भारतीय संत साहित्य जगासाठी दिशादर्शक ः आफळे महाराज मालपाणी उद्योग समूह; श्रावण महिन्याच्या निमित्ताने कामगारांसाठी कीर्तन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
एकनाथ महाराज म्हणतात ‘काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल…’ त्यांच्या या सूत्राला समजावून घेतल्यास सद्वर्तन आणि स्वच्छतेचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखीत होते. कामातच राम बघणार्‍या कामगार आणि कर्मचार्‍यांच्या समर्पण वृत्तीतून काय घडू शकते याचे मूर्तीमंत उदाहरण मालपाणी उद्योग समूहात बघायला मिळते. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ व आरोग्यदायी राखणे आणि सर्वांशी चांगले वागणे ही देखील एकप्रकारची देवपूजाच असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी केले.

येथील मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने श्रावण मासाचे औचित्य साधून त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, व्यवस्थापक रमेश घोलप आदी यावेळी उपस्थित होते. आपल्या कीर्तनात पुढे बोलताना आफळे म्हणाले की, श्रावणात अनेकजण महादेवाचे पूजन करतात. त्याचा परिणाम त्यांच्या वागणुकीमध्येही दिसायला हवा. यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून ते संत कबीरांपर्यंतच्या विविध संतांच्या जीवनाचे आणि त्यांनी लिहिलेल्या साहित्याचे दाखले त्यांनी दिले. आजच्या जीवनात संत साहित्याचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले. आपल्या संतांनी कोणत्याही कामाकडे लहान अथवा मोठे म्हणून कधी बघितले नाही. त्यांना आपल्या कामातूनच साक्षात पांडूरंगाचे दर्शन घडले.

मालपाणी उद्योग समूहातील कामगार मंडळीही कामातच विठ्ठलाचे रुप बर्घीारी आहे. आयुष्यातला आनंद द्विगुणीत करण्यासाठी नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा. आजकाल नाटक, चित्रपट व समाज माध्यमांनी सध्या विकृतीची परिसीमा गाठली गेली आहे. सभ्य आणि पवित्र अशी आपल्या संस्कृतीची जगात ओळख आहे. मात्र टीव्ही मालिका आणि चित्रपटातून असभ्यपणा, अश्लीलता, चारित्र्य शून्यता याचा तुफान भडीमार सुरु आहे. त्यामुळे तरुण पिढी आपल्या मार्गापासून विचलित होण्याचे प्रकार घडत आहेत. टीव्ही मालिकांनी तर कहरच केला असून बहुसंख्य मालिकांमध्ये एकमेकांचे पती आणि पत्नी पळवापळवीचे खेळ अगदी सुपारी देऊन चालविले जात आसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी आफळे महाराज म्हणाले की, संसार सुखाचा कधीच नसतो, तर तो सुखाने करावा लागतो. म्हणूनच आपल्या संतांनी ‘अवघाची संसार, सुखाचा करील..’ असे म्हटलं आहे. आजज्या माध्यमांनी समाजाला दिशा दाखवावी ती माध्यमेच दिशाहीन झाल्याने भविष्यात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. संत साहित्यातून मनःशांती, सुख आणि आत्मिक आनंद मिळतो आणि तो टिकाऊ असतो. त्यात रमणारी व्यक्ती आनंदाची एकेक पायरी चढत परमानंद, ब्रह्मानंद आणि आत्मानंद अशा सर्वोच्च पातळीवर जावून पोहोचते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच संत साहित्य शिकवले गेले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. राजेश मालपाणी यांनी स्वागत केले, रमेश घोलप यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला मालपाणी उद्योग समूहातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *