अभ्यासिकेतील दीड डझन मुलांची स्पर्धा परीक्षांमध्ये बाजी! पालिकेच्या अभ्यासिकेत केले अध्ययन; शिवजयंतीच्या औचित्याने ‘प्रशासकीय’ सत्कार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
बलशाली मुघल सल्तनतीला आव्हान देण्यासाठी सह्याद्रीच्या पाषाणात जन्म घेणार्‍या शिवरायांची 394 वी जयंती आज जगभरात साजरी होत आहे. प्रथेनुसार आज संगमनेर नगर परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. तत्पूर्वी पालिकेच्या अभ्यासिकांमध्ये ज्ञानार्जन करुन स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून प्रशासकीय पदं पटकावणार्‍या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रशासकीय कौतुक सोहळ्याने ग्रामीणभागातून आलेले हे विद्यार्थी भारावून गेले होते. यावेळी अनेकांच्या डोळ्यातून आनंदाची आसवंही वाहती झाल्याचे भावस्पर्शी चित्र दिसले. महापुरुषांची जयंती साजरी करताना त्यांच्या विचारांचाही कसा जागर करता येतो याचा आदर्श या सोहळ्याने घालून दिला आहे.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती जगभरात साजरी होत आहे. संगमनेरातही अनेक चौकांमध्ये छत्रपतींच्या प्रतिमा उभारुन त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गायले जात आहेत. झेंडे, पताका, लाईटींग यामुळे शहरातील वातावरण भगवेमय झाल्याचेही बघायला मिळत आहे. तारखेनुसार की तीथीनुसार या वादात शासनाने तारखेनुसार शिवजन्मौत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्या परंपरेनुसार संगमनेर नगर परिषदेच्यावतीने आज सकाळी पालिकेच्या प्रांगणात शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धिरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश घोलप आदींसह शासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरीक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संगमनेर नगर परिषदेच्यावतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या आवारातील रघुनाथ शिवाजीराम करवा वाचनालय व स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासिका सुरु केल्या आहेत. सध्या या दोन्ही अभ्यासिकांमध्ये 104 विद्यार्थी अध्ययन करीत असून त्यातील 20 जणांनी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये बाजी मारतांना शासकीय पदं पटकावली आहेत. ग्रामीणभागातून आलेल्या या विद्यार्थ्यांनी सोळा-सोळा तास अभ्यास करुन, प्रचंड परिश्रम घेत यश मिळवले. आजच्या शिवजयंतीचे औचित्य साधून मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा कार्यक्रम ठेवला होता. विशेष म्हणजे या सर्व मुलांना केवळ जयंती उत्सवात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले होते, सुरुवातीला आपल्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा वरीष्ठ अधिकार्‍यांच्या हातून सन्मान होईल याची पुसटशीही कल्पना या मुलांना नव्हती.


त्यामुळे अचानक नाव जाहीर झाल्याने सुरुवातीला ही सगळी मुलं काहीशी भांबावलीही होती. पालिकेतील दोन्ही अभ्यासिकेत मिळून एकूण 20 मुलांनी उत्तम गुणांसह बाजी मारताना राज्य शासनाच्या विविध विभागांमधील पदं मिळवली आहेत. त्या सर्वांचा उपस्थित अधिकार्‍यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून सत्कार करण्यात आला. त्या मध्ये म्हाडाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंता झालेला विक्रम मीनानाथ पवार (शिरापूर), कनिष्ठ अभियंता स्वप्नील विलास सोनवणे (वेल्हाळे), जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता म्हणून अक्षय भास्कर दिघे (कोल्हेवाडी), अविनाश चांदव (जालना) व विष्णू उत्तम काशिद (बीड), सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक म्हणून नियुक्ती झालेला रोषण विजय शिरोळे (सिन्नर), भूमी अभिलेख विभागातील सर्व्हेअर म्हणून हिवरगाव पावसा येथील शुभम सुनील पावसे,


आरोग्य विभागात सहाय्यक म्हणून नियुक्ति मिळवणारे अक्षय आहेर (पिंपळगाव कोंझीरा), महेश देशमुख (राजापूर), अविनाश लंके (पारनेर) व विकास खोकले (राजूर), सहकार विभागातील सहाय्यक पदावर आकाश मांडे (पिंपळदरी), मुंबई पोलीस दलात भरती झालेले दीपक काळे, केवल कतारी, सावळेराम मिठवे (संगमनेर), श्रीराम पवार (गणोरे), संतोष पवार (निळवंडे) पालघर जिल्हा परिषदेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्त झालेला अमीत बबन व्हडगर (पारेगाव), मंत्रालयात लिपिक झालेला नीलेश भारत आभाळे (अकोले) व नंदूरबारच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षक पदावर निवड झालेल्या निमज येथील माजी सैनिक संतोष आहेर यांचा समावेश होता.


बहुतेक ग्रामीण आणि दुष्काळी भागात राहणार्‍या या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी गावाकडे पुरेशा सुविधा मिळत नसल्याने ही मुलं शासकीय अभ्यासिकांचा आधार घेतात. संगमनेर नगर परिषदेने पालिकेच्या प्रांगणातील जुन्या वाचनालय इमारतीसह स्वातंत्र्य चौकातील मंगल कार्यालय स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले आहे. त्याचा अनेक गरजू विद्यार्थ्यांना फायदा होत असून वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी रोजगाराची महाद्वारे उघडली जात आहेत. पालिकेने आजच्या दिनाचे औचित्य साधून केलेला हा कौतुक सोहळा खर्‍याअर्थी महापुरुषांचे जन्मसोहळे कसे साजरे करावेत याचा आदर्श निर्माण करणारा ठरला.


संगमनेर नगर पालिकेच्या अभ्यासिकांमध्ये रात्रं-दिवस परिश्रम करुन तब्बल 20 विद्यार्थ्यांनी म्हाडा, जलसंपदा, बांधकाम, भूमी अभिलेख, आरोग्य, सहकार, पोलीस प्रशासन आणि मंत्रालयापर्यंतची विविध पदं मिळवली आहेत. कोणताही डामडौल नाही, सुविधा नाहीत, दोनवेळच्या जेवणाचीही भ्रांत अशा स्थितीत मेहनतीच्या बळावर या विद्यार्थ्यांनी यशाला गवासणी घातली आहे. नियुक्तिच्या ठिकाणी हजर होण्यापूर्वी त्यांच्या पाठीवर प्रशासकीय कौतुकाची थाप देवून संगमनेर नगर परिषदेने महापुरुषांचे जयंती सोहळे कशाप्रकारे साजरे व्हायला हवेत याचा वस्तुपाठही उभा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *