माजी जिल्हा परिषद सदस्यावर अकोले पोलिसांत अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा

माजी जिल्हा परिषद सदस्यावर अकोले पोलिसांत अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
तर जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनीही पोलिसांत दिली तक्रार
नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव शंकर दराडे (रा.समशेरपूर) यांच्याविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध विरोधी कायदा (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसरी तक्रार जिल्हा परिषद सदस्य सुषमा बाजीराव दराडे यांनी दिली आहे. नामदेव आनंद डामसे (रा.शेणित) यांनी मद्यपान करून शिवीगाळ केली म्हणून दराडे यांनी तक्रार दाखल केली आहे.


जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांना विकासकामांची माहिती विचारण्यासाठी आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरे डामसे शेतकरी गट शेणित या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेव आनंदा डामसे गेले होते. नामदेव आनंदा डामसे (रा.शेणित, ता.अकोले) व सागर विष्णू तळपाडे (रा.सांगवी, ता.अकोले) हे दोघे रविवार दि. 11 ऑक्टोबर, 2020 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सुषमा दराडे यांच्यासोबत रखडलेल्या विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी गेले होते. तेव्हा बाजीराव दराडे यांना देखील दोघे प्रत्यक्ष भेटले. मार्च 2020 मध्ये शेणित गावातील पाणी पुरवठा नळ योजनेचे आपण उद्घाटन केले होते. देवगाव फाटा ते डामसेवाडी डांबरीकरण रस्ता उद्घाटन केला होता. त्या कामांच्या उद्घाटनावेळी काम पंधरा दिवसांत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.


परंतु सदरचे काम अद्याप सुरू न झाल्याने त्या रस्त्याला फार खड्डे पडले आहेत. संबंधित रस्त्याने शेती अवजारे आणि वाहनांना जाण्यासाठी प्रचंड त्रास होत असून तेथे किमान माती किंवा मुरूम तरी टाका, असे दोघे दराडे यांना सांगत होते. हे संभाषण सुरू असताना चर्चेची शुटिंग काढत असल्याचा संशय बाजीराव दराडे यांना आला. ते दोघांवर अचानक धावून गेले. आत्ताच्या आता येथून चालते व्हा. या दोघांना शिवीगाळ करीत दराडेला जाब विचारण्यासाठी इथवर येण्याची तुमची हिंमत कशी झाली असे म्हणून डामसे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नाही तर ठार मारुन टाकीन असे म्हणून धमकी दिली.


त्यानंतर दराडे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये बळजबरीने शुटिंग सुरू केली. मी सांगेल त्याप्रमाणे बोल असे म्हणून पुन्हा दमदाटी केली. त्यानंतर मोबाईलमध्ये शुटिंग काढत डामसे यांच्याकडून मी दारुच्या नशेत चुकून बाजीराव दराडे यांच्या घरी आलो. आता माझी चूक झाली, पुन्हा मी त्यांच्या घरी येणार नाही, असे वदून घेत डामसे यांच्या ताब्यातील मोबाईल काढून घेतले. त्यातील सर्व डाटा डिलीट करुन दुसर्‍या दिवशी ते मोबाईल सांगवी येथे बाजीराव दराडे यांनी स्वत: आणून दिले. त्यामुळे त्यांनी मला मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली, असे डामसे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.


दरम्यान, दिनांक 10 ऑक्टोबर, 2020 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान नामदेव आनंद डामसे यांनी बेकायदा घरात घुसून दारू पिऊन शिवीगाळ दमदाटी केली अशी तक्रार जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी दाखल केली आहे. या प्रकरणी तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 116235

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *