सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणीची आत्महत्या! हिवरगाव पावसा येथील घटना; संगमनेर तालुका पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणीने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे नुकतीच घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुका पोलीस ठाण्यात सुनीता मच्छिंद्र पांडे यांनी गुरुवारी (ता.14) सकाळी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, माझी मुलगी वैष्णवी प्रसाद शिंदे (रा.हिवरगाव पावसा) हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यानंतर गेल्या अडीच महिन्यांपासून ते रविवार दिनांक 3 जानेवारीचे रात्री दहा वाजेपर्यंत सासरी हिवरगाव पावसा येथे नांदत असताना पती प्रसाद दादा शिंदे, नणंद ज्योती फुलचंद पांडे (दोघेही रा.हिवरगाव पावसा) व दुसरी नणंद सरिता भागवत पांडे (रा.कासारा दुमाला) यांनी घरगुती कारणांवरून वेळोवेळी विवाहिता वैष्णवी हिस मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करून शारीरिक व मानसिक छळ करायचे. या जाचाला कंटाळून वैतागलेल्या वैष्णवी हिने विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी पती व दोघी नणंद यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद क्रमांक 27/2021 भादंवि कलम 306, 498 (अ), 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आय.ए.शेख हे करत आहे.
‘कौटुंबिक कलह’…
सर्वत्र ‘कौटुंबिक कलह’ हा विषय ऐरणीचा बनला आहे. यातून अनेकदा खून, मारामार्या होतात. तर अनेकजण आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवतात. यामुळे विवाहानंतर दोन्ही कुटुंबांनी सामंजस्य ठेऊन एकमेकांना समजून घेत व्यवहार होणे अपेक्षित आहे. यामध्ये मुख्य भूमिका पती-पत्नीची असल्याने त्यांनीच योग्य निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरते. अन्यथा कौटुंबिक कलह हा दोन्ही कुटुंबांना (सासर व माहेर) उध्वस्त करण्यास पूरक ठरत असल्याचे वरील घटनांवरुन अधोरेखित होते.