बुडालेल्या ‘त्या’ दोघांचेही मृतदेह सापडले! स्थानिक पथकांची कामगिरी; ठाण्याचे पथक माघारी..


नायक वृत्तसेवा, अकोले
बुधवारी सुगांव शिवारातील मनोहरपूर बंधार्‍याजवळ बुडालेल्या एकासह त्याच्या शोधासाठी गुरुवारी नदीपात्रात गेलेल्या आणि बचाव पथकासह बुडालेल्या तरुणाचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. गुरुवारी सायंकाळी निळवंडे धरणातून सोडण्यात आलेले आवर्तन थांबविल्यानंतर आज सकाळी सहा वाजता आकाश देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील स्थानिक पथकाने नदीत बुड्या मारुन दोघांचा शोध घेतला असता बंधार्‍यापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर कळस शिवारात दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. उत्तरीय तपासणीसाठी त्यांना अकोल्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या हाती सोपवले जाणार आहेत. गुरुवारी धुळ्याच्या एसडीआरएफच्या पथकाला अपघात होवून तीन जवान शहीद झाल्याने प्रशासनाने ठाण्याच्या आपत्ती प्रतिसाद पथकाला पाचारण केले होते, मात्र त्यांचे सुगांवमध्ये पोहोच्याआधीच बुडीत झालेले दोन्ही तरुण आढळून आले.


गेल्या बुधवारी सुगांवजवळील प्रवरा नदीपात्रात सागर पोपट जेडगुले (वय 25, रा.घोलवड, ता.सिन्नर) व अर्जुन रामदास जेडगुले (वय 18, रा.पेमगिरी, ता.संगमनेर) हे दोघे तरुण बुडाले होते. त्याच दिवशी सायंकाळी सागर जेडगुलाचा मृतदेह मनोहरपूर बंधार्‍याजवळच्या परिसरात आढळून आला, तर अर्जुन जेडगुले मात्र बेपत्ता झाला होता. त्याच्या शोधासाठी धुळ्याहून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची संपूर्ण तुकडी बोलावण्यात आली होती. मात्र दुर्दैवाने या पथकाकडून शोधकार्य सुरु असताना बंधार्‍याजवळील वेगवान प्रवाहात त्यांची बोट उलटून एका अधिकार्‍यासह दोन जवान आणि गणेश मधुकर देशमुख हा स्थानिक तरुण बुडाला. बचाव पथकातील तिघांचेही मृतदेह घटनेनंतर तासाभराने हाती लागले, मात्र गणेश देशमुखही बेपत्ता झाल्याने शोध मोहीम रेंगाळली.


धुळ्याच्या पथकाला अपघात झाल्याने त्यांनी आपली शोध मोहीम पुढे सुरु ठेवण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे प्रशासनाने ठाण्याच्या आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण केले होते. तत्पूर्वी सदरची घटना समजल्यानंतर हायकींग आणि ट्रेकींग करणार्‍या मूळच्या जाखुरीच्या व सध्या ईगतपूरी येथे वास्तव्यास असलेल्या आकाश देशमुख यांनी संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांच्याशी संपर्क साधून मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांनीही त्यांचा पूर्वीचा अनुभव व उपलब्ध संसाधनांचा विचार करुन त्यांना शोधकार्य करण्यास होकार दिला. त्यासाठी स्वतः प्रांताधिकारी आज पहाटेपासून सुगांवच्या नदीकाठावर हजर राहीले.


गुरुवारी सायंकाळी निळवंडेचे आवर्तन बंद झाल्याने नदीपात्रातील पाण्याचा वेगही मंदावला होता. आज सकाळी सहा वाजता आकाश देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली नवनाथ सिनारे, अविनाश म्हसणे, प्रशांत पांडे, दीपक इंगळे, अनिल जाधव, योगेश चौधरी व आकाश भागले या आठजणांनी मनोहरपूर बंधार्‍यापासून शोधकार्य सुरु केले असता सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास बंधार्‍यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर कळस शिवारात गुरुवारी पथकासह बुडालेल्या गणेश मधुकर देशमुख याचा मृतदेह आढळला, तर सकाळी साडे नऊच्या सुमारास त्यापासून आणखी एक किलोमीटर अंतरावर कळस शिवारातच बुधवारी बुडालेल्या अर्जुन रामदास जेडगुले याचाही मृतदेह आढळून आला.


या दोघांचेही मृतदेह बाहेर काढून अकोले ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या बचावकार्याला अखेर यश आल्याने सुगांवमध्ये एकीकडे समाधान तर दुसरीकडे शोधकार्य करताना तिघा जवानांसह एका स्थानिक तरुणाचाही बळी गेल्याने वेदना असल्याचे जाणवत होते. आजच्या शोधकार्यावेळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, अकोल्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आदींसह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


गुरुवारी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला नदीपात्रात अपघात घडून तिघांचा बळी गेल्याने या पथकाने त्यांच्याकडून होणारे शोधकार्य थांबवले होते. त्यामुळे प्रशासनाने ठाण्याच्या आपत्ती प्रतिसाद दलाला पाचारण केले होते. मात्र तत्पूर्वीच संगमनेरच्या आकाश देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली नवनाथ सिनारे, अविनाश म्हसणे, प्रशांत पांडे, दीपक इंगळे, अनिल जाधव, योगेश चौधरी व आकाश भागले या आठजणांनी दोघांचेही मृतदेह शोधून काढल्याने ठाण्याच्या पथकाला सुगांवमध्ये पाहोचण्यापूर्वीच माघारी जावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *