देवळाली प्रवरा पालिकेने तत्काळ कोविड सेंटर सुरू करावे! मेडिकल हेल्प टीमची मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे मागणी
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे कोविड सेंटर तत्काळ सुरू करा, अशी मागणी देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या सदस्यांनी मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी मेडिकल हेल्प टीमचे दत्तात्रय कडू, आप्पासाहेब ढूस, अमजद इनामदार, अनिस शेख, प्रशांत कराळे, ऋषीकेश संसारे, डॉ. संदीप कदम आदी उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय कडू म्हणाले, गेल्या काही दिवसांत देवळाली प्रवरा शहरात कोविडचे रुग्ण पुन्हा आढळून येत असल्याने पालिकेने ते सुरू करत असलेले 100 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर तातडीने सुरू करून रुग्णांची होणारी धावपळ व गैरसोय टाळावी. सहारा कोविड सेंटरमध्ये मेडिकल हेल्प टीमच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी बेड, मेडिकल साहित्य, पंखे आदी दान केले होते. आता सहारा बंद झाल्याने हे सर्व साहित्य पालिका सुरू करत असलेल्या मोफत कोविड सेंटरला देण्यासाठी हेल्प टीमने मुख्याधिकार्यांची भेट घेतली.
दरम्यान, कोविड सेंटरची तयारी पूर्ण होत आली असून शासनाचे आदेश येताच ते सुरू करण्यात येईल, असे मुख्याधिकारी निकत यांनी सांगितले. निदान विलगीकरण कक्ष तातडीने सुरू करावा आणि देवळाली प्रवरा शहरात लसीकरण अत्यंत मंद गतीने होत असून नागरिकांवर इतर गावांत जाऊन लस घ्यावी लागत आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेता लसीचा जास्तीचा साठा शहरास मिळावा, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकार्यांशी संपर्क करून त्यांना शहरातील परिस्थिती समजावून सांगितली. त्यांनी लसीचा कोटा वाढवून देत असल्याचे आश्वासन दिले. गेले दोन-अडीच महिने कोविड रुग्णांना देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमने ‘सहारा’ दिला आहे. याबद्दल त्यांचे नागरिक आभार मानत आहे.