अन्न व औषध प्रशासनाला गुटख्याचा मोह आवरेना! किरकोळ छापे संशयाच्या फेर्‍यात; अधिकार्‍यांच्या भत्त्यापेक्षाही कमी किंमतीचा माल..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात फोफावलेल्या गुटखा तस्करीमागे अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची प्रमुख भूमिका असल्याचे वारंवार समोर आले आहे. गुटख्यामुळे एकीकडे तरुणाई व्यसनाच्या आहारी जावून देशाचे भविष्य अंधःकारमय होत असतांना, दुसरीकडे त्याला रोखण्याची जबाबदारी असलेला हा विभाग मात्र आपल्याच तुंबड्या भरण्यात मश्गुल आहे. शासनाचा हजारो रुपयांचा पगार लाटणार्‍या या विभागातील काही अधिकारी तर शासनासाठी काम करताहेत की गुटखा तस्करांसाठी अशाही शंका निर्माण झाल्या आहेत. मात्र त्याबाबत शासनाचेच धोरण कुचकामी असल्याने अशा भ्रष्ट अधिकार्‍यांचे चांगलेच फावले असून त्यांच्याकडून महिन्याकाठी लाखो रुपये मोजणार्‍या बड्या तस्करांच्या हिताचीच कामे होत असल्याचे संगमनेरातून पुन्हा एकदा समोर आले आहे.

मंगळवारी (ता.31) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास अहमदनगरहून संगमनेरात पोहोचलेल्या अन्न व औषधं प्रशासनाच्या दोघा अधिकार्‍यांनी शहर पोलिसांच्या मदतीने शहरातील मोगलपुरा भागात असलेल्या ताज ट्रेडर्स या किरकोळ दुकानावर छापा घालण्यात आला. या कारवाईत अधिकार्‍यांना हिरा पान मसाल्याची 2 हजार 520 रुपयांची 21 पाकिटे, आरएमडी पान मसाल्याचे 1 हजार 740 रुपयांचे तीन बॉक्स आणि 1 हजार 80 रुपयांची सुगंधीत तंबाखू असा अवघा 5 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. दुकानदार मुबीन खलील शेख (वय 34, रा.एकतानगर) याच्याकडे अधिक चौकशी करता त्याने सदरचा माल आफ्रिदी पठाण (रा.रहेमतनगर) याच्याकडून विकत घेवून त्यातील काही माल साईश्रद्धा चौकातील फईम बालम पठाण (वय 25) याला विक्री केल्याचेही त्याने सांगितले.

अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी त्याच्या दुकानातील माल ताब्यात घेवून सदर दुकानास सील ठोकले व त्यानंतर आपला मोर्चा रहेमतनगरमधील आफ्रिदी पठाण याच्या किराणा मालाच्या दुकानावर वळवला. या छाप्यातही पथकाला विमल पान मसाल्याची 270 रुपयांचे अवघे 15 पाऊच, हिरा पान मसाल्याचे सहाशे रुपयांचे पाच पाकिटं व 180 रुपयांची सुंगधी तंबाखू असा अवघ्या 1 हजार 50 रुपयांचा माल मिळाला. त्याचेही दुकान सील करुन पथकाने तिसरा आरोपी फईम बालम पठाण याचा शोध घेतला असता तो मात्र सापडला नाही. त्यामुळे दोघा अन्न सुरक्षा अधिकार्‍यांनी हाती लागलेला 6 हजार 390 रुपयांचा गुटखा जप्त केला.

याप्रकरणी अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी फईम बालम पठाण (वय 25 रा.साईश्रद्धा चौक), मुबीन खलील शेख (वय 34, रा.एकतानगर) व आफ्रिदी पठाण (रहेमतनगर) या तिघांवर अन्न व सुरक्षा मानदं कायद्याच्यातील विविध कलमांसह भारतीय दंड संहितेच्या कलमांन्वये गुन्हा दाखल करीत पहिल्या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांच्याकडे देण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात सहज मिळणार्‍या गुटख्यामागे अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाचा थेट आशीर्वाद असल्याचे यापूर्वी वेळोवेळी समोर आले आहे. संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी आणि राहाता तालुक्यातील निमगाव निघोज येथील दोन मोठे गुटखा तस्कर संपूर्ण जिल्ह्यात गुटख्याचा पुरवठा करतात हे यापूर्वीच श्रीरामपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. मात्र त्या कारवाईतही जिल्ह्यातील सर्वात मोठ्या या दोघा तस्करांसह हिरा गुटख्याचा मालक व पुण्यातील वाहतुकदारांची नावे समोर येवूनही त्यांना अटक झाल्याचे आजवर समोर आलेले नाही.

विशेष म्हणजे सदरची कारवाई आणि त्यामागील आरोपींच्या नावाची उकल पोलीस तपासातून झाली होती. राज्यात गुटखा बंदी लागू झाल्यापासून आजवर कधीही अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाकडून निमगाव जाळी व निमगाव निघोज येथे छापाही पडलेला नाही आणि या दोघा तस्करांची नावेही कधी समोर आलेली नाही. त्यावरुन या विभागाचे जिल्ह्यातील गुटखा तस्करीतील योगदान सूर्यप्रकाशाप्रमाणे समोर आले आहे. असे असतानाही या विभागातील बडे अधिकारी अधुनमधून संगमनेरात येतात आणि किरकोळ टपरीधारक, किराणा दुकानदारांना लक्ष्य करुन आपले अस्तित्त्व दाखवण्याचे नाटकंही करतात. मंगळवारची कारवई देखील हेच सांगण्यासाठी पुरेशी आहे.


वास्तविक मंगळवारी झालेल्या कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाचे दोन वरीष्ठ अधिकारी नगरहून संगमनेरात दाखल झाले होते. त्यांचा संपूर्ण दिवस संगमनेरातच गेल्याचे त्यांनी मारलेल्या छाप्याची आणि दाखल गुन्ह्याची वेळ यावरुन स्पष्ट होते. सदरचे अधिकारी मुख्यालयातून संगमनेरात आले होते. त्यासाठी वाहन खर्च, चालकाचा खर्च, दोघा अधिकार्‍यांचे पगार, प्रवासासाठी मिळणारा भत्ता शासनाच्या तिजोरीतून काढला जाणार आहे. प्रत्यक्षात त्यांनी संगमनेरात जप्त केलेल्या मालाची किंमत आणि त्यांना मिळालेले वरीलप्रमाणे अर्थलाभ विचारात घेता या विभागाकडून जिल्ह्यात गुटख्या विरोधात केवळ कारवाईचा फार्स सुरु असल्याचे स्पष्ट दिसून येते.

Visits: 122 Today: 1 Total: 1103415

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *