धक्कादायक! म्हानोटीच्या ओढ्यातील ‘त्या’ इसमाचा मृत्यू भूकेने? ‘ससून’चा प्राथमिक अंदाज; पोलीस मात्र न्यायवैद्यकसह अंतिम अहवालाच्या प्रतिक्षेत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवड्यात गुंजाळवाडी शिवारात म्हानोटीच्या पात्रालगत एका मध्यमवयीन इसमाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी प्राथमिक पाहणीतच खुनाचा निष्कर्ष काढून तपास सुरु केला. मात्र आता या प्रकरणातून धक्कादायक माहिती समोर येत असून मयत इसमाचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचा प्राथमिक अंदाज ससूनच्या वैद्यकीय पथकाने वर्तवला आहे. अनेक दिवस उपासमार झाल्याने त्याचा मृत्य झाला असण्याची व घटनास्थळी आढळून आलेले ‘अ‍ॅसिड’ सदृष्य डागही शरीरातील द्रवाचा स्राव असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या धक्कादायक वृत्ताने तालुक्यात खळबळ उडाली असून घटनास्थळाच्या चौफेर हॉटेल व्यावसायिकांची दाटी असतानाही एखाद्याचा भूकेने व्याकूळ होवून मृत्यू होण्याची ही घटना लांच्छनास्पद आहे.


गेल्या मंगळवारी (ता.13) सायंकाळी सातच्या सुमारास गुंजाळवाडीचे सरपंच अमोल गुंजाळ यांना म्हानोटी ओढ्याच्या पात्रालगत सदरचा मृतदेह दिसून आला होता. त्यांनी पोलीस पाटील गणेश म्हस्के यांच्याद्वारे शहर पोलिसांना कळविल्यानंतर प्राथमिक तपासात कोणीतरी अज्ञात कारणासाठी अंदाजे 50 ते 55 वयाच्या इसमाचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी कोणतातरी ज्वलनशील पदार्थ टाकून मयताचा चेहरा व गुप्तांग जाळून टाकण्याचा घृृणास्पद प्रकार केल्याचे दिसून आले. सदरील इसमाच्या शरीरालगत जमिनीवर डागही आढळून आल्याने मृतदेह जाळण्यासाठी ‘अ‍ॅसिड’चा वापर झाल्याचाही संशय निर्माण झाला. मृतदेहाची अवस्था विचारात घेता त्याचे शवविच्छेदन पुण्याच्या ससून रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला.


तत्पूर्वी मयताची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. ते पेलण्यात अद्यापही यश आलेले नसून मयत व्यक्ती कोण हे अजूनही कोडेच आहे. मात्र याच दरम्यान अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून सदरील मृतदेहाची उत्तरीय तपासणी करणार्‍या ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने मयताचा मृत्यू नैसर्गिक आणि उपासमारीने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. याचा अर्थ या इसमाचा मृत्यू भूकबळीने झाल्याचा संशय आहे. ससून रुग्णालयाने ‘व्हिसेरा’ राखून ठेवल्याने मृत्यूचे कारण ठामपणे समोर आलेले नाही. मात्र मयताचे काळे पडलेले शरीर, चेहरा व गुप्तांग जळाल्याप्रमाणे दिसण्याचा प्रकार मृत्यू होवून काही दिवस उलटल्याने शरीर नाशवंत होण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे लक्षण होते.


त्याचप्रमाणे मृतदेहाच्या आसपास जमिनीवर डागही आढळून आले होते. मात्र शरीर नाशवंत होण्याच्या प्रक्रियेत वाहणारा अंतर्गत द्रवाचा स्राव असल्याचा अंदाजही या वैद्यकीय पथकाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे म्हानोटीच्या पात्रात सापडलेल्या इसमाचा खून नव्हेतर तर त्याचा मृत्यू उपासमारीने व्याकूळ होवून झाल्याचे प्राथमिक अंदाजातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी न्याय वैद्यक तज्ञांसह रासायनिक तज्ञांचीही मदत घेतली आहे. शवविच्छेदनाचा अंतिम अहवालही अद्याप अप्राप्त आहे. तसेच, दोन्ही प्रयोगशाळांचे निष्कर्षही अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. मात्र सदरची घटना समोर येवून आठवडा उलटला तरीही मयताची ओळख स्पष्ट न झाल्याने मयत भीक्षेकरी असण्याचीही शक्यता आहे. या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत, अशातही एखाद्याचा केवळ अन्न न मिळाल्याने झालेला मृत्यू लांच्छनास्पद आहे.


ससूनकडून ‘नैसर्गिक’ मृत्यूचा अंदाज असला तरीही त्यांनी ‘व्हिसेरा’ राखून ठेवलेला आहे. न्याय वैद्यक व रासायनिक प्रयोगशाळांचे अहवाल अप्राप्त आहेत. त्यामुळे लगेच कोणता निष्कर्ष काढता येणार नाही, मात्र शंका निर्माण झाली आहे. मयताजवळ आढळून आलेले डागही शरीरातील द्रवाचा भाग असल्याचा अंदाज असल्याने शवविच्छेदन आणि प्रयोगशाळांच्या अहवालानंतरच नेमके कारण समोर येईल. सदरील इसमाची अद्यापही ओळख पटलेली नसून त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
भगवान मथुरे
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

Visits: 18 Today: 1 Total: 115820

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *