पोलीस अधिक्षकांची घोषणा हवेतच विरणार! संगमनेरची वाहतूक व्यवस्था ‘जैसे थे!’; सिग्नलबाबत कोणताही समन्वय नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
प्रगत शहराचा लौकीक असलेल्या संगमनेरच्या गचाळ वाहतूक व्यवस्थेबाबत पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केलेली घोषणा हवेतच विरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर संगमनेरच्या पहिल्याच भेटीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाहतूक समस्येवर उत्तर देताना धुळखात पडलेल्या ‘सिग्नल’ बाबत पालिका आणि पोलिसांच्या समन्वयातून उपायायोजना करण्याचा मनोदय व्यक्त करताना 15 जूनपासून सिग्नलद्वारा वाहतुकीचे नियोजन करण्याची घोषणा केली होती. मात्र त्याला पंधरवडा उलटला असतानाही शहर पोलिसांकडून कोणतीही हालचाल झाल्याची माहिती नाही. त्यामुळे पोलीस अधिक्षकांनी शहर पोलीस ठाण्याच्या खुर्चीत बसून दिलेल्या आदेशालाही चक्क त्यांच्याच नियंत्रणाखालील अधिकार्यांनी फाट्यावर टाकल्याची चर्चा शहरात सुरु झाली आहे.

प्रगत शहराचे बिरुद मिरवणार्या संगमनेरातील मानवी वसाहतीला हजारों वर्षांचा इतिहास आहे. प्रवरा-म्हाळुंगी-आढळा या नद्यांच्या संगमातून समृद्ध झालेल्या या परिसरातील बाजारपेठेचा लौकीकही आसपासच्या परगण्यांपर्यंत पोहोचलेला आहे. पाण्याची विपुलता आणि महानगरांच्या मध्यातील भौगोलिक स्थान यामुळे गेल्या काही दशकांमध्ये शहरीकरणाचा वेग वाढून शहराच्या कक्षा चौफेर विस्तारल्या आहेत. ग्रामीणभागातील शेतकरी कुटुंबांसह व्यापार-व्यवसायासाठी संगमनेरात वास्तव्य करणार्यांची संख्याही झपाट्याने वाढल्याने आजच्या स्थितीत सव्वालाखांहून अधिक नागरीक शहरी जीवनाचा उपभोग घेत आहेत. लोकसंख्येसह दुचाकी-चारचाकी वाहनांच्या संख्येतही दररोजच भर पडत असल्याने या सर्वांचा परिपाक रस्त्यावरील वाहतुकीवर होतो.

संगमनेरात शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा दर्जा खूप उंचीचा असल्याने जिल्ह्यासह आसपासच्या भागातील विद्यार्थी, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा राबताही मोठा असतो. त्यातच पुणे-नाशिक हा राष्ट्रीय आणि कोल्हार-घोटी हा राज्यमार्ग शहरातून जात असल्याने या मार्गावरील साधारण व जड वाहतुकीचा संपूर्ण ताण शहरावर पडतो. नगरकडून नाशिक अथवा पुण्याच्या दिशेने जाणार्या वाहनांसाठी समनापूरनजीक तर, पुण्याकडून नाशिक अथवा नगरच्या दिशेने जाणार्या वाहनांसाठी संगमनेर खुर्दनजीक बाह्यवळण देण्यात आले आहे. शिवाय नवीन महामार्ग शहराबाहेरुन गेल्याने थेट नाशिक-पुण्याकडे जाणार्या वाहनांना पर्याय असतानाही त्याचा प्रभावी वापर होत नसल्याने आजही अनेक प्रवाशी व अवजड वाहने शहरातूनच जातात. त्याचा परिणाम शहराच्या अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवर होवून दिल्लीनाका, तीनबत्ती, जोशी पॅलेस, बसस्थानक आणि काश्मिर हॉटेल या ठिकाणी महामार्गाला जोडणार्या अंतर्गत रस्त्यांमुळे कोंडीचा सामना करावा लागतो.

शहरात बेकायदा पद्धतीने भंगारातून आणलेल्या रिक्षांचा प्रवाशी वाहतुकीसाठी सर्रास वापर होत असल्याने गेल्या काही वर्षातच रिक्षांची संख्या हजारांमध्ये गेली आहे. त्यातच शहरातील अंतर्गत रस्त्यांसह महामार्गही अरुंद आणि अतिक्रमित असताना रहदारीच्या प्रत्येक चौकात आणि रस्त्यावर अशा बेकायदा रिक्षाधारकांनी जागा आडवल्याने त्यात भर पडून शहराची बेशिस्तीही वाढली आहे. पालिकेचे मुख्याधिकारी ‘कचराडेपोतून’ बाहेरच पडायला तयार नसल्याने शहराच्या प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीबोळात अतिक्रमण करणार्यांनी थैमान घातले आहे. सर्वसामान्य रोज त्याचा त्रासही सहन करीत आहे. पण पालिकेलाही शहराच्या गचाळपणाशी काहीच घेणे नसल्याने आधीच बेशिस्त आणि अनियंत्रित असलेल्या शहराच्या वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः डामळं वाजलं आहे. अरुंद रस्त्यांवर मनाला वाटेल तेथे चारचाकी, दुचाकी वाहने उभी करुन अनेकजण खरेदीसाठी दुकानांमध्ये जात असल्याने शाब्दीक वाद हा संगमनेरातील नियमित प्रकार झाला आहे.

पाच-सात वर्षांपूर्वी पालिकेने 35 लाखांचा खर्च करुन सिग्नल व्यवस्था उभारली. मात्र त्यांच्या संचालनावरुन पोलीस आणि पालिका असा वाद रंगल्याने आजवर ती सुरु होवू शकली नाही. या दरम्यान महामार्गाचे रुंदीकरणही झाल्याने त्यात काही सिग्नल काढून टाकण्यात आले. त्यामुळे शहराची वाहतूक आजही जैसे थे! आहे. अशा स्थितीत जिल्ह्याचा नव्याने पदभार घेवून पंधरवड्यापूर्वी संगमनेरात आलेल्या पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना त्यांच्या पहिल्याच भेटीत संगमनेरच्या पत्रकारांनी येथील वाहतूक व्यवस्थेवर बोलते केले. त्यावेळी त्यांनी 15 जूनपर्यंत संगमनेरात सिग्नल सुरु करण्याबाबत तजबीज करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक व पालिकेचे मुख्याधिकारी एकमेकांशी समन्वय साधून कारवाई करतील असेही त्यांनी सूचविले.

यावेळी त्यांनी काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेल्या संगमनेर उपजिल्हा वाहतूक शाखेबाबतही सकारात्मक वक्तव्य करताना त्याबाबतची माहिती घेवून योग्य निर्णय घेण्याचे संकेत दिले. एकंदरीत पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार घेतल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्याच भेटीत अपर पोलीस अधिक्षक, पोलीस उपअधिक्षक, पोलीस निरीक्षक अशा तिनही अधिकार्यांच्या समक्ष माध्यम प्रतिनिधीच्या प्रश्नावर बोलताना 15 जूनपर्यंत सिग्नल सुरु होतील असे आश्वासन देवूनही शहर पोलिसांकडून अद्याप कोणतीच हालचाल झाल्याची माहिती नाही. त्यातच पोलीस अधिक्षकांनी दिलेली तारीखही उद्याच असल्याने सद्यस्थिती पाहता इतक्या तत्काळ व्यवस्था उभी राहणं अशक्य आहे. त्यामुळे संगमनेर पोलिसांनी पोलीस अधिक्षकांच्या पहिल्याच आदेशाला फाट्यावर नेवून सोडल्याची जोरदार चर्चाही शहरात सुरु झाली आहे.

संगमनेर शहरातील बेकायदा रिक्षांचे थांबे, प्रचंड अतिक्रमण, फेरीविक्रेत्यांची मनमानी आणि चारचाकी वाहनांसह शहरात फिरणार्यांकडून वाट्टेल तेथे वाहने उभी करण्याचे प्रकार यातून शहरातून जाणार्या दोन्ही महामार्गांसह अंतर्गत सर्वच रस्त्यांना वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारकांवर व पालिकेकडून बेसुमार अतिक्रमणांवर कारवाई करणं अपेक्षित असताना दोन्ही यंत्रणाही मूकदर्शक बनल्याने संगमनेरची वाहतूक समस्या सामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पोलीस अधिक्षकांच्या आदेशानंतर त्यात सुधारणा होण्याची आशा असताना स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ती देखील फोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

