ऐन नव्वदीतील ‘चिरतरुण गिर्यारोहका’ने सर केला हरिश्चंद्र गड! शरीर व मनाने धडधाकड असणार्‍या तरुणांना दिली गड-किल्ले चढण्याची चेतना..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचाराने प्रभावित असलेल्या ऐन नव्वदीतील वृद्धाने तरुणांना लाजवेल अशी किमया केली आहे. अकोले तालुक्यातील अतिशय अवघड चढाई असणारा हरिश्चंद्र गड दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अडीच तासांत सहजगत्या सर केला आहे. या मोहिमेत त्यांच्या सोबत असणारे सहकारी देखील या ‘चिरतरुण गिर्यारोहका’चा उत्साह पाहून अचंबित झाले होते. त्यांनी ही मोहिम फत्ते करत शरीर व मनाने धडधाकड असणार्‍या तरुणांना जणू गड-किल्ले चढण्याची जणू नवचेतनाच दिली आहे.

निवृत्त प्राथमिक शिक्षक हरिभाऊ कोते (वय 90) यांनी नोकरीच्या काळात देवठाण, खिळ्याचीवाडी, सुगाव यांसह अतिदुर्गम भागात आदर्श सेवा करत नावलौकिक मिळविला आहे. निवृत्तीनंतर तब्बल 31 वर्षे निवृत्ती वेतन घेत उत्तम जीवन जगत आहेत. दररोज व्यायाम करुन ऐन नव्वदीतही तरुणांना लाजवेल अशी शरीराची ठेवण ठेवली आहे. नुकतेच संगमनेरमधील साई निरंजन वसाहतीमधील कुटुंबियांनी हरिश्चंद्र गड सहलीचे आयोजन केले होते. सहलीचे हे नियोजन कोते गुरुजींना समजताच त्यांनी सहलीत सहभागी होण्याचा हट्ट धरला. त्यामुळे सर्वांना धस्स झाले. इतक्या वयात इतका मोठा पल्ला गाठणे कसे शक्य आहे, असे नानाविध प्रश्न सहलीकरांना पडले. परंतु, गुरुजींची तीव्र इच्छाशक्ती बघता कोणालाही त्यांना नकार देणे शक्य नाही. गुरुजींना संमती देत जेवढे शक्य होईल तिथपर्यंत जायचे, त्रास वाटल्यास थांबून घ्यायचे असा अटी टाकण्यात आल्या.

हरिश्चंद्राची सहल ठरल्यानुसार निघाली. छत्रपतींच्या जाज्वल्य विचारांनी आधीच प्रेरित असलेले गुरुजी थोडावेळही विश्रांती न घेता इतिहास आठवत मोठ्या ताकदीने नातू आदित्यच्या साथीने गडाची मजल दर मजल करत चढाई करत होते. याबरोबर मोहिमेत सहकारी असलेले अनेकजण थकायचे. परंतु, गुरुजी काही थकेना. हे बघून त्यांनाही चढाईची प्रेरणा मिळाली. गड सर करताना इतरही पर्यटक मोठ्या संख्येने होते. ते देखील गुरुजींची इच्छाशक्ती पाहून अचंबित होत. प्रभावित होऊन ते गुरुजींशी आपली छबी टिपून काही सूचनाही देत.
संगमनेरचे नायब तहसीलदार सुधीर सातपुते, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांचेसह अनेक पर्यटकांनी गुरूजींना शुभेच्छा दिल्या. आणि अखेर अडीच तासांच्या अथक प्रवासानंतर साई निरंजन परिवार हरिश्चंद्र गडावर पोहोचला. यावेळी गुरुजी़ंचा आनंद गगनाला भिडला होता. अनेक वर्षांचे अपूर्ण स्वप्न साकार झाल्याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसले. यापूर्वी गुरुजी पंधरा-वीसवेळा कामानिमित्त पाचनईपर्यंत आलेले. परंतु गड सर करायला वेळ मिळाला नव्हता. अखेर मनातील तीव्र इच्छाशक्ती त्यांना हरिश्चंद्र गडावर घेऊन आलीच.

गुरुजींच्या यशस्वी हरिश्चंद्र गड मोहिमेबद्दल नुकताच आधार फौंडेशन, शिवराष्ट्र हायकर्स या संस्थांनी सत्कार केला आहे. यावेळी शिवव्याख्याते प्रा.दीपक कर्पे, शिवराष्ट्र हायकर्सचे जिल्हाध्यक्ष संतोष शेळके, आधारचे समन्वयक डॉ.महादेव अरगडे, सोमनाथ मदने, प्राचार्य किसन दिघे, भानुदास झंजाड, अरूण जाधव, लक्ष्मण कोते, सुखदेव इल्हे, कोते कुटुंबीय उपस्थित होते.

मागील वर्षी मी पत्नी व इतर नातेवाईक यांच्या समवेत वैष्णवदेवीला जाऊन आलो. तिथेही 28 किलोमीटरचा पायी प्रवास कुणाचीही मदत न घेता पूर्ण केला होता. सतत कामात राहिलो, शरीराचे चोचले व लाड केले नाही, किरकोळ गोष्टींसाठी दवाखाना केला नाही. आणि विशेष म्हणजे आपल्या कामाशी प्रामाणिक राहिल्याने मी हे सर्व शक्य करतो.
– हरिभाऊ कोते (निवृत्त शिक्षक, संगमनेर)

Visits: 15 Today: 1 Total: 113780

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *