संगमनेर बसस्थानकातील चोरट्यांशी पोलिसांची मिलीभगत! दिवाळीच्या तोंडावर वृद्धेला पाच लाखांना लुटले; चोवीस तासानंतरही गुन्हा दाखल नाही..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर बसस्थानकात वारंवार घडणार्‍या चोरीच्या घटना थांबता थांबत नसून जवळजवळ दररोज घडणार्‍या या घटनांमुळे जिल्ह्यात ‘वैभवशाली’ ठरलेल्या या बसस्थानकाच्या लौकीकाला बट्टा लागला आहे. मागील काही कालावधीत स्थानकातील विक्रेते आणि प्रवाशांनी काही चोरट्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीनही केले, मात्र कोणत्याही कारवाईशिवाय त्यांना सोडून देण्यात आले. यावरुन स्थानकातील चोरटे आणि बंदोबस्तावरील पोलिसांची मिलीभगतही सुरु असून त्यातून सामान्य प्रवाशांचे मात्र गळे चिरले जात आहेत. या श्रृंखलेत आता आणखी एका मोठ्या चोरीचा समावेश झाला असून गुरुवारी सायंकाळी श्रीरामपूरला जाणार्‍या बसमध्ये चढत असताना एका ७४ वर्षीय वृद्धेच्या पिशवीतील सुमारे आठ तोळे वजनाच्या दागिन्यांसह रोकड आणि लाखभर रुपये असलेले दोन एटीएम कार्ड घेवून चोरटे पसार झाले. याप्रकरणी मात्र अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (ता.९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात घडली. शहरातील गणेशनगरमध्ये राहणार्‍या कुसुम सर्जेराव माघाडे (वय ७४) या दिवाळीसाठी लोणीत राहणार्‍या आपल्या मुलाकडे जायला निघाल्या होत्या. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास फलाटावर लागलेल्या संगमनेर-श्रीरामपूर बसमध्ये जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी होती. मात्र नेमक्या गर्दीच्या वेळीच बंदोबस्तावरील पोलीस गायब असल्याने या संधीचे सोनं करीत चोरट्यांनी सदरील वृद्धेच्या पिशवीला ब्लेड लावले. त्यातून पिशवीत ठेवलेल्या जवळपास आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह दहा हजार रुपयांची रोकड व लाखभर रुपये शिल्लक असलेल्या बँक खात्याचे दोन एटीएम कार्ड असा जवळपास पाच लाखांहून अधिक मूल्याचा मुद्देमाल घेवून चोरटे लंपास झाले.


सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर घाबरलेल्या त्या वृद्धेने एकच आरडाओरड केल्याने आसपासचे प्रवाशी त्यांच्या मदतीला धावले. मात्र तोपर्यंत चोरटे आपला कार्यभाग उरकून तेथून निसटले होते. सायंकाळी आठच्या सुमारास सदरील महिला आपल्या मुलासह शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठीही आल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांनी दागिन्यांचे देयक (बिल) सोबत आणलेले नव्हते, त्यामुळे पोलिसांनी त्यांना तशी सूचना देत सोने खरेदी केल्याची पावती घेवून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत त्यांना घरी पाठवले. त्यानंतर अद्यापपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

गेल्या काही वर्षांपासून संगमनेर बसस्थानकात सातत्याने प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडत आहेत. मात्र आजवर या परिसरात घडलेल्या एकाही घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. यामागील कारणांची मिमांसा केली असता शहर पोलिसांकडून बंदोबस्तासाठी पाठविण्यात येणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांचे बसस्थानकात चोर्‍या करणार्‍यांशी साटेलोटे असल्याची चर्चा कानावर आली. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता मध्यंतरीच्या कालावधीत बसस्थानकात खाद्यपदार्थ व शितपेये विकणार्‍या मुलांसह काही प्रवाशांनी बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांचे खिसे कापणारे, महिलांचे दागिने ओढणारे काही चोरटे रंगेहात पकडून बंदोबस्तावरील पोलिसांच्या स्वाधीन केले. वास्तविक अशावेळी त्या चोरट्यांची सखोल चौकशी होवून त्याने त्यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांची उकल होण्याची आवश्यकता असताना प्रत्येकवेळी घडले मात्र भलतेच.

ज्या आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले गेले, तेच चोरटे काही वेळात पुन्हा बसस्थानकात सक्रीय झाल्याचे आणि ज्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या हाती सोपविले त्यांनाच ‘तुझ्याकडे बघून घेईल..’ अशी धमकी भरत असल्याचीही अनेक उदाहरणे समोर आली आहेत. यावरुन संगमनेर बसस्थानकात घडणार्‍या प्रत्येक चोरीची आणि त्यामागील चोरट्याची माहिती पोलिसांना असूनही आजवर बसस्थानकात घडलेल्या एकाही प्रकरणाचा तपास लागलेला नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे पोलीस आणि चोरट्यांच्या मिलीभगतमधून संगमनेर बसस्थानकातील चोरटे आता अनियंत्रित झाले असून दागिने परिधान केलेल्या अथवा आपल्या बॅग, पर्स वा पिशवीतून ते घेवून जाणार्‍या प्रवाशी महिलांची सुरक्षा पोलिसांनीच धोक्यात आणली आहे हे स्पष्टपणे दिसू लागले आहे.


संगमनेर बसस्थानकात मध्यंतरी जवळपास दररोज चोरीच्या घटना घडू लागल्यानंतर माध्यमांनी पोलिसांची लक्तरे उधडायला सुरुवात केली होती. त्यामुळे काही दिवस शहर पोलिसांनी बसस्थानकावरील बंदोबस्तात वाढ केल्याने काहीकाळ येथील चोर्‍या थांबल्या होत्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी बसस्थानकात जावून आगार प्रमुखांशी चर्चा करुन फलाटावर लागलेल्या बसमध्ये चढण्यासाठी संरक्षक कठडे तयार करुन त्यातूनच प्रत्येक प्रवाशाला प्रवेश देण्याची कल्पना मांडली होती व त्यावर तत्काळ अंमलबजावणी करण्याचेही मान्य केले होते. मात्र अन्य गोष्टीप्रमाणे ‘तो’ विषयही केवळ चर्चेच्या तात्पूरत्या स्वरुपाच्या मलमपट्टी सारखाच ठरला असून पोलिसांच्या आशीर्वादाने संगमनेरच्या वैभवशाली बसस्थानकात चोरट्यांचा नंगानाच कायम आहे.

Visits: 218 Today: 2 Total: 1112568

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *