गोदावरीसह प्रवरा पट्ट्यात वाळूतस्करी फोपावली वाळू घेण्यासाठी मोजावे लागताहेत अव्वाच्या सव्वा पैसे


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यात गोदावरी पट्ट्यात नायगाव, गोवर्धनपूर याठिकाणी तर प्रवरा पट्ट्यात वांगी, एकलहरे अशा चार ठिकाणी शासकीय वाळूचे डेपो आहे. परंतु या चारही डेपोवरील वाळू वितरण रखडल्याने तालुक्यात दोन्हीही नदी पट्ट्यांमध्ये वाळूतस्करी चांगलीच फोपावली आहे. वाळूतस्करांच्या मनमानीमुळे सर्वसामान्यांना वाळू घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहे.

नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळावी तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा बसावा यासाठी शासकीय वाळूचे डेपो तयार करुन त्याठिकाणाहून एका क्लिकवर स्वस्त दरामध्ये वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनामार्फत वाळू धोरण जाहीर करण्यात आले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली.

सुरुवातीच्या काळामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पट्ट्यामध्ये नायगाव व गोवर्धनपूर येथे शासकीय वाळूचे डेपो सुरु करण्यात आले. काही दिवस चालल्यानंतर ते वाळूचे डेपो आता बंद असून सदर डेपो दिवाळीनंतर सुरु होणार आहे. त्यानंतर पुन्हा प्रवरा नदी पट्ट्यामध्ये वांगी व एकलहरे येथे शासकीय वाळूचे डेपो सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी फक्त वाळूचे डेपो तयार केले जात असून त्याचे वितरणही अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना वाळू मिळणे अवघड झाले आहे. नागरिकांच्या या मजबुरीचा फायदा वाळूतस्कर उठवू लागले आहेत. वाळूसाठी मागेल ती रक्कम मोजावी लागत असल्याने सर्वसामान्यांना मोठी आर्थिक झळ बसत आहे.

अवैध वाळू व्यवसायामुळे श्रीरामपूर तालुक्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे. हे वाळूतस्कर कुणालाही जुमानत नाही. वाळू उत्खनन व्यवसायात शिरलेल्या अपप्रवृत्तींना नष्ट करणे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने वाळू धोरणानुसार वाळूचे उत्खनन, साठवणूक आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्यासाठी ठिकठिकाणी वाळूचे डेपो तयार केले. परंतु, अजूनही वाळू मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना चढ्या दरानेच वाळू विकत घ्यावी लागत आहे.

Visits: 25 Today: 2 Total: 118966

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *