अटकेच्या भीतीने उपसरपंच झाला पसार!
नायक वृत्तसेवा, संगमनेर
किरकोळ कारणावरुन महिला तलाठी कर्मचार्यास शिवीगाळ व धमकी देत तिचा विनयभंग करणार्या संगमनेर खुर्दचा उपसरपंच गणेश साहेबराव शिंदे अटकेच्या भीतीने पसार झाला आहे. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर खुर्दमधील मारुती मंदिरासमोर घडलेल्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पीडित महिला कर्मचार्याच्या तक्रारीवरुन सोमवारी रात्री ‘त्या’ उपसरपंचाविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्यासह विनयभंग, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र तत्पूर्वीच या कथित नेत्याने गावातून धूम ठोकल्याने पोलीस आता त्याचा कसून शोध घेत आहेत.
याबाबत शहर पोलिसांच्या माहितीनुसार सोमवारी (ता.26) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संगमनेर खुर्दच्या महिला तलाठी आपल्या वरीष्ठ कार्यालयाकडे निघाल्या असता संशयीत आरोपी व संगमनेर खुर्दचा विद्यमान उपसरपंच गणेश सहेबराव शिंदे याने त्यांना रस्त्यात थांबवून आपल्या वारसा नोंदीच्या किरकोळ कारणावरुन त्यांच्याशी भर रस्त्यातच हुज्जत घालीत त्यांना अरेरावी केली. यावेळी संबंधित इसमाने त्या महिला कर्मचार्याच्या मोपेडची चावी काढून घेत त्यांच्या हातातील सरकारी कागदपत्रे हवेत भिरकावून दिली व महिला कर्मचार्याचा हात पकडून अर्वाच्च शिवीगाळ करीत त्यांना धमकीही दिली. या प्रकरणी संबंधित महिला कर्मचार्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 354, 504 व 506 नुसार संगमनेर खुर्दचा उपसरपंच गणेश शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून सोमवारी रात्रीच त्याच्या अटकेसाठी छापे घालण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तो पसार झाला असून ‘अटकपूर्व’ जामीन मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने तालुक्यातून संताप व्यक्त होत असून महिला कर्मचार्यांशी असभ्य वागणार्या अशा लोकप्रतिनिधींवर कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी तत्काळ कारवाई होण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.