पळून गेलेला आरोपी करणार होता दोघांचे खून! मात्र तत्पूर्वीच पुन्हा कारागृहात; मदत करणारे अन्य दोघेही गजाआड..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारी संगमनेरचा उपकारागृह फोडून पळून गेलेल्या चौघाही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला गुरुवारी यश आले. धुळ्यात मुक्काम ठोकून वाहन नादुरुस्त झाल्याने जळगाव जिल्ह्यातील मध्यप्रदेश राज्याच्या सीमेकडे निघालेल्या आरोपींना जामनेरजवळ घेरण्यात आले. यावेळी त्यांना मदत करणार्या अन्य दोघांनाही अटक करण्यात आली असून त्या सर्वांना शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आज त्यांना न्यायालयासमोर हजर करुन त्यांची पोलीस कोठडी मिळवली जाणार असून त्यातून पलायन नाट्याचे रहस्यही उलगडण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच पळून गेलेल्या चौघांमधील एकाने त्याच्याविरोधात फिर्याद दाखल करणार्यासह त्याला मदत करणार्याचा खून करण्याचा मानस बाळगल्याचे आता समोर आले आहे. या चौघांना पळून जाण्यास मदत करणार्या कुरण व वडगाव शेरी (जि.पुणे) येथील दोघांना देखील अटक करण्यात आली आहे.

गेल्या बुधवारी (ता.८) सकाळी साडेसहाच्या सुमारास संगमनेरचे उपकारागृह फोडून खून, खुनाचा प्रयत्न, पोक्सो व बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले राहुल देवीदास काळे, मच्छिंद्र मनाजी जाधव, अनिल छबू ढोले आणि रोशन रमेश दधेल उर्फ थापा हे चौघे पसार झाले होते. तत्पूर्वी त्यांनी पलायनाची पूर्ण तयारी केल्याचेही नंतर समोर आल्याने शहर पोलिसांची कार्यपद्धतही चव्हाट्यावर आली. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांसह अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु असतांनाच पळालेले आरोपी शिर्डी, कोपरगाव व्हाया ‘मालेगाव’ करीत धुळ्यात पोहोचले व रात्री त्यांनी तेथेच मुक्काम केला.

संगमनेरातून पसार झालेल्या आरोपींची माहिती व छायाचित्रे राज्यभर प्रसिद्ध झाल्याने धुळ्यात मुक्कामी पोहोचलेल्या आरोपींची माहिती पोलिसांना समजली. मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचण्यापूर्वीच आरोपी तेथून पसार झाले. मात्र पोलिसांनी जिद्द न सोडता त्यांचा माग काढीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील मध्य प्रदेशला भिडणार्या सीमेवरील शेळगाव येथील एका शेताला वेढा घालीत पसार झालेल्या चौघांसह त्यांना मदत करणार्या अल्ताफ असीफ शेख (वय २७, रा.कुरण, ता.संगमनेर) व मोहनलाल नेताजी भाटी (वय ४७, रा.वडगाव शेरी, जि.पुणे) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना आज (ता.१०) सकाळी संगमनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना आजच न्यायालयासमोर हजर करुन त्यांची कोठडी मागितली जाणार आहे.

पळून जाणार्या चौघांमधील दोघांवरील आरोप सिद्ध होवून त्यांना त्यात मोठी शिक्षा लागण्याची भीती वाटत होती. त्यातूनच त्यांनी पळून जाण्याचे नियोजन केले. त्याला मुळच्या नेपाळमधील असलेल्या रोशन दधेल उर्फ थापाची साथ मिळाली तर मच्छिंद्र जाधव हा वाहत्या गंगेत डुंबण्याच्या हेतूने त्यांच्यात सहभागी झाला होता. तुरुंगातून पळून जाण्यापूर्वी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्यावरुन गजाआड असलेल्या राहुल देवीदास काळे याने त्याच्या प्रकरणातील फिर्यादी आणि फिर्यादीला मदत करणार्या शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याचा खून करण्याचा मानस केला होता. तशा धमक्याही त्याने तुरुंगातून जामिनावर सुटणार्या ‘त्या’ कोठडीतील काही आरोपींच्या माध्यमातून ‘त्या’ दोघांना पाठविल्या होत्या.
नेपाळमध्ये गेल्यानंतर एखादी लाईन टाकू, इकडचे प्रकरण शांत झाल्यानंतर एखाद्या दिवशी अचानक संगमनेरात येवून त्या दोघांचेही मुडदे पाडू असा चंगच राहुल काळे याने मनात बांधला होता. त्यासाठीच कदाचित त्याने पलायन नाट्याची स्क्रिप्ट लिहिली असण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वीच पळून गेलेले सर्व आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक सोपान गोरे, दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, फुरकान शेख, संतोष लोंढे, विशाल दळवी, संदीप चव्हाण, अमृत आढाव, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, उमाकांत गावंडे व संभाजी कोतकर यांचा समावेश होता.

अन्यथा नेपाळमध्ये तपास पथक..
पळून गेलेले आरोपी नेपाळमध्येच जाणार हे निश्चित होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी रोशन रमेश दधेल उर्फ थापा याच्या नेपाळमधील घराचाही पत्ता हुडकून काढला होता व भारत-नेपाळ सीमेवरील नेपाळच्या पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीवास्तव यांच्याशीही संपर्क करुन त्यांना मदतीची विनंती करण्यात आली होती. त्यासाठी शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निवांत जाधव यांना विमानाने थेट काठमांडूला पाठविण्याचीही तयारी करण्यात आली होती, मात्र पलायनकर्त्यांना महाराष्ट्राचीच सीमा ओलांडता आली नाही आणि ते स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती सापडले.

