राहाता शहरातील सेतू चालकांकडून नागरिकांची लूट

नायक वृत्तसेवा, राहाता
शहरातील सर्वच सेतू चालकांकडून ग्राहकांची सर्रासपणे लूट होत आहे. या सेतू चालकांच्या मनमानीला आता नागरिक चांगलेच वैतागले आहे. त्यामुळे प्रशासनाने गंभीर दखल घेवून लूट करणार्या सेतू चालकांवर कारवाईची मागणी होत आहे.

सध्या शाळा प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धांदळ होत आहे. त्यातच विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी ससेहोलपट होत असताना सेतू चालकही वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहे. उत्पन्न, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, रहिवासी असे विविध दाखले काढण्यासाठी सेतूद्वारे प्रतिपूर्ती करावी लागते. याच संधीचा फायदा उठवत सेतूचालक मनमानी शासकीय शुल्काऐवजी जादा पैसे आकारत आहे. याबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देखील करण्यात आलेल्या आहेत. परंतु, दखल घेत नसल्याने त्यांचे चांगलेच फावत आहे. विशेषतः कोणत्या दाखल्यासाठी किती शुल्क आकारले जाते याचा कोणताही तपशील सेतूच्या दर्शनी भागात लावलेला दिसत नाहीये. तर दाखल्यांसाठी दिलेल्या शुल्काची कोणतीही पावती दिली जात नाही. या प्रकाराला नागरिक वैतागले असून कडक कारवाईची मागणी करत आहे.

सेतू चालक हे मनमानी पैसे आकारतात हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. प्रत्येक ग्राहकाला दाखल्याची व पैसे दिल्याची पावती देणे बंधनकारक आहे. या प्रकाराकडे तहसीलदारांनी लक्ष देवून कारवाई करावी.
– सचिन गाडेकर (युवक काँग्रेस अध्यक्ष राहाता)

राहाता तालुक्यातील अनेक नागरिक दाखल्यांसाठी सेतूमध्ये हेलपाटे मारतात. त्यातही सेतूचालक हे जाणूनबुजून नागरिकांना त्रास देतात. त्यासाठी प्रत्येक सेतू चालकाने आकारण्यात येणार्या दराचा फलक लावणे गरजेचा आहे. आणि जे लूटमार करत आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.
– उमेश काळे (सामाजिक कार्यकर्ते, रामपूरवाडी)
