स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांनी साजरा पंचायत समिती अधिकारी व कर्मचार्यांनी काढली मोटारसायकल रॅली

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील पंचायत समिती परिसर देशभक्तीमय वातावरणात विद्युत रोषणाईने उजळून निघाला. स्वातंत्र्यदिनी प्रशासक तथा गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या हस्ते एनसीसी पथक संचालनात ध्वजारोहण करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. त्याच दिवशी पुरुष व महिलांचा सहभाग असलेली मोटरसायकलवरून तिरंगा रॅली काढण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये पंचायत समिती अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या. यामध्ये अनेक कर्मचार्यांनी सहभागी होत यश संपादन केले. स्पर्धांचे आयोजन व नियोजन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांनी यशस्वीरित्या केले होते. या स्पर्धांमधील सर्व यशस्वी स्पर्धकांचे पारितोषिक वितरण ज्ञानमाता विद्यालयात संपन्न झाले.

पुरुष व महिला कर्मचार्यांच्या कबड्डी, खो-खो, रस्सीखेच, भालाफेक, गोळा फेक, 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, बुद्धीबळ यांसारख्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. योगासने स्पर्धाही घेण्यात आल्या. उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पंचायत समितीच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक गीत गायन, समूहगीत गायन, नाटिका, समूह नृत्य, एकपात्री नाटक या स्पर्धा घेण्यात आल्या. गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचाही देशभक्तीपर आधारित नृत्यात उत्स्फूर्त सहभाग राहिला. सर्व स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकाला चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले. यावेळी विजेत्या स्पर्धकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

पारितोषिक वितरण प्रसंगी अनिल नागणे यांनी सर्व विभाग प्रमुख व कर्मचार्यांच्या सहभागाबद्दल कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे, कार्यालयीन अधीक्षक ऋषीकेश बोरुडे, शंकर महांडुळे, उपअभियंता एस. एस. गडधे, पी. व्ही. जाधव, कक्ष अधिकारी राजेश तिटमे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, बालविकास प्रकल्प अधिकारी कुकडे, कृषी अधिकारी रामराव कडलग, रत्नमाला शिंदे, पशुसंवर्धन अधिकारी शिंदे यांसह सर्व विभागाचे विस्तार अधिकारी व शिक्षण विभागाचे कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सोमनाथ घुले यांनी केले तर आभारप्रदर्शन कक्ष अधिकारी राजेश तिटमे यांनी केले.
