ब्राह्मणवाडा येथे पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतींचे आयोजन खंडोबा महाराज यात्रेनिमित्त भाविकांसह शर्यतप्रेमींची गर्दी

नायक वृत्तसेवा, अकोले
बैलगाड शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता बैलगाडा मालक आणि आयोजकांमध्ये उत्साह संचारलेला आहे. त्यात सध्या जत्रा-यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने माघ पौर्णिमेनिमित्त ब्राह्मणवाडा (ता.अकोले) येथील खंडोबा यात्रेत हा बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. तालुक्यात पहिल्यांदाच शर्यत होत असल्याने असंख्य शर्यतप्रेमींची गर्दी लोटली होती.

दरवर्षी जत्रा-यात्रांनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु, कोविडचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने निर्बंध घातलेले होते. त्यामुळे राज्यभरातील यात्रा बंद राहिल्याने असंख्य छोट्या व्यावसायिकांना देखील आर्थिक फटका बसला. आता कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्वत्र जत्रा-यात्रा भरण्यास सुरूवात झाली आहे. माघी पौर्णिमेनिमित्त खंडोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यानुसार ब्राह्मणवाडा येथेही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते बैलगाडा घाटाचे पूजन होवून शर्यतीस मोठ्या उत्साहत प्रारंभ झाला. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांसह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षी यात्रांनिमित्त पुणे जिल्ह्यासह ठिकठिकाणी बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येत होते. परंतु, महाराष्ट्रात शर्यतींवर बंदी घालण्यात आलेली होती. याबाबत महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काही प्राणीप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत पुन्हा बैलगाडा शर्यतीला आव्हान दिले. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सदर विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन जाण्याबाबतचा सल्ला दिला. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करून बैलगाडा शर्यतीस परवानगी द्यावी अशी विनंती केली होती.

महाराष्ट्राप्रमाणे तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये देखील काही प्राणीप्रेमींनी बैलगाडा शर्यती बंदीसाठी सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2018 मध्ये या सर्व राज्यांच्या याचिका एकत्र करून त्या घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर फेब्रुवारी 2018 पासून हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता. अखेर 16 डिसेंबर 2021 रोजी त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून, राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. त्यानुसार सर्वत्र बैलगाडा शर्यतींचे आयोजन होत आहे.

या बैलगाडी खेळाला महाराष्ट्रात शंकरपट, कर्नाटकात कंबाला, तामिळनाडूत रेकला, पंजाबमध्ये बौलदा दी दौड या नावाने ही शर्यत ओळखली जाते. याशिवाय मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातही बैलगाडा शर्यती खेळल्या जातात.
