तालुक्याच्या रुग्णसंख्येने चोविस तासांतच पार केले मैलाचे दगड! तालुक्याच्या रुग्ण संख्येत आजही विक्रमी बाधितांची नव्याने भर


नायक वृत्तसेवा, संगमनेर
दररोज वाढणार्या रुग्णसंख्येमुळे संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती दिवसोंदिवस अवघड होत चालल्याचे दिसत असतानाच आजच्या गुरुवारनेही बुधवारच्या रुग्णसंख्येशी स्पर्धा करीत तालुक्याच्या रुग्णसंख्येत विक्रमी भर घातली. मात्र संगमनेरच्या आरोग्य यंत्रणेसह स्थानिक प्रशासनाने सुरुवातीच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी कायम ठेवल्याने अजूनतरी तालुक्यातील कोणत्याही कोविड बाधिताची उपचारांसाठी परवड झाल्याचे वृत्त नाही. तालुक्याने चोवीस तासांपूर्वीच एकविसावे शतक ओलांडले होते, तर आज बावीसावे शतकही पार झाले. आजही ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या शहराच्या तुलनेत अधिक आहे. आज शहरातील 12 जणांसह एकुण 80 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 2 हजार 237 वर जावून पोहोचली आहे.

एकीकडे दररोज तालुक्याच्या ग्रामीणभागात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचे समोर येत आहे, तर दुसरीकडे शहरातील रुग्णसंख्या दररोज कमी होत असल्याचे गेल्या काही दिवसांतील निरीक्षणही समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे ग्रामीणभागात प्रादुर्भाव वाढत असतांना दुसरीकडे शहरातील रुग्णसंख्या कमी होत असल्याचा दिलासाही संगमनेरकरांना मिळत आहे. अर्थात यामागे शहरातील चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याचेही कारण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र सद्यस्थितीत शहरातील रुग्णसंख्या आणि उपचार व्यवस्था दोन्ही नियंत्रणात असल्याने संगमनेर व अकोले या दोन्ही तालुक्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक गोष्ट आहे.

आज शासकीय, खाजगी प्रयोगशाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीच्या अहवालातून शहरातील बारा जणांसह तब्बल एकूण 80 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शहरातील मालदाड रोड परिसरातील 46 वर्षीय तरुण, 56 व 43 वर्षीय महिला, चैतन्य नगर परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 27 वर्षीय तरुण, पेटकर हॉस्पिटल परिसरातील चाळीस वर्षीय तरुण, जयप्रकाश रोड परिसरातील 56 वर्षीय महिला, तर शहरालगतच्या गुंजाळवाडी शिवारातील निर्मल नगर मधील 57 वर्षीय इसम, अकोले नाका परिसरातील 76 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गोविंद नगर परिसरातील 31 वर्षीय तरुण, इंदिरानगर परिसरातील 33 वर्षीय महिला, ताजणेमळा परिसरातील 48 वर्षीय महिला व पंपिंग स्टेशन परिसरातील 32 वर्षीय तरुणाचा समावेश आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात आज विक्रमी 68 रुग्ण आढळून आले. त्यात कवठे मलकापूर परिसरातील पंचवीस वर्षीय तरुण, कवठे बुद्रुक मधील अडतीस वर्षीय महिला, साकुर मधील 32 वर्षीय तरुण, वनकुटे मधील 27 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द मधील 70, 50, 35 व 24 वर्षीय महिला, 82 वर्षीय वयोवृद्ध व 31 वर्षीय तरुण, धांदरफळ येथील 42 व वीस वर्षीय महिलेसह पंचवीस वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 71 व 60 वर्षीय ज्येष्ठ महिलांसह 38, 34, 20 व 19 वर्षीय महिला तसेच, 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक 46 व 18 वर्षीय तरुण व बारा वर्षीय मुलगा, वडगाव पान मधील 50 वर्षीय इसम, जोर्वे येथील 26 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 80 वर्षीय महिला, वेल्हाळे येथील सत्तावन्न वर्षीय इसम,

जवळेकडलग येथील 44 व 41 वर्षीय तरुण, बोटा येथील तेवीस वर्षीय महिला, अकलापुर येथील 70 व 65 वर्षीय ज्येष्ठ महिलांसह 26, 24 व 22 वर्षीय महिला, तसेच 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 26 वर्षीय तरुण, आश्वी खुर्द येथील 58 वर्षीय इसम, रहिमपुर येथील 35 वर्षीय महिला, हसनापुर येथील 36 वर्षीय तरुणासह, 29 वर्षीय तरुणी व नऊ वर्षीय बालिका, सादतपूर येथील 36 वर्षीय तरुण, पंधरा वर्षीय तरुणी, देवकवठे येथील 39 वर्षीय महिलेसह आठ वर्षीय बालक, चिंचपूर येथील 33 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 59 वर्षीय इसम व 40 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक येथील 22 वर्षीय तरुण, 76 वर्षीय महिला, मंगळापुर येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 70 वर्षीय, 16 वर्षीय महिला,

चिखली येथील 66 व 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 26 वर्षीय महिला व आठ वर्षीय बालिका, घुलेवाडी येथील 42 व सतरा वर्षीय तरुण, 38 व 15 वर्षीय महिला, सोनेवाडीतील 45 वर्षीय महिला, कुरण येथील 23 वर्षीय तरुण, खांजापुर मधील तीस वर्षीय महिला अशा ग्रामीण भागातील एकुण 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आज 22 वे शतके ओलांडून 2 हजार 237 वर जाऊन पोहोचली आहे.

गेल्या 1 सप्टेंबरपासून रुग्णसंख्येचे धमाके होत आहेत. मंगळवार 1 सप्टेंबररोजी माळीवाड्यातील 70 वर्षीय इसमाचा बळी गेला, तर तालुक्याच्या रुग्णसंख्येत 42 जणांची भर पडली. त्यात अकरा रुग्ण शहरातील तर 31 रुग्ण तालुक्यातील होते. बुधवार 2 सप्टेंबररोजी समनापूर येथील 62 वर्षीय इसमाच्या मृत्युसह शहरात सहा तर ग्रामीणभागात 31 रुग्ण आढळले. गुरुवार 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुणाच्या मृत्युसह अवघ्या सोळा रुग्णांची भर पडली, त्यात सात रुग्ण शहरातील तर नऊ रुग्ण ग्रामीण भागातील होते.

शुक्रवारी 4 सप्टेंबररोजी तालुक्याच्या रुग्णसंख्येत विक्रमी 80 रुग्णांची भर पडली, त्यात शहरातील 18 रुग्ण होते, शनिवार 5 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुणाच्या मृत्युसोबतच शहरातील 15 जणांसह 66 रुग्णांची भर पडली. रविवारी 6 सप्टेंबररोजी कोविडने तालुक्यात कहरच केला. शहरातील गिरीराजनगर मधील 62 वर्षीय इसम, पंपींग स्टेशन परिसरातील 73 वर्षीय महिला, चिखलीतील 76 वर्षीय महिला व घुलेवाडीतील 80 वर्षीय इसम अशा चौघांचा मृत्यु झाल्याने तालुका हादरला. त्यासोबतच शहरातील आठ जणांसह तालुक्यात 41 रुग्णही वाढले. सोमवार 7 सप्टेंबररोजी शहरातील सहा रुग्णांसह तालुक्यात 52 रुग्णांची भर पडली. मंगळवार 8 सप्टेंबररोजी 30 रुग्णांची भर पडली, तर बुधवार 9 सप्टेंबररोजी तब्बल 72 रुग्ण वाढले, त्यात शहरातील अवघे 11 तर तालुक्यातील 61 रुग्ण होते. तर आज तालुक्यात 80 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात शहरातील केवळ 12 रुग्णांचा समावेश आहे.

