आघाडीच्या ‘संभ्रमात’ इच्छुकांची ‘मोर्चेबांधणी’! शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीबाबत आशावादी; काँग्रेसची मात्र मुठ झाकलेलीच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ओबीसी आरक्षणाच्या कारणावरुन यापुढील कालावधीत मुदत संपणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाबाबत काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र असे असले तरीही निवडणुका होवू घातलेल्या ठिकाणी इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. संगमनेरही त्याला अपवाद राहिले नसून सत्ताधारी काँग्रेससह भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीनेही आपल्या ताकदीची मोजदाद सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरात तीन पक्षांची आघाडी होवून दुरंगी लढती होणार की बहुरंगी याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला स्थानिक पातळीवरही ‘आघाडी’ होण्याचा विश्वास आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी काँग्रेस पक्षाशी बोलणीही सुरू असल्याचे समजते. मात्र गेल्या तीन दशकांपासून पालिकेत एकहाती सत्ता असलेली काँग्रेस ‘आघाडी’ निर्माण करुन आपल्या भरलेल्या ताटातील सत्तेचा वाटा मित्र पक्षांना देणार का? अशी शंका राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. अर्थात येथील आघाडीबाबतचे सर्वाधिकार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याने ते काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे नवीन सूत्र जन्माला आले. भाजपाची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी शिवसेनेने 25 वर्षांच्या मैत्रीवर पाणी फेरुन आपले पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत सत्तेची मोट बांधली आणि मुख्यमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेतले. राज्यातील राजकीय समीकरणं पाहता तीन पक्ष एकत्र आल्याने ‘महाविकास’ आघाडीची ताकद तिपटीने वाढली. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल असेच काहीसे चित्र निर्माण झाले होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पोट निवडणुका आणि मुदत संपलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुका पाहता राज्यात सत्तेत असणारी काँग्रेस स्थानिक पातळीवर आघाडी करण्यास फारशी इच्छुक नसल्याचेच प्रकर्षाने समोर आले आहे. विधान परिषद व अहमदनगर महापालिकेच्या पोट निवडणुकीच्या निकालानंतर समोर आलेली धुसफूसही असेच काहीसे सांगणारी आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासूनच ‘एकला चलो रेऽ’चा नारा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या या घोषणेमुळे सुरुवातीला आघाडीत काहीसा गोंधळही निर्माण झाल्याने वरीष्ठांकडून त्यांचे कानही पिळण्यात आले, मात्र तो केवळ दिखावा असल्याचेही नंतरच्या काळात समोर आले. खरेतर केवळ भाजपाला सत्तास्थानापासून रोखण्यासाठी जहाल विचारांच्या शिवसेनेसोबत गेल्यास आपल्या धर्मनिरपेक्ष छबीला धक्का लागून पारंपरिक अल्पसंख्यांक व दलित मतांवर गडांतर येण्याची भीती असतानाही काँग्रेस राज्याच्या सत्तेत सहभागी झाली. राजकीय जाणकारांच्या मते काँग्रेसच्या विचार गटाने त्यावेळी आणि आजही ‘त्या’ कृतीला विरोधच केला आहे. मात्र जेव्हा मोठा शत्रू रोखायचा असतो, तेव्हा अशा पद्धतीच्या राजकीय व्युहरचना क्रमप्राप्तच असल्याचे मानून ‘समान कार्यक्रमाच्या सूत्रावर’ राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची महाविकास आघाडी निर्माण झाली.

गेल्या मंगळवारी (ता.21) राज्यातील 105 नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यात जिल्ह्यातील अकोले, पारनेर व कर्जत येथील नगरपंचायती व शिवरायांचा अवमान करणार्या श्रीपाद छिंदम यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या प्रभाग 21 मधील पोटनिवडणुकीचा समावेश होता. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणूकपूर्व बैठकांसह प्रचार प्रक्रीयेतही सक्रीय सहभाग घेतला. मात्र जिल्ह्यातील या तीन ठिकाणच्या निवडणूक प्रक्रीयेसह राज्यात कोठेही त्यांच्याकडून अथवा पक्षातील इतर कोणत्याही मोठ्या नेत्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘आघाडी’ करण्याबाबत एका शब्दाचाही उल्लेख झाल्याचे ऐकीवात नाही. सदरचा निर्णय त्यांनी स्थानिक पातळीवर सोडून दिल्याचेच दिसून आले. यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली, मात्र बहुतेक ठिकाणी काँग्रेस आघाडीपासून दूरच राहिल्याचेही चित्र बघायला मिळाले. राज्यातील सत्ताकारणाशिवाय अन्य ठिकाणी आघाडीबाबत काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी साधलेली चुप्पी राजकीय जाणकारांना अस्वस्थ करणारी असल्याने त्यांच्याकडून आगामी काळातील निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

161 वर्षांचा सुवर्ण इतिहास असलेल्या संगमनेर नगरपरिषदेत 1992 पासून काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. दोन हजार सालच्या दशकापर्यंत पालिकेत शिवसेना व भाजपाचेही मोजता येतील इतके सदस्य होते. मात्र मागील दोन दशकांत टप्प्याटप्प्याने त्यात घट होवून आजच्या स्थितीत पालिकेच्या 28 सदस्यसंख्येत भाजप व शिवसेनेचा केवळ प्रत्येकी एकच सदस्य आहे. असे असताना सत्तेच्या जवळजवळ संपूर्ण भरलेल्या ताटातून स्थानिक काँग्रेससाठी अनावश्यक असलेली आघाडी निर्माण करुन मित्र होवू पाहणार्या पक्षांना वाटा देणं काँग्रेसला राजकीय दृष्टीने परवडणारे आहे का? अशी शंकाही निर्माण होण्यास मोठा वाव आहे. मात्र स्थानिक शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी संगमनेरात आघाडी होईलच याबाबत प्रबळ आशावाद बाळगून आहेत व त्यादृष्टीने काँग्रेससोबत बैठकांचे सत्रही सुरु असल्याचे समजते. मात्र काँगे्रसची मुठ मात्र अद्यापही झाकलेलीच आहे. अर्थात कनिष्ठ पातळीवर होणार्या चर्चेवर अंतिम निर्णय संगमनेरचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरातच घेणार असल्याने आजची चर्चा किती सकारात्मक अथवा नकारात्मक ठरते यावर भाष्य करणं घाईचे ठरेल.
(क्रमशः)

