श्रीरामपूरमध्ये डोक्यात फरशी घालून तरुणाची हत्या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके झाली रवाना

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तरुणाच्या डोक्यात मोठी फरशी टाकत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर शहरातील संगमनेर रस्त्यावरील हॉटेल पूनमच्या पाठीमागे बुधवारी (ता.४) सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर अज्ञात आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. दरम्यान, श्रीरामपूर शहर पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहे.

श्रीरामपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तरुणाची हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शाहरुख उर्फ गाठण उस्मान शाह (वय २८, रा.सुभेदारवस्ती, श्रीरामपूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी शाहरुख उर्फ गाठण शाह याच्या डोक्यावर अज्ञात कारणावरुन दगडी फरशी मारुन हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहचले. त्यानंतर मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी कामगार रुग्णालयात पाठविला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आव्हाड हे करीत आहेत. दरम्यान, शाहरुखची हत्या नेमकी कोणी केली आणि का केली? याबाबतची माहिती समजू शकली नसली तरी आरोपींना अटक होताच या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे.
