आठ दिवसांत शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्या! अन्यथा श्रीरामपूर काँग्रेसकडून तीव्र आंदोलनाचा इशारा


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या श्रीरामपूर तालुक्यातील २३ हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १० हजार शेतकर्‍यांना मदत मिळाली असून अद्यापही १३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. आठ दिवसांत या शेतकर्‍यांना मदत द्यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे २३ हजार शेतकर्‍यांना फटका बसला होता. वारंवार पाठपुराव्यानंतर सरकारने अतिवृष्टीग्रस्त या शेतकर्‍यांना मदत जाहीर केली. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करणे, केवायसी व अन्य कारणांमुळे त्यास विलंब झाला होता. यासंदर्भात आमदार लहू कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक कानडे यांनी तालुक्यातील शेतकर्‍यांना सोबत घेत तहसील कार्यालयात आंदोलन केले होते. त्यानंतर तातडीने सुमारे १५ कोटी रुपयांची मदत तालुक्यासाठी प्राप्त झाली होती. मात्र, कागदपत्रांची अपूर्तता व केवायसीच्या कारणामुळे केवळ १० हजार शेतकर्‍यांच्याच खात्यात ही रक्कम वर्ग झाली आहे.

अद्यापही १३ हजार शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. तसेच भेर्डापूर, पढेगाव, भामाठाण, नायगाव, मालुंजे, खानापूर यांसह आठ गावातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची यादी महसूल विभागाला प्राप्त न झाल्यामुळे ही गावे मदतीपासून वंचित राहिली आहेत. त्यामुळे संबंधित गावातील तलाठ्यांनी शेतकर्‍यांच्या याद्या त्वरीत महसूल विभागाला द्याव्यात, महसूल विभागाने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून चार्‍याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

विमा कंपनीची २५ टक्के अग्रीम रक्कम मिळावी यासाठी सध्या सर्व्हे सुरू झाला आहे. मात्र, हा सर्व्हे करताना ज्या शेतकर्‍यांचे पीक चांगले आहेत, त्याचीच नोंद होत असल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांकडून येत आहेत. त्यामुळे खरे लाभार्थी यापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात कानडे यांनी सर्व्हेमध्ये सुसूत्रता आणून योग्य लाभार्थ्यांना अग्रीम रक्कम मिळावी, अशी मागणी कानडे यांनी केली असून याबाबत कार्यवाही न झाल्यास पुढील आठवड्यात कोणतीही पूर्वसूचना न देता तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक अशोक कानडे, अरुण नाईक, विष्णूपंत खंडागळे, कार्लस साठे, राजेंद्र कोकणे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे, सुरेश पवार, अजिंक्य उंडे, राजेंद्र औताडे, सचिन जगताप, आबासाहेब पवार, मदन हाडके, रवींद्र आव्हाड, योगेश आसने, अमोल आदिक आदिंनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *