पावसाळ्यात पठारभागात पाणीच पाणी, मात्र उन्हाळ्यात भीषण दुष्काळ
पावसाळ्यात पठारभागात पाणीच पाणी, मात्र उन्हाळ्यात भीषण दुष्काळ
राज्यकर्त्यांच्या आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे धरणाचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागावर गेल्या काही दिवसांपासून धोऽऽ धोऽऽ पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढे-नाले, सिमेंट बंधारे, छोटी-मोठी धरणे, पाझर तलाव तुडूंब भरुन वाहत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात याच पठारभागाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. वर्षानुवर्षांपासून पाचवीला पुजलेल्या पठारभागाला खर्या अर्थाने धरणाची गरज आहे. मात्र राज्यकर्त्यांच्या आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शक्य असतानाही अद्यापही हे ‘दिवास्वप्न’ प्रत्यक्षात साकारु शकले नाही.
डोंगरदर्यांमध्ये वसलेल्या पठारभागाकडे वर्षानुवर्षांपासून दुष्काळी भाग म्हणून पाहिले जात आहे. येथील सर्व सामान्य शेतकर्यांच्या जणू पाचवीला दुष्काळच पुजलेला आहे. यावर मात करत किमान उदरनिर्वाह होण्यासाठी शेती करतात. पावसाळ्यात येथे दरवर्षी धोऽऽ धोऽऽ पाऊस पडतो. त्यामुळे छोटे-मोठे पाझर तलाव, सिमेंट बंधारे, विहिरी, ओढे-नाले तुडूंब भरून वाहतात. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पहावयास मिळते. याचा परिणाम संपूर्ण पठारभाग हिरवागार झालेला दिसतो. परंतु, हे नयनमोहक दृश्य दोन ते तीन महिनेच असल्याने औटघटकेचे ठरते. त्यानंतर उन्हाळा सुरू झाला की संपूर्ण पठारभाग हा वाळवंटासारखा दिसायला लागतो. मग हाताला काम नसल्याने येथील महिला व पुरुष रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्यात जातात. तर अनेकजण स्थलांतरही करतात. मात्र, खरा प्रश्न हा पिण्याच्या पाण्याचा निर्माण होतो. ऐन उन्हाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष होत असल्याने भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दोन-तीन किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते. तर ठिकठिकाणी गावांसह वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर फिरु लागतात.
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही येथील लोकांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. पाण्याची अशी दयनीय अवस्था पाहून अनेकजण आपल्या मुली पठारभागातील शेतकर्यांच्या मुलांना देण्यास धजावत नाही. तर अल्पशेती, अल्प उत्पादनामुळे आर्थिक प्रगतीचा आलेखही खालीच असतो. यामुळे आरोग्य, शिक्षण, व्यवसाय आणि शेतीसाठी भांडवल खर्च करणेही मुश्किल होते. जर पठारभागातील दर्याखोर्यांतून वाहून येणारे पावसाचे पाणी यापूर्वीच अडविले असते तर आज संपूर्ण पठारभाग हा ‘सुजलाम सुफलाम’ झाला असता. मात्र यासाठी कोणत्याही राज्यकर्त्यांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. ‘राहटीचा’ दरा येथे पाणी अडवून धरण व्हावे अशी अनेक वर्षांपासून मागणी सुरू आहे. मात्र विधानसभा मतदानासाठी अकोले मतदारसंघात तर कागदोपत्री संगमनेर तालुक्यात हा भाग गणला जात असल्याने नेहमीच सोयीस्कररित्या राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष होते. फक्त निवडणुका जवळ आल्या की पठारभागाकडे उमेदवार धाव घेतात.
आजही येथील शेती ही निसर्गाच्या लहरी पणावरच अवलंबून असते. पावसाळ्यात जर चांगला पाऊस पडला तरच खरीपाची पिके दमदार येतात. नाहीतर पावसाअभावी संपूर्ण खरीप हंगाम वाया जातो. कदाचित पिंपळगाव खांडसारखे एखादे छोटेसे धरण पठारभागावर झाले असते तर संपूर्ण पठारभाग पावसाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यातही हिरवागार राहिला असता. परंतु, ऐकेल ते सरकार कुठले? याचा प्रत्यय येथे येतो. मात्र, येथील शेतकर्यांच्या एकजुटीने एक दिवस नक्कीच हा प्रश्न तडीस लागून पठारभाग हिरवागार झाल्याशिवाय राहणार असा विश्वासही अनेक शेतकरी व्यक्त करत आहे.
संगमनेर तालुक्यात गणला जाणारा पठारभाग हा विधानसभेसाठी अकोले मतदारसंघाला जोडलेला आहे. यामुळे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होते. आधीच स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही मुलभूत सुविधांपासून वंचित असलेला हा भाग धरणासह विविध प्रश्न सुटेपर्यंत ‘डिजिटल इंडिया’ आणि प्रगतीच्या वाटेवर नसल्याचेच सिद्ध करेल.