… तर पोलिसांच्या कायदेशीर अधिकारांची गळचेपी होईल : जिल्हा न्यायालय ! कॅफे हाऊसमधील अत्याचार प्रकरण; एका कॅफे मालकाचा अर्ज फेटाळला तर, दुसरा पकडला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही वर्षात संगमनेर शहराच्या भोवती फोफावलेल्या कॅफे हाऊसच्या गोंडस नावाखालील अत्याचाराच्या केंद्रांवर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची वक्रदृष्टी पडली आहे. गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारच्या घटनांमधून समोर आलेल्या हॉटेल, लॉज व कॅफेचालकांनाही त्या-त्या गुन्ह्यात सहआरोपी करुन त्यांनी थेट मूळावरच घाव घातला आहे. त्यांच्या या तपास पद्धतीला आता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानेही वैधतेचे कोंदण चढविल्याने त्यांची पद्धत राज्याला दिशादर्शक ठरण्याचीही शक्यता आहे. अशाच एका प्रकरणातील फरार असलेल्या कॅफे मालकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने ‘आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग ठळक दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवत त्याचा अर्ज मंजूर करणे म्हणजे कायद्याने पोलिसांना दिलेल्या अधिकारांची गळचेपी ठरेल’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. तर याच प्रकरणात महिनाभरापासून पसार असलेल्या कन्हैय्या सोनवणे या दुसर्या कॅफे मालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

गेल्या २३ ऑगस्ट रोजी याबाबत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात गेल्या एप्रिलपासून घुलेवाडीतील मालुंजकर वसाहतीत राहणार्या आशिष नानासाहेब राऊत (वय २०) याने पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर संगमनेर व शिर्डीतील वेगवेगळ्या लॉज, हॉटेल व कॅफे हाऊसमध्ये नेवून त्याने अत्याचार केले. सदरचा प्रकार समजल्यावर त्याच परिसरातील किरण सोपान राऊत (वय ३०) या नराधमानेही पीडितेला बदनामीची धमकी देत तिला अशाप्रकारच्या ठिकाणांसह विठ्ठलकडा, कर्हेघाट व पेमगिरीसारख्या निर्जन ठिकाणी नेवून तिच्या असाहाय्यतेचा गैरफायदा घेतला. याप्रकरणात सागर मालुंजकर या तिसर्या आरोपीचे नाव सुरुवातीपासून समोर आले होते. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासूनच तो पसार झाला होता.

या प्रकरणात अत्याचाराच्या कलम ३७६ (२) (एन), ३६३ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे (पोक्सो) कलम ४, ६, ८, १२ व १७ नुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी सखोल तपास करुन दोन्ही मुख्य आरोपींसह नांदूर शिंगोटे येथील हॉटेल साईतेजचा मालक ज्ञानेश्वर किसन क्षीरसागर, सावळी विहिरी येथील लॉजचा मालक आकाश भास्कर बोंडारे व घुलेवाडीतील कॅफे क्रशबसचा मालक राहुल गौतम भालेराव याला यापूर्वीच अटक केली होती. तर अन्य दोन कॅफे हाऊसचे मालक कन्हैय्या सोनवणे (कॅफे मॅझीक) व सागर मालुंजकर हे दोघेही गुन्हा दाखल पासून पसार झाले होते. दरम्यानच्या कालावधीत सदरील प्रकरण मागे पडल्याचे समजून गेल्या मंगळवारी (ता.३) आरोपी सोनवणे याने आपल्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि तेथेच तो फसला.

पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांनी पोक्सोसारख्या प्रकरणात कोणत्याही स्वरुपाचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा दिलेला असल्याने पोलीस या प्रकरणात समोर आलेल्या प्रत्येक आरोपीच्या ठावठिकाण्यावर बारीक लक्ष ठेवून होते. त्यामुळे कॅफेमालक सोनवणे रडारवर येताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. बुधवारी (ता.४) त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर याच प्रकरणात गेल्या २३ ऑगस्टपासून पसार असलेला अन्य एका कॅफे हाऊसचा मालक सागर मालुंजकर याने अटकपूर्व जामिनासाठी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर झाली.

यावेळी सरकारी पक्ष व बचाव पक्षाने जोरदार युक्तीवाद करताना आपापले म्हणणे सादर केले. त्यावर जिल्हा न्यायाधीश मनाठकर यांनी पीडितेने फिर्यादीत स्पष्टपणे केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधताना आरोपीने मुख्य आरोपीला केवळ अत्याचारासाठी जागाच उपलब्ध करुन दिली नाहीतर तो दोघेही आत गेल्यावर आपले दुकान बाहेरुन बंद करीत होता व थोड्यावेळाने पुन्हा येवून उघडत होता. याचाच अर्थ पीडितेवर होणारा अत्याचार कोणाच्याही लक्षात येणार नाही याचीच तो काळजी घेत असल्याचे महत्वाचे मत नोंदविले. शिवाय या प्रकरणात प्रस्तूत आरोपी सागर मालुंजकर याचा ठळक सहभाग दिसत असल्याचे व त्याची पोलीस चौकशी होणे आवश्यक असल्याचे मतही न्यायालयाने नोंदविले.

सरकारी वकिलांनी उपस्थित केलेले मुद्दे ग्राह्य धरताना न्यायाधीश मनाठकर यांनी आरोपी मालुंजकर याने अत्याचारासाठी आपले दुकान (कॅफे हाऊस) आरोपीला कितीवेळा उपलब्ध करुन दिले होते ही गोष्ट त्याच्या चौकशीशिवाय समोर येवू शकत नसल्याचे सांगत अशा स्थितीत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करणे म्हणजे ‘तपासी यंत्रणेला कायद्याने दिलेल्या अधिकारांची गळचेपी करण्यासारखे होईल’ अशी महत्त्वपूर्ण टीपण्णी करीत आरोपी सागर मालुंजकर याचा जामीन अर्ज फेटाळीत असल्याचे सांगितले. त्यामुळे आता आरोपीला एकतर पोलिसांसमोर शरणांगती स्वीकारावी लागेल किंवा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल करावा लागणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत अत्याचार करणार्या दोघा मुख्य आरोपींसह नांदूर शिंगोटे व शिर्डी येथील लॉजचालक व संगमनेरातील दोघा कॅफे हाऊसच्या मालकांना अटक केली आहे.

केवळ संगमनेरच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कॅफे हाऊसच्या नावाखाली चालणार्या अशा अश्लील ठिकाणांची चर्चा सुरु आहे. मात्र अशा ठिकाणांवर होणार्या अत्याचारासारख्या प्रकरणात आजवर कॅफे हाऊस, लॉज अथवा हॉटेल मालक व चालकांना सहआरोपी करण्याचा प्रकार बहुधा संगमनेरात पहिल्यांदाच घडला आहे. आता पोलिसांच्या याच कृतीवर जिल्हा न्यायालयानेही वैधतेची मोहोर उमटवल्याने उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा कॅफे हाऊसवरील कारवाईचा ‘संगमनेर पॅटर्न’ राज्यासाठी दिशादर्शक ठरण्याचीही दाट शक्यता आहे.

