‘अखेर’ म्हाळुंगीच्या पुलाला मुहूर्त लागला! बुधवारी भूमीपूजन; पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींची उपस्थिती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दीड वर्षांपासून ‘सत्ताधारी’ आणि ‘विरोधक’ अशा राजकीय झोक्यांवर हिंदोळे खाणार्‍या म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामास अखेर मुहूर्त लागला आहे. नानाविध आरोप आणि प्रत्यारोपाच्या राजकारणात दीर्घकाळ अडकलेल्या या पुलाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा बुधवारी होणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार्‍या या सोहळ्यासाठी शिर्डीचे खासदार व संगमनेरचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राजकीय अडथळ्यांची शर्यत पार करुन अखेर या पुलाच्या बांधकामाचा दिवस उजेडल्याने त्रासलेल्या नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.


दोन वर्षांपूर्वी 13 ऑक्टोबर 2022 रोजी संगमनेर शहर व प्रवरा परिसराला जोडणारा साई मंदिराकडे जाणारा हा पूल खचला होता. मात्र पालिकेत प्रशासकांचे राज्य असल्याने आणि त्यातच राज्यात सत्ताबदल होवून महायुती सत्तारुढ झाल्याने सदरचा पूल राजकारणात अडकला. स्थानिक भाजपाने आपले बळ वापरुन पालिकेच्या व्यापारी संकुलासाठी आलेला सात कोटी रुपयांचा निधी पुलाच्या कामासाठी वळता केला गेला. त्यातून नव्या राजकारणाची ठिणगी पडली. मात्र तरीही पावसाळ्यात पुलाचे काम सुरु होवू शकले नाही. मात्र त्यानंतर कृती समितीने सातत्याने प्रशासनावर दबाव निर्माण करुन विषय जागता ठेवला.


मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघही सुरुवातीपासून नागरिकांना दिलासा देण्याच्या मनस्थितीत असल्याने त्यांनीही मर्यादेच्या पलिकडे जावून अनेक गोष्टींची पूर्तता केली. या दरम्यान खर्चातही वाढ झाली, तो निधीही पत्रव्यवहार करुन मिळवण्यात आला. निविदा सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबत शंका निर्माण करुन आडहत्यारी ठेकेदारीचे आरोप सुरु झाले. अर्ज आणि निवेदनांचे पिकं आले. या दरम्यान पुलाखालून बरेच पाणीही वाहून गेले आणि काहींनी त्यात आंघोळी तर काहींनी हात धुवून घेतले. त्यामुळे या पुलाचे प्रत्यक्षात काम सुरु होते की नाही अशी साशंकताही निर्माण झालेली असतांना अखेर त्याला मुहूर्त गवसला आहे.


उद्या बुधवारी (ता.21) सायंकाळी 5 वाजता राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते या पुलाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे, खासदार सदाशिव लोखंडी, माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे, हेमंत दराडे व प्रा.राम शिंदे, प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. दीडवर्ष राजकीय हिंदोळे खाणार्‍या या पुलाच्या बांधकामाला अखेर मुहूर्त लागल्याने साईनगर, पंपींग स्टेशनसह प्रवरा परिसर आणि कासारवाडी शिवारात राहणार्‍या रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.


सद्यस्थितीत कोसळलेल्या अवस्थेत असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल दोन दशकांपूर्वी दिवंगत खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधीतून उभारण्यात आला होता. त्यांच्याच हस्ते त्यावेळी पुलाच्या लोकापर्णाचा सोहळा झाला होता. आता दोन दशकांनंतर त्यांचे सुपूत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्याच पुलाच्या कामाचा शुभारंभ होत आहे. हा निव्वळ योगायोग असला तरीही यातून संगमनेरकरांना राजकीय कड्या करण्यास मात्र प्रसंग उपलब्ध झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *