कर्जदार कुटुंबाकडून इच्छा मरणाची याचना! तालुक्यात खासगी सावकारी फोफावली; घारगावचे उपनिरीक्षक उमेश पतंगेही चर्चेत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या विरोधात उठलेली संतापाची राळ खाली बसण्यापूर्वीच पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्याबाबतही धक्कादायक आरोप समोर आले आहेत. साकूर येथील एका महिलेने घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात चारपट रक्कम देवूनही खासगी सावकाराकडून छळ होत असल्याची व त्याला घारगावचे उपनिरीक्षक उमेश पतंगे पाठबळ देत असल्याची तक्रार केली आहे. मुख्यमंत्र्यांपासून पत्रकारांपर्यंत अनेकांना पाठवलेल्या व्यथेतून संबंधित विवाहितेने सावकाराच्या फासातून सोडवा किंवा कुटुंबासह इच्छा मरणाला परवानगी द्या अशी मागणी केल्याने खळबळ उडाली आहे. या पत्राची दखल घेत सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी साकूरच्या ‘त्या’ दोन्ही सावकारांवर छापा घालून कागदपत्रे जप्त केली आहेत. या घटनेने संगमनेर तालुक्यात फोफावलेली खासगी सावकारीही चव्हाट्यावर आली असून राज्यात कायदा असूनही त्याची उघड पायमल्ली होत असल्याचेही दिसून आले आहे.


याबाबत साकूर येथील एका विवाहितेने जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात आपली व्यथा मांडली असून त्याच्या प्रति राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री व संगमनेरातील पत्रकारांना पाठवल्या आहेत. या पत्रानुसार तालुक्यातील साकूर येथील राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे या दोघा खासगी सावकारांच्या जाचातून मुक्ती मिळवण्यासाठी साकूरमध्ये राहणार्‍या त्या महिलेने थेट इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशा आशयाचा अर्जच पाठवला आहे. या अर्जाची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी सहकारी संस्थांच्या जिल्हानिबंधकांना आदेशित केल्यानंतर संगमनेरच्या सहकारी संस्थांचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी कारवाईचे पाऊल उचलतांना दोन्ही सावकारांच्या घरावर छापे घालून कागदपत्रे जप्त केली आहेत.


तक्रार अर्जानुसार राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे हे दोघे साकूरमध्ये सावकारी करीत असल्याचा आरोप करण्यात आला असून या दोघांकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात आपण चारपट अधिक पैसे अदा केल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. इतके पैसे घेतल्यानंतरही दोन्ही सावकार आपले घर ताब्यात घेण्यासाठी मानसिक छळ करीत असून मुलांसह आपल्याला ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याचेही म्हंटले आहे. या दोघांकडून गावात व नातेवाईकांमध्ये आपली बदनामी केली जात असून दिवसोंदिवस या गुंडांचा त्रास वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.


कहर म्हणजे खासगी सावकारी करणारेच कर्जदाराला पोलिसांचा धाक दाखवित असल्याचा उल्लेख करुन तुझ्या कुटुंबाला जीवे ठार केले तरीही आमचे काही वाकडे होणार नाही. ‘घारगाव’ पोलीस ठाण्यात आमची खूप ‘चलती’ आहे. पाच-दहा लाख रुपये देवून तुझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करु शकतोअशीही धमकी भरली जात असल्याचे या तक्रारीतून सांगण्यात आले आहे. आपल्यासह आपल्या संपूर्ण कुटुंबाला घारगाव पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे आणि दोघा सावकारांनी धमेकी दिल्याचा गंभीर आरोपही पीडित महिलेने आपल्या तक्रारीतून केला आहे.


छळ करीत असलेल्या सावकाराला पोलिसच पाठबळ देत असतील तर न्याय मिळणार कसा? त्यामुळे न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने कुटुंबासह जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे व ‘फेसबुक’ लाईव्ह करुन एकत्रित आत्महत्या करणार असल्याचे म्हंटले आहे. मरण्यापूर्वी समाज माध्यमातूनही आपण छळणार्‍या सावकारासह पोलीस उपनिरीक्षकाच्या नावाचा उल्लेख करणार असल्याचेही पीडित महिलेने आपल्या व्यथापत्रातून सांगितले आहे. या प्रकाराने तालुक्यात फोफावलेल्या खासगी सावकारीचा आणि वसुलीसाठी कर्जदारांच्या पिळवणूकीचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. अशा प्रकारांना पोलिसांकडून पाठबळ मिळत असल्यास ते गंभीर असून वरीष्ठांनी त्याची दखल घेण्याची गरज आहे.


संबंधित दाम्पत्याच्या तक्रारीनुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र दाखल करुन घेतले आहे. त्यांच्या तक्रारीत नमूद राहुल किसन डोंगरे व सचिन बन्सी डोंगरे (दोघेही रा.साकूर) या दोघांवर सावकारी अधिनियमान्वये कारवाईसाठी राजेंद्र वाकचौरे व अल्ताफ शेख यांच्या पथकाने छापा घालून कागदपत्रे व दस्तावेज ताब्यात घेतले असून त्याचे अवलोकन करुन पुढील कारवाई करण्यात येईल.
संतोष कोरे
उपनिबंधक : सहकारी संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *