नेवासा तालुक्यातील रस्त्यांसाठी शंभर कोटींचा निधी अखेर मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्याला यश
नायक वृत्तसेवा, नेवासा
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, तालुक्यातील महत्त्वाच्या सर्व रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटींचा निधी मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्त्यांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत.
नेवासा तालुक्याला जोडणार्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची प्रचंड दूरवस्था होती. विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा चांगलाच गाजला. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या साडेसातीतून सुटका करण्यासाठी नागरिकांनी मंत्री गडाख यांना साकडे घातले होते. त्यावेळीच हा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचे वचन गडाख यांनी दिले होते. अखेर मंत्री गडाखांच्या पाठपुराव्यास यश आले. तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटींचा निधी मिळाला आहे. येत्या काही दिवसांतच रस्त्यांच्या कामास सुरवात होणार असून, तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.
पाचेगाव फाटा ते कुकाणे, सोनई-घोडेगाव, खडका फाटा-तुळजाईवाडी, सलाबतपूर-शिरसगाव ते गोपाळपूर-खामगाव, तामसवाडी-धनगरवाडी-खुपटी, मोरेचिंचोरे-सोनई, वडाळा बहिरोबा-रांजणगाव कॅनॉल ते कारेगाव, कारेगाव-सौंदाळे, सोनई अर्बन बँक ते विवेकानंद चौक, कुकाणे ते दहिगाव रस्ता (तालुका हद्द), जळके बुद्रुक ते गोगलगाव, नेवासा-हंडीनिमगाव ते भानसहिवरा, भानसहिवरे रांजणगावदेवी, रांजणगावदेवी ते घोडेगाव कुकाणे, करजगाव देवखिळे वस्ती, माका-पाचुंदा, लोहगाव, शिंगवे तुकाई, लोहरवाडी, चांदे राज्यमार्ग 66 रस्ता सुधारणा, चांदे ते रस्तापूर, सोनई शनिशिंगणापूर या रस्त्यांची कामे होणार आहेत.
तालुक्यात घरपोच गॅस वितारणसाठी रस्त्याची मोठी समस्या भेडसावत होती. तालुक्यातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांसाठी शंभर कोटीचा निधी मिळाल्याने समाधान वाटले. लवकरच काम सुरू व्हावे.
– डॉ.लक्ष्मण इंगळे (अध्यक्ष, ऑल इंडिया गॅस डिस्ट्रीब्यूशन असोसिएशन, नेवासा)
तालुकांतर्गत गावोगावी जोडणार्या मुख्य रस्त्यांची समस्या गेल्या काही वर्षांपासून भेडसावत होती. ही समस्या मंत्री शंकरराव गडाखांमुळे दूर होणार असल्याने संपूर्ण तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.
– दिनकर गर्जे (अध्यक्ष, सरपंच संघटना, नेवासा तालुका)
कुकाणे ते श्रीरामपूर रस्त्यासह तालुक्यांतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांसह वाहनचालकांना मोठा त्रास होत होता. वाहनांचेही मोठे नुकसान होत होते. मंत्री गडाख यांच्यामुळे रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागल्याने मोठी समस्या मिटणार आहेत.
– युनूस नालबंद (अध्यक्ष, वाहन चालक-मालक संघटना, कुकाणे)