर हा प्रक्षोभ प्रकाशगड आणि मंत्रालयावर धडकेल : आ. विखे-पाटील राहाता येथे भाजपचा महावितरण विरोधात हल्लाबोल आणि टाळे ठोको

नायक वृत्तसेवा, राहाता
राज्यातील महाविकास आघाडीत केव्हाच बिघाडी झाली आहे. सरकारमध्येच आता ‘ऊर्जा’ राहिलेली नाही. सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांकडे जनतेसाठी कोणताही कार्यक्रम नसल्याने अवाजवी वीज बिलांचे निर्णय जनतेवर लादले आहेत. वसुलीसाठी सक्ती कराल तर सरकारच्या विरोधातील प्रक्षोभ आता प्रकाशगड आणि मंत्रालयावर धडकेल असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्यावतीने माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात राहाता येथे हल्लाबोल आणि टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. वीज बिल भरण्याची होत असलेली सक्ती, वीज जोडणी तोडण्याच्या निर्णयाचा निषेध करून शंभर यूनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात आली. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सभापती नंदा तांबे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब जेजूरकर, उपाध्यक्ष प्रताप जगताप, उपसभापती उमेश जपे, बाळासाहेब जपे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, अ‍ॅड.रघुनाथ बोठे, नंदकुमार जेजूरकर, डॉ.के.वाय.गाडेकर, शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, रावसाहेब देशमुख, संजय सदाफळ, विजय बोरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

वीज वितरण कंपनीच्या कारभारावर सडकून टीका करताना आमदार विखे म्हणाले, कोविड काळात अडचणीत आलेल्या नागरिकांना आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्याची आवश्यकता होती. परंतु, या बिघाडी सरकारने भरमसाठ रकमेची वीज बिले पाठवून राज्यातील जनतेची जाणीवपूर्वक कोंडी केली आहे. मोफत वीज देण्याची मागणी कोणी केली नव्हती. मात्र, मंत्री घोषणा करून मोकळे झाले. या तीन पक्षाच्या सरकारात फक्त पदांसाठी संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारमध्ये काय चाललंय समजत नाही. उपमुख्यमंत्री निर्णय झाले नसल्याचे सांगतात, तर काँग्रेसचे अस्तित्वच सरकारमध्ये नाही. त्यामुळे या आघाडी सरकारमध्येच आता ऊर्जा राहिली नसून, जिल्ह्यामध्ये ऊर्जामंत्री असतानाही शेतकर्‍यांना व नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येते हे दुर्दैव असल्याचे विखे-पाटील म्हणाले. वीज बिलाच्या संदर्भात गावात येवून अधिकार्‍यांनी सक्ती केली तर त्याचे विपरीत परिणाम होतील. त्यामुळे वेळीच ग्राहकांची बिले दुरूस्त करुन देण्याची मागणी शेवटी विखे यांनी करुन वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना निवेदन दिले.

Visits: 104 Today: 1 Total: 1098942

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *