स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही थांबेना अंधश्रद्धेचा खेळ! मांत्रिकाने मागवले महिलेचे केस; जादूटोणा व अनिष्ट प्रथा प्रतिबंधकासह अॅट्रोसिटी दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटली. देशाने शून्यातून प्रगतीची सुरुवात करीत आज जगभरातील पाचवी आर्थिक महासत्ता म्हणूनही स्थान मिळवले. एकीकडे विज्ञानातून ब्रह्मांड कवेत घेण्याची मानवी धडपड सुरु असताना दुसरीकडे मात्र आजही अंधश्रद्धा आणि जादूटोण्यासारखे भूलविण्याचे प्रकार सर्रास सुरु असल्याचेही विरोधाभासी चित्र बघायला मिळते. असाच काहीसा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातून समोर आला असून चक्क मांत्रिकाच्या सांगण्यावरुन मागासवर्गीय समाजातील महिलेचे केस मागणार्या दोघांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व अंधश्रद्धा समूळ उच्चाटण अधिनियमासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) दोघांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार रविवारी सायंकाळी तालुक्यातील मालुंजे गावच्या शिवारात घडला असून याबाबत सोमवारी रात्री उशिराने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित सूनेच्या 45 वर्षीय सासूने फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रविवारी (ता.18) त्या आपल्या शेतात गायी चारीत असताना सकाळी दहाच्या सुमारास दोन इसम त्यांच्या घराजवळ आले. यावेळी त्यांनी घराजवळ असलेल्या सदर महिलेच्या सूनेकडे काहीतरी विचारणा करुन ते निघून गेले. त्यावर संबंधित महिलेने आपल्या सूनेकडे चौकशी केली असता ते दोघेही गायी पाहण्यासाठी आल्याचे तिने आपल्या सासूला सांगितले.

त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदरील महिला आपल्या गायींयह घरासमोरील रस्त्यावर असताना सकाळी
आलेले दोघेजण पुन्हा त्यांच्या घराजवळ आले. यावेळी मात्र त्या महिलेने ‘तुम्ही कशासाठी आले आहात?’ अशी विचारण केली. त्यावर त्यातील एकाने ‘माझी बहीण आजारी आहे, एका भक्ताने मला मागासवर्गीय समाजातील महिलेचे केस आणून देण्यास सांगितले आहे. तुम्ही देता का केस मला..?’ असे सांगताच त्या महिलेने ‘मी केस देणार नाही’ असे प्रत्युत्तर त्यांना दिले. त्यामुळे ते दोघेही आपल्या मोटारसायकलवरुन तेथून निघून गेले. त्यानंतर सुमारे तासाभराने सदर महिलेचा मुलगा घरी आला. त्यावेळी त्याच्या आईने सकाळी व सायंकाळी घडलेला प्रकार त्याला सांगितला. त्याचवेळी सदर मुलाची तोंड ओळख असलेल्या संतोष निठवे (रा. डिग्रस) याने त्याला मोबाईलवर संपर्क केला व ‘कोठे आहेस?’ अशी विचारणा केली. त्यावर त्या महिलेच्या मुलाने आपण गावातच असल्याचे सांगत काय काम आहे? अशी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर त्याने सकाळी व सायंकाळी त्याच्या घरी येण्याचे कारण सांगून त्याच्याकडेही केसांची मागणी केली. ‘तुम्ही या, मी देतो केस तुम्हाला’ असे उत्तर देत त्यानेही त्यांना घरी बोलावले.

त्या दरम्यानच्या कालावधीत संबंधित महिलेच्या मुलाने गावातील काही प्रतिष्ठीतांसह सरपंच व पोलीस पाटील यांना फोन करुन घराजवळ बोलावून घेतले. ठरल्याप्रमाणे 10 ते 15 मिनिटांतच ‘ते’ दोघेही तेथे आले. त्या सर्वांनी त्यांच्याकडे विचारणा करता त्यांनी ‘बहीण आजारी आहे, भक्ताने इलाज करण्यासाठी मागासवर्गीय समाजातील महिलेचे केस मागितले आहेत..’ असे म्हणू लागले. यातून त्या महिलेचा व तिच्या कुटुंबाचा अवमान होवून त्यांच्या भावना दुखवल्या गेल्या. त्यामुळे दुसर्या दिवशी त्यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. त्यानुसार पोलिसांनी संतोष विठोबा निठवे (वय 31, रा. डिग्रस) व भाऊसाहेब रामा कुदनर (वय 41, रा. शिंदोडी) या दोघांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा व अंधश्रद्धा समूळ उच्चाटन अधिनियमाचे कलम 3 (2) सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (अॅट्रोसिटी) कलम 3, (1), (पी), (यू), प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने स्वतः करीत आहेत. या वृत्ताने सुसंस्कृत व पुरोगामी विचारसरणीच्या संगमनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

