‘संगमनेर रोटरी क्लब’ने विद्यार्थ्यांना मोफत टॅब देऊन घडवली ‘डिजिटल क्रांती’! ‘रोटरी इंडिया लिटरसी मिशन’ अंतर्गत नऊशे विद्यार्थ्यांना तीनशे टॅबचे केले वित

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी ऑनलाईन शैक्षणिक साधनांसाठी वंचित असताना रोटरी क्लबने ई-लर्निंग डिजिटल स्कूल अंतर्गत मोफत टॅबचे वितरण करुन डिजिटल क्रांती घडवली आहे. स्पर्धेच्या आधुनिक युगात वंचित विद्यार्थ्यांना हे टॅब दिशादर्शक ठरतील असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून संगमनेर तालुक्यातील 17 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील 900 मुलांना ‘रोटरी इंडिया लिटरसी मिशन’ अंतर्गत रोटरी ई-लर्निंग डिजिटल शैक्षणिक 300 टॅब वितरणाचा कार्यक्रम बुधवारी (ता.7) मालपाणी लॉन्स येथे पार पडला, त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर डॉ.संजय मालपाणी, रोटरी क्लब पुणे नॉर्थचे कुमार शिनगारे, मनीषा कोणकर, रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा, सचिव योगेश गाडे, प्रकल्प प्रमुख सुनील कडलग, ओंकार सोमाणी, डॉ.प्रमोद राजूस्कर, नरेंद्र चांडक उपस्थित होते. यावेळी सर्व 17 शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रातिनिधिक शिक्षिका वृषाली कडलग, वैशाली हासे, श्रीकांत बिडवे यांनी टॅबचा स्वीकार केला. विद्यार्थी दत्ता कडलग याने मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुढे बोलताना आमदार डॉ.तांबे म्हणाले, रोटरी क्लबच्या स्थापनेपासून क्लबने संगमनेरसाठी मोठे योगदान दिले असल्याचे सांगून, शैक्षणिक क्षेत्रामध्ये रोटरीद्वारे केल्या जाणार्‍या कामांबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.मालपाणी म्हणाले, आपल्या मदतीद्वारे समाजातील प्रत्येक गरजवंताची गरज पूर्ण करायला मिळेल या भावेनतून रोटरी क्लब संगमनेरतर्फे विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. यामध्ये समाजातील प्रत्येक घटक सामावून घेतला जाईल याची काळजी घेतली जाते. रोटरी क्लब सदस्य हे आधी करुन दाखवतात मग समाजाकडून ते करण्याची अपेक्षा ठेवतात. या टॅब वितरणाद्वारे रोटरीने उद्याचे उज्ज्वल भविष्य घडविणार्‍या मुलांपर्यंत ही मदत पोहोचवून संगमनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती आणली आहे. हेच विद्यार्थी भविष्यात संगमनेरचे नाव जगात उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व त्यांच्या पालकांनाही रोटरी क्लबचा नक्कीच अभिमान वाटेल, असा विश्वास शेवटी त्यांनी व्यक्त केला.

रोटरी जिल्हा 3131 व 3132 यांनी एकूण एक कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पाद्वारे 1500 शैक्षणिक टॅब वितरित केले. याप्रसंगी कॉम्पकीन या शैक्षणिक प्रणाली निर्मिती कंपनीचे संचालक बीरेन धरमसी आणि प्रकल्पासाठी आर्थिक योगदान देणार्‍या दानदात्यांचा सत्कार करण्यात आला. रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनी प्रास्ताविक भाषणात रोटरीच्या समाजिक कार्याचा आढावा घेतला. प्रकल्प प्रमुख सुनील कडलग यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. डॉ.प्रमोद राजूस्कर व नरेंद्र चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सूत्रसंचालन भुषणकुमार नावंदर व संजय कर्पे यांनी केले तर आभार योगेश गाडे यांनी मानले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आमदार निधीतून पाच लाख असे एकूण दहा लाख निधी रोटरी ई-लर्निंग डिजिटल स्कूल टॅबसाठी जाहीर केला आहे. संगमनेर रोटरीचे अध्यक्ष पवनकुमार वर्मा यांनीही या प्रकल्पासाठी 50 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. या निधीमध्ये रोटरी इंटरनॅशनल 50 लाख रुपयांचे योगदान देणार असून हा निधी एकूण 60 लाखांचा होणार आहे. त्यातून संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक प्रकाशवाट निर्माण होणार आहे. या टॅबमध्ये कॉम्पकीन कंपनीचा इयत्ता पहिली ते सातवीचा अभासक्रम समाविष्ट आहे.

Visits: 52 Today: 1 Total: 435767

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *